सुगीचे दिवस.. जगण्याची अगतिकता मांडणारं आत्मकथन - डॉ.विलास ढवळे

शालेयवृत्त सेवा
0


ज्ञानेश्वर घोडगे हे समाजशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य. सबंध जीवनभर त्यांनी परस्परसाहचर्य आणि संवादातून माणसामाणसातील दरी सांधण्याचे काम केले. त्यांची माझी ओळख 1982 ची.दहावीसाठी मी जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये प्रवेशित झालो होतो.त्याचवेळी ते शिवाजी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. माझा भाऊ गंगाधर अण्णा यांचे ते मित्र .अण्णांनीच माझी त्यांची ओळख करून दिली. त्यामुळे त्यांचा आणि माझा ऋणानुबंध अधिक वाढत गेला. मृदू स्वभाव, कुणासोबतही सहज मिसळण्याची त्यांची वृत्ती यातून ते विद्यार्थीप्रिय झालेच तसेच समाजमन आणि समाजभान असणारे व्यक्तित्व म्हणूनही  आकाराला आले.

  

प्रत्येकाचं जगणं हा सुखदुःखाचा सारीपाट असतो. जगण्यातील अगतिकता ,जीवन ओढत नेत असताना आलेले समर प्रसंग साऱ्याच दाहक अनुभूतीचा सारीपाट म्हणजे त्यांचे 'सुगीचे दिवस' हे स्वकथन आहे.ते स्वतः सिद्धहस्त लेखक नसतानाही त्यांनी अतिशय ताकदीने हे लेखन केले आहे. अगदी पंजोबा ,आजोबा, त्यांचं कुटुंब, त्यांचं स्थलांतरित जगणं, वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईचं एकाकी असणं, त्यातून जगण्यासाठी करावा लागलेला संघर्ष ,शिक्षण आणि  नोकरी या सर्व बाबी त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे मांडल्या आहेत.ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. एकूणच समाज वास्तव आणि सामाजिक स्थित्यंतर यात  त्यांनी मांडले आहे. मलपृष्ठावर ज्येष्ठ समाज शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप आगलावे यांनी पाठराखण केली आहे.

  

लेखकाचे कुटुंब भटकंती करणारे आहे. ज्या गावी घरे बांधण्याचे काम मिळेल त्या ठिकाणी बिऱ्हाड थाटायचे आणि तिथले काम संपले की दुसऱ्या गावाला जायचे अशा पद्धतीने स्थलांतर करीत शेवटी ते आदिवासी भागामध्ये  त्यांनी आपले बस्तान बसवले. तिथून कार्ला येथे स्थायिक होऊन सुरू  झालेला प्रवास लेखक जेव्हा स्वेच्छा निवृत्ती घेतात तिथपर्यंत येऊन पोहोचतो. 

  

कामधंदा करीत असल्यामुळे लेखकाचे आजोबा श्रीमंत होते. भरपूर शेती ,धनधान्य होते परंतु लेखकाचे वडील वारल्यानंतर त्यांना गरिबी येते आणि त्यानंतर एकूणच विदारक अवस्थेतील त्यांचं जगणं मनाला अस्वस्थ करीत जातं.लहान  वयातच त्यांचे वडील गेले .वडील कसे होते, हे त्यांची आई ,त्यांच्या बहिणी सांगायच्या. वडिलांच्या बहादुरीचे अनेक किस्से त्यांना बळ द्यायचे. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील लेखकाचे वडील, त्याकाळचा गावगाडा, गावकी त्यावेळची सामाजिक व्यवस्था या साऱ्याच बाबींचे वर्णन त्यांनी अत्यंत जिवंतपणे केले आहे. जीवन जगत असताना अनेकांनी त्यांना मदत केली .काही हिंदू ,काही मुसलमान  या सर्वांचीच कृतज्ञता अत्यंत नम्रपणे त्यांनी व्यक्त केली आहे. माणसं चांगलीच आहेत अशी त्यांची धारण आहे.

  

त्याकाळची खोपटाची घरं, सुंबानी विणलेल्या जुनाट बाजा,  भूक लागली तर जेवणासाठी कुणाच्या तरी लग्नाची वाट पाहणे आणि त्यासाठी पायपीट करीत लांबपर्यंत जाणे, औरंगाबाद येथे महाविद्यालयीन  शिक्षणासाठी करावी लागणारी धावपळ, फिरलेला परिसर, घाटी, विद्यापीठ, विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.सुधाताई काळे, वत्सलाबाई कदम, गावाकडील वली साहेब ,सिताराम पंत पार्डीकर, आजी तुळशीबाई, राजे खान ,बहीण लक्ष्मीबाई नाथा वाठोरे, आंबेडकर चळवळीचे अर्ध्व्वयु ज.वि. पवार, राजा ढाले, मा मा येवले असे कितीतरी संदर्भ यात पाहायला मिळतात. या सर्वांचाच अत्यंत नम्रपणे त्यांनी उल्लेख केला आहे .ही सगळी पात्र  जीवनाला कलाटणी देणारी आणि घडवणारी आहेत ही कृतज्ञता त्यांच्या लेखनात पाहायला मिळते.


आदिवासी भागात वावरत असल्यामुळे जंगलाचा खूप मोठा संबंध आला. जंगलातील पशु- पक्षी, प्राणी ,आदिवासींचं जगणं, आदिवासींचे जीवन व्यवहार या साऱ्याच गोष्टी अतिशय दीर्घपणे त्यांनी मांडल्या आहेत. या सबंध जीवन प्रवासात भेटलेल्या प्रत्येक माणसाचा उल्लेख त्यांनी लेखनात केला आहे.


नानू ते ज्ञानेश्वर घोडके हा सबंध प्रवास म्हणजे इतिहास आहे .त्यांचे हे आत्मकथन नुसते ललित लेखन नाही तर सबंध काळाला स्पर्श करणारे,काळाचे संबोध स्पष्ट करणारं समाजशास्त्रीय चिकित्सा करणारं व्यवस्था संशोधनाचे एक अक्षर साहित्य आहे .गेल्या शंभर वर्षातील संदर्भ, आंबेडकरी चळवळ, गावगाडा, पाण्यासाठी करावा लागलेला संघर्ष ,जगण्यासाठी उडालेली त्रेधातिरपट, शिक्षणानंतर जेव्हा ते प्राध्यापक झाले त्यानंतर  कधी सन्मान ,कधी सलोख्याचे संबंध निर्माण करणारे मित्र तर कधी अत्यंत वेदना  देणारी माणसं पाहायला मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे, गुरुनाथराव कुरूडे यांच्या सानिध्यात ते समृद्ध झाले. केशवराव धोंडगे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.


त्यांचे संबंध स्व कथन वाचताना लेखनातले प्रवाहीपण जाणवते. अनेक मित्र ,सोबती, सवंगडी प्राध्यापक, शिक्षक या सर्वांचा अतिशय नम्रपणे त्यांनी उल्लेख केला आहे .ज्ञानेश्वर घोडके ही मुळातच संवादी, संयमी व्यक्तिमत्व असलेले. त्यामुळे त्यांनी जोडलेली माणसे भरपूर आहेत. समाजशास्त्राचा प्राध्यापक कसा समाजशील असला पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचं जगणं आहे .त्यांचे सहसंबंध आहेत .मायीचा ते अत्यंत कृत्रज्ञतापूर्व उल्लेख करतात . माय लेकाचं मैत्रीपूर्ण नातं सबंध आत्मकथनभर पाहायला मिळतं .आई ,भाऊ ,बहिणी, मुलं यांच्यासोबतचा हा सहप्रवास अत्यंत आनंददायी असल्याचे ते म्हणतात. गायक,कलाकार,सृजनशील व्यक्ती ,चळवळ्या म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. 

सुगीचे दिवस हे त्यांचे आत्मकथन अत्यंत प्रभावी आणि मराठी साहित्यातलं लेणं ठरणार आहे.

समिक्षण :

    -डॉ.विलास ढवळे, नांदेड 9422188152

   पुस्तक : सुगीचे दिवस

               (स्वकथन )

   लेखक - प्राचार्य ज्ञानेश्वर घोडगे 9970933067

   प्रकाशक- निर्मलकुमार सूर्यवंशी निर्मल प्रकाशन नांदेड

   मूल्य: ₹ ४००

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)