कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व कृषी विभागाच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी,२०२३ ते दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या "सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव" शैक्षणिक सहलीबाबत सूचना शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व कृषी विभागाच्या वतीने श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ, कोल्हापूर या संस्थेच्या सहकार्याने दिनांक २० फेब्रुवारी, २०२३ ते दिनांक २६ फेब्रुवारी, २० कालावधीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी "सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कळविले आहे. सुमंगलम महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्रायोजित केलेला महोत्सव असून पर्यावरणाचे रक्षण, जलप्रदुषण, वायु प्रदुषण यांचेपासून मुक्ती, सेंद्रीय शेती, वृक्ष लागवड अशा विविध विषयाची माहिती या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. सदर महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
या विषयी सर्व शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या विभागातील शिक्षणाधिकारी यांची बैठक घ्यावी व त्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेतील इयत्ता ८ वी, ९वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ कोल्हापूर येथे दिनांक २० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये आयोजित करण्यास सूचित करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक सहली चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
सदर शैक्षणिक सहली पूर्वी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची माहिती होण्यासाठी जी पंचमहाभुते आहेत (अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश ) याविषयी सविस्तर माहिती द्यावी, यांचे उपयोग व महत्व विशद करावे.
शैक्षणिक सहलीचे आयोजन करताना विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य व सुरक्षिततेची दक्षता ही त्या शाळेने घ्यावी, शैक्षणिक सहली च्या प्रवासासाठी उपयोजिले जाणारे वाहन हे सुस्थितीत असावे व वाहनाचा वेग हा ताशी ६० किमी/तास यापेक्षा अधिक नसावा. शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर या संस्थे मार्फत करण्यात येणार आहे. शैक्षणिक सहली साठी विद्यार्थ्यांसोबत २-३ शिक्षकानी उपस्थित राहावे.
पर्यावरण/विज्ञान विषयांचे विषय आवश्यक आहे. कोल्हापूर हे प्रेक्षणीय स्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी असलेला राजवाडा, किल्ला पन्हाळा,रंकाळा तलाव व अंबाबाई मंदिर (श्री. महालक्ष्मी मंदिर) याठिकाणी भेट द्यावी. कोल्हापूर शहरला इतिहासात महत्वाचे स्थान आहे, तेथील संस्थांनाची व शहराच्या संपूर्ण इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावी. सदर शैक्षणिक सहली दरम्यान एक दिवस सर्व प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळाला भेट द्यावी व दुसऱ्या दिवशी श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर या ठिकाणी आयोजीत महोत्सवात सहभाग घ्यावा, संपुर्ण शैक्षणिक सहली दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित शाळा व शिक्षकांनी घ्यावी.
सदर शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी श्री. एकनाथ अंबोकर, शिक्षणाधिकारी, कोल्हापूर (मो क्र.-९४२११८७९८) यांना “नोडल अधिकारी” नियुक्त करण्यात येत आहे, व श्री होनगेकर मुख्याध्यापक, कणेरी (मो.क्र-७५८८०६५०४४) व शिक्षक श्री सरगर (मो.क्र-९४०४९५४९९०) यांना “संपर्क अधिकारी" म्हणून नियुक्त केले आहे, त्यानुसार सर्व शाळांनी यांचेशी संपर्क साधून आपल्या शैक्षणिक सहलीचा कार्यक्रम निश्चित करावा.
या शैक्षणिक सहलीसाठी होणारा प्रवासखर्च हा समग्र शिक्षा योजनेच्या उपलब्ध तरतुदी मधून करण्यात यावा. उपरोक्त सुचनांचे पालन करुन सदर शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात यावे, असे परीपत्रकात म्हटले आहे.
अशा प्रकारच्या शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुते बरोबरच पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व प्रचारासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन स्काऊटस् सहआयुक्त जितेंद्र महाजन यांनी व्यक्त केले आहे. कण्हेरी मठाचा देशपातळीवरील हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे अशी माहिती ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .