।। जनलोकांचे बालसाहित्य ।।
( कर्जत इथं सुरू झालेल्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश)
जनलोकांनी निर्मिलेल्या मुलांच्या लोकगीतांमागे बालवाङ्मय निर्मितीचा शास्त्रीय अभ्यास नसला तरी युगानुयुगाचा प्रत्यक्ष अनुभव त्या पाठीमागे उभा आहे. अशी लोकगीतं फक्त ग्रामीण भागातच पाहायला मिळतात. अशा लोकगीतांचं भावविश्व शेतीशी संबंधित असतं. रानावनातली मुलं काम करताना, गुरं राखताना, खेळ खेळताना जी गाणी म्हणतात त्यात त्यांचा भोवताल आलेला असतो. त्यांचे विषय अर्थातच शेतीमातीचे असतात. पशुपक्षी, झाडंझुडपं, नद्याडोंगर हेच त्यांचे विषय असतात. पूर्वी आजी आजोबांकडे अशा मौखिक बालवाङ्मयाचं भांडार होतं. कल्पक आई-वडीलही असं वाङ्मय उत्स्फूर्तपणे निर्माण करीत असत. मुलं त्यात रमून जात असत. तशी तालातली भाषा घडवायला तीही स्वतः शिकत असत. हळूहळू त्या शब्दजोडित मुलंही सहभागी होत.
आमच्या लहानपणी अशी शब्दजोड आम्हीही करायचो. एखादा मुलगा काही खाऊ एकटाच खात बसलेला असेल, अर्थात तेव्हा आमच्यासाठी खाऊ म्हणजे रानातिल शेंगा किंवा फळं हाच असायचा. आमचा खाऊ दुकानातून कधीही येत नसे. तर तो मुलगा आम्हाला खाऊ देत नसेल तर आपण मिडकायच्या ऐवजी आम्हीच त्याला चिडवत असू 'तिडमिड तिडकं, जीवाला मिडकं' असं चिडवत आम्ही त्यालाच मिडकं ठरवत असू. पुन्हा त्याच्या समोर हात पसरित असू. हात पसरला म्हणून तो जर भिकारी म्हणाला तर आम्ही, 'हात पसरी हातारी, ना देईना तो भिकारी' असं म्हणून त्यालाच भिकारी ठरवत असू. एखाद्या हडकुळ्या मुलाला चिडवण्यासाठी 'वाळली वात, खंडोबाची नात' म्हणत असू. एखादा फार शहाणपणा करत असेल तर 'अरे तू डुर डुर डुकरा, तू कव्हर करशील नखरा' असं म्हणत असू. असे तिथल्या तिथं काहीतरी शब्द जोडून हसवत, रंजवत असू. एकमेकांना चांगुलपणाची शिकवण देत असू.
रानात गुरं राखताना आभाळात उडणारी बगळ्यांची रांग दिसली की बगळ्यांच्या पंखासारखी हाताची बोटं हलवत आम्ही म्हणायचो, 'बगळ्या बगळ्या कवडी दे, माळावरचा नंदि ने'. बगळा, कवडी आणि नंदी तिन्ही ढवळेच. बैलाच्या गळ्यात आम्ही केसाळीत गुंफलेल्या कवड्यांच्या माळा घालत असू. तो शोभिवंत दिसावा म्हणून आणि त्याला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून देखील. गुरं राखण्याचं आमचं काम त्यामुळं कंटाळवाणं न होता आनंदी होऊन जाई. आम्हाला खेळायला वेळ देत नाहीत, कामच सांगत राहतात अशी तक्रार न करता कामातही खेळ शोधून त्या कामाचे श्रम आम्ही हलके करत असू.
नदीच्या पात्रात किंवा पाऊस पडल्यावर ओल्या रानात आम्ही वाळूचे, चिखलाचे खोपे तयार करत असू. आपलाच पाय पुढे ठेवून, त्यावर वाळू किंवा ओली माती थापायची आणि कौशल्याने हळूच पाय काढून घ्यायचा. त्यातून खोपा साकार व्हायचा. हे कौशल्याचं काम नीट पार पडावं, वाळू, चिखल ढासळून खोपा कोसळून नये म्हणून आम्ही चिमणीला प्रार्थना करीत असू, 'चिमणी चिमणी खोपा दे, झाडावरचा झोका ने' आपलं काम यशस्वी व्हावं म्हणून बगळ्याला किंवा चिमणीला केलेली प्रार्थना म्हणजे एका अर्थानं निसर्गालाच देव समजणं होतं. हा संस्कार आम्हाला आपोआप मिळत असे. आम्ही निसर्गाशी एकरूप होऊनच जगत होतो.
असंच आमचं आणखी एक गाणं होतं, 'आमची म्हैस, तुमची म्हैस, गांजराचा पाला खाती, भसभस दूध देती, नगारा की तुतारा' आम्हाला बालगीत लिहून द्यायला कुणी कवी नव्हता किंवा खेळणी करून देणारी कुठली विदेशी कंपनीही नव्हती. आमची गाणी आम्हीच रचत होतो आणि आमची खेळणी आम्हीच घडवत होतो, मोडतही होतो. मातीत मिसळून टाकत होतो. सर्जन आणि विसर्जनाचं तत्वज्ञान आम्हाला बालपणातच समजलं. त्यामुळे प्रदूषण होत नव्हतं. मातीची खेळणी खेळ संपला की मातीत मिसळून जात होती. आमची गाणी आम्हीच रचतांना आमचं भाषिक कौशल्य विकसित होत होतं. भाषेच्या शक्ती आम्हाला कळत होत्या. नाद, लय, ताल, अंगात भिनत होता. त्यामुळे आमचं बालपण सुरेल बनत होतं. शब्दोच्चारांचे आरोह आवरोह अंगवळणी पडत होते. आम्ही बोलताना अडखळत नव्हतो. आमचं म्हणणं आम्ही नीट मांडत होतो. आमची खेळणी आम्हीच बनवत होतो. त्यामुळे आमचं हस्तकौशल्य विकसित होत होतं. ज्वारीच्याच चुयट्या आणि टिपऱ्यांपासून आम्ही सुंदर बैलगाडी बनवत होतो. मातीचा चिखल सेनात गोठऊन बैल जोडी बनवत होतो. आमचं आम्हाला जमतय याचा किती आनंद वाटायचा. आत्मविश्वास वाढायचा. हस्त कौशल्याबरोबरच मेंदूही विकसित व्हायचा. शिवाय हे सगळं करण्यासाठी एकही पैसा लागत नसे. पालकांपुढे हात पसरावा लागत नसे.
उगवलेला कापूस वेचून रुई तयार करणं, कच्च्या बोंडात तुराटी खूपसून घिरटं तयार करणं आणि सुत कातणं आमचं आम्ही करत असू. त्या कातलेल्या सुताची दोरी वळून आमच्या गोऱ्यासाठी नाकाला न टोचणारी मऊ व्यसन आमची आम्ही तयार करत असू. त्यामुळे गोऱ्यावरचे प्रेम व्यक्त होत असे. शिवाय आम्ही घडवलेल्या या खेळण्याचं घरादारात जे कौतुक होत असे त्यामुळे जगण्यातला आत्मविश्वास वाढत असे. व्यक्तिमत्त्वाला एक डौल येत असे. जगणं डौलदार होत असे.
आताच्या मुलांची खेळणी म्हणजे कधीच विघटीत न होणारा घनकचरा. तर आमची खेळणी पंचतत्वात सहज विसर्जित होऊन जात असत. तुमची खेळणी म्हणजे आई वडिलांसाठी मोठं बजेट तर आमची खेळणी म्हणजे शून्य आर्थिक खर्च. आमचं सगळं जगणं सृष्टीशी एकरूप करणारं तर तुमचे खेळ तुम्हाला सृष्टीविन्मुख करणारे.
आम्ही मुलं एकमेकांना कोडी घालायचो. त्याचं उत्तर शोधण्यासाठी खूप विचार करावा लागायचा. त्यातून विचारकौशल्य विकसित व्हायचं. ही कोडी बुद्धीची कसोटी पहायची. त्यात सतत नवनव्या कोड्यांची भर पडायची. मामाच्या गावाला गेलेली मुलं तिथून नवी कोडी शिकून यायची. घरात आलेली नवी वहिनी तिच्या माहेरात प्रचलित असलेली नवी कोडी सांगायची. लग्न झालेल्या बहिणी सासरहुन नांदून येताना नवी कोडी घेऊन यायच्या. शिवाय पाहुण्यांच्या गावाला गेलेली मुलं तिथून नवी कोडी शिकून यायची. कोड्यांचे विषय अवतीभोवतीचेच असायचे. 'काळं वावर पांढरा पेरा, न ओळखणाराच्या डोक्यावर तुरा' नव्यानेच हातात आलेली पाटी आणि त्यावर लेखणीने लिहिलेली पांढरी अक्षर हे या कोड्याचं उत्तर होतं. आणखी एक कोडं होतं 'कानी कानी कुच, ढुंगण उच' याचं उत्तर मुंगळा असायचं. त्यात निरीक्षण होतं, कल्पकता होती, यमक होतं, गमक होतं, युक्ती होती, खटका होता, आमच्या गाण्यात आणि कोड्यात श्लीलअश्लील असं काही नव्हतं. सगळ्या इंद्रियांची नावं त्यात गुंफलेली असायची. ते वयच श्लील असतं. अजून तिथं अश्लिलतेचा भाव उमटलेला नसतोच. कारण आपण सगळे तेव्हा भोंगळेच फिरत असतो.
भोंगळं रे भोंगळं
कांद्याचे चिंगळं
कांदा गेला वाया
पण मह्या पाया
पायाला आलं खांडूक
खाय कुत्र्याचं हाडूक
असं गाणं आम्ही म्हणायचो.
संगंमंगं आले तिघं
एक बसलं भुईत दडुन
एक बसलं मुंडकं मोडून
एक गेलं आभाळात उडून
मलमूत्र विसर्जनाच्या क्रियेवर आधारित हे कोडं खरोखरच कल्पक होतं. खूप विचार करायला लावणारं होतं. उत्तर कळल्यावर खूप हसायलाही लावणारं होतं. काही मुलं तर तिथल्या तिथं कोडी जोडीत असत. समोरच्याला कोड्यात पाडीत असत.
गुई गुई गुपित
चल मह्या खोपीत
काय तुझ्या मनात
सांग मह्या कानात
असं एक कोडं आम्ही एकमेकांना घालायचो. त्याचं उत्तर होतं रानातल्या खोपीत बैलाच्या शेणाच्या वासाने घोंगावणारी चिलटं. पण त्याला देखील कोड्यात किती सुंदर रीतीनं गुंफलेलं होतं.
अडकत कोंबडं भडकत जाय
तीन तोंडं दहा पाय
हे विहिरीवरच्या मोटेला उद्देशून असलेलं कोडं किती कल्पक आहे ! दोन बैलांचे आठ आणि मोट हाकणाराचे दोन असे दहा पाय आणि तिघांची तीन तोंडं. मोटेच्या येण्याजाण्याचं केलेलं वर्णनही मोठं लयबद्ध आणि खटकेबाज आहे.
दणदण कुदळी मनमन माती
इंग्रजानं राज्य केलं अर्ध्या राती
रात्रभर उंदीर घरात जो उकीर उकरतात त्यावर तयार केलेलं हे कोडं. असंच एक छान कोडं जात्यावर दळण दळण्याविषयी आहे,
हरण पळतं
दूधु गळतं
यात किती काव्यात्मकता आहे, लय आहे, शब्द सामर्थ्य आहे, चारच अक्षरांची ही एक परिपूर्ण कविताच आहे. तिरळ्या मुलांना चिडवताना 'एक डोळा हेकना, किधर को देखना' असं म्हणत. त्यातही कविता आहेच. असं आमच्या लहानपणी आमच्या भोवती सर्वत्र काव्यच भरलेलं होतं. हे काव्य आता हरवलेलं आहे. ज्यांनी आमचं बालपण घडवलं तेच आता नव्या पिढीसाठी उपलब्ध नाही. ही रिकामी झालेली जागा आता बालसाहित्याला भरून काढावी लागणार आहे. बालसाहित्यिकांच्या समोरचं हे मोठं आव्हान आहे. मुलांच्या भोवतीचे विषय घेऊन अशी नवी कोडी, नवे वाक्प्रचार, नव्या म्हणी घडवाव्या लागणार आहेत. फक्त कथा, कविता, कादंबऱ्या लिहून भागणार नाही. अशी लहान लहान गरजा भागवणारी रचनाही करावी लागणार आहे. त्यामुळे बालसाहित्यिकांसमोर हे मोठं कोडं असणार आहे.
बालसाहित्य लिहिणं सोपं समजलं जातं, ही फार घातक गोष्ट आहे. यशस्वी बालसाहित्य लिहिणं ही मोठीच अवघड गोष्ट आहे. बालसाहित्यिकांना ती प्रयत्नपूर्वक साध्य करावी लागणार आहे. माझ्या लहानपणी आम्ही दहापर्यंतच्या आकड्यांचं एक गाणं पाठ केलेलं होतं. त्यात मराठी आकड्यांच्या दृश्य रुपावरून त्या त्या आकड्यांना एक व्यक्तिमत्व बहाल केलेलं होतं. प्रत्येकाचं आकारिक वैशिष्ट्य त्या व्यक्तिमत्त्वात गुंफलेलं होतं. ते गाणं असं होतं,
एक बसतो एकटा
दोन शोधतो दुक्कल
तीन म्हणतो सहाची
करीन मी नक्कल
चार खातो फार
पाच करतो नाच
सहा म्हणतो कसा
माझ्याकडे पहा
सात बसतो गात
आठ चालतो ताठ
नऊ म्हणतो तुम्ही
सगळेजण माझे
दहाच्या पाठीवर
शून्याचे ओझे
हे गाणं कुणाचं होतं ? त्याचा कवी कोण होता ? हे गाणं पुस्तकातलं होतं का मौखिक परंपरेतलं होतं ? की आमच्याच कल्पक गुरुजींनी ते आमच्यासाठी रचलं होतं ? याविषयी नक्की काहीच सांगता येत नाही. पण त्यातून किती चांगल्या पद्धतीनं उजळणी सांगितली होती ! आकडे म्हणजे अवघड गोष्ट नसून ते आपल्या वर्गातले मित्रच आहेत असं वाटायचं. एक एक आकडा एकेका मित्राच्या स्वभावाचाच वाटायचा. त्यामुळे मित्रांच्या आणि आकड्यांच्या जोड्या आमच्या मनात आपोआप जुळायला लागायच्या. उंच आवाजात हसतखेळत हे गाणं आम्ही आनंदानं म्हणायचो. अशा रचनांची बालवाङ्मयात खूप खूप गरज आहे. बालसाहित्यिकांच्या आजच्या पिढीनं अशी पुष्कळ गाणी आता रचायला हवीत.
रंजन आणि संस्कारासाठी सर्वच जण लिहितात. त्यासोबतच मुलांमध्ये निसर्ग, पर्यावरणाविषयी प्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणूनही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची, त्यासाठी तसे संस्कार करणारं वाङ्मय लिहिण्याची फार फार गरज आहे. माझ्या काव्यलेखनाचा उद्देश प्रामुख्यानं हाच आहे. मी प्रामुख्यानं कुमारवयीन मुलांसाठीच लिहितो. बालांसाठी आतापर्यंत मी काहीही लिहिलेलं नाही. माझा मुलांसाठी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह 'गावाकडं' या नावाचा आहे. त्यात मी मुलांना गावाकडं नेऊन त्यांना खऱ्या भारताचा, ग्रामीण जीवनाचा परिचय करून दिलेला आहे. माझ्या आगामी कवितासंग्रहाचे नावच आहे 'रानावनात'. या पुस्तकातल्या कवितांमधून मी मुलांना रानात घेऊन जाणार आहे. रानमळ्याच्या वाटेनं घेऊन जाणार आहे. त्यांना सगळी सृष्टी दाखवणार आहे. ज्यातून त्यांना निसर्गाची ओळख होईल. कृषी संस्कृतीची ओळख होईल. रानातली झाडंझुडपं, पशुपक्षी, ओढेनाले यांचा परिचय होईल. निसर्गाची ओढ त्यांच्यात निर्माण होईल. माझ्या शेवटच्या संग्रहात मी मुलांना 'जंगलझाडी'त घेऊन जाणार आहे. त्यांना निखळ निर्मळ निसर्गात नेणार आहे. सृष्टीच्या पंचतत्वांची ओळख करून देणार आहे.
माझं मुलांसाठींचं कविता लेखन गरजेतून निर्माण झालेलं आहे. माझी बाप ही कविता तीस वर्षापूर्वी पाचवीच्या बालभारतीत समाविष्ट झाली. शाळा शाळातून निमंत्रणं येऊ लागली. त्या मुलांशी संवाद करताना मला त्यांचं मानस कळू लागलं. त्यातून एकेक कविता जन्माला येऊ लागली. तिचं मुलांसमोर सादरीकरण कसं करायचं तेही या मुलांनीच मला शिकवलं. त्यामुळेच सर्वात कमी कविता लिहूनही मुलांमध्ये मी लोकप्रिय आहे, असं मला वाटतं.
- इंद्रजित भालेराव
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .