बालकांसाठी प्रबोधक व वाचनवेड लावणारा : 'बालगितांचा खजिना'

शालेयवृत्त सेवा
0





बल्लारपूर जि.चंद्रपूर येथील शिक्षिका व कवयित्री सौ. प्रीतीताई जगझाप यांचा पहिला कवितासंग्रह 'नंदादीप' . या संग्रहाने त्यांना कवयित्री म्हणून ओळख दिली. यानंतर त्यांनी बालकांसाठी म्हणून छोटेखानी ' बालगीतांचा खजिना' प्रकाशीत केला. आपण सतत बालकांच्या सान्निध्यात असतो. त्यांच्यासाठीही काहीतरी लिहावं. असं त्यांच्या मनात आलं. आणि हा खजिना त्यांनी प्रकाशीत केला. 


          या संग्रहातील २१ गीतं वाचल्यानंतर असं जाणवलं की, त्यांनी मुलांच्या वाचन ओढीचा विचार केला असावा. बालकांच्या अवतीभवतीचं विश्व त्यांनी शब्दबद्ध केलं. गीतांमधून त्यांनी निसर्ग सौंदर्याची, खेळ, भाज्यांची नावे, कोरोना, स्वच्छता, देश, फळा, रानफुलांच्या बागा,पाऊस, फुलपाखरे, माझी शाळा, शाळा बंद शिक्षण सुरू अशा अनेक आवडीच्या विषयावरील रचना प्रसविल्या आहेत. 

     या कविता/गीते वाचल्यानंतर लहान मुलांना वरील विषयाची माहिती सहज मिळू शकेल. हा प्रयत्न केला . त्यांची ओळख होईल, त्यांचेशी मैत्री होईल, नातं घट्ट होईल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गमती जमती यातून मांडल्या आहेत. मुलं दैनंदिन जिवनात या गोष्टींचा आश्वाद घेत असतात. त्यांचं भावविश्व या गोष्टीभोवतीच फिरत असते. तालबद्ध,लयबद्ध या रचना आहेत. मुलं हे सहजपणे गाऊ शकतात आणि आत्मसात करू शकतात. मुलांना आवडेल असेच विषय त्यांनी घेतले आहेत. कवयित्री शिक्षिका असल्याने मुलांचे मानसशास्त्र त्यांनी जवळून अभ्यासलं आहे. 


         हल्लीच्या पिढीला टी.व्ही.,मोबाईल,गेम याचं अधिक आकर्षण आहे. त्यामुळे देशी मैदानी खेळापासून ते दूर जात आहेत. अभ्यास एके अभ्यास आणि टि.व्ही. मोबाईलमुळे ते घरकोंबळे झालेत की काय असै वाटायला लागले आहे. म्हणूनच की काय कवयित्रीने या पुस्तकात 'माझे खेळ', 'घानमाकड' , 'इक्कर बिल्ला टिक्कर बिल्ला' , या खेळांची माहिती या गीतामधून दिली आहे.  एवढेच नव्हे तर पाढ्यांवर आधारीत गीतातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे.


'स्वच्छता'


एक-दोन, एक-दोन

रोजच शाळेला येतंय कोण?

तीन-चार, तीन-चार

केस करा स्वच्छ फार

पाच-सहा, पाच-सहा

स्वच्छ सदरा माझा पहा

सात-आठ, सात-आठ

हात धुवा पाठोपाठ

नऊ-दहा, नऊ-दहा

स्वच्छता अभियान 

आलंय पहा !'


यामधून वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचं महत्व मुलांना पटावं, आणि राष्ट्रीय कार्यालाही हातभार लागावा , हा विचार त्यांनी दिलेला दिसतो . तसेच 'प्रिय भारत देशा' या रचनेमधून त्यांनी आपला भारत कसा आहे, त्यात कशा,कशाचा समावेश आहे, त्याचा इतिहास काय आहे. हे सांगून देशाभिमान हे राष्ट्रीय मूल्य जपण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. रानफुलांची व फुलपाखरांची ओळखही त्या उत्कृष्ठपणे करून देतात. त्याचप्रमाणे शाळा कशी असावी ? ती मुलांना आवडणारी असावी, तिच्याविषयी आकर्षण वाढावे . जर शाळेविषयी मुलांचे आकर्षण वाढले तर गैरहजेरीचे प्रमाण कमी होईल, मुलं कंटाळा न करता दररोज शाळेला जातील . हा सदहेतू कवयित्रींचा या मागे आपणास दिसून येतो. बालपणीच्या खेळाचे आकर्षण वाढविणारे अनेक खेळ आहेत. त्यापैकी कागदाची नाव करून पाण्यात सोडणे, यात मुलांना खुपच आनंद मिळतो. त्याविषयी कवयित्री लिहितात..‌


" वारा झाला शांत

वातावरण छान

कागदाची नाव करू या

प्रवाहामध्ये सोडू या !"


तसेच 'फळा' आणि खडू यांचं नातं छान उलघडलेलं  दिसते .


" काळा काळा फळा

झाला आता हिरवा

खडे देखील रंगीत

मला आवडे बरवा !"


अलीकडे आता हिरव्या रंगाचा फळा आलेला आहे. त्यावर रंगीत खडूने लिहायला मुलांना फार मजेशीर वाटते . हे आकर्षण छान शब्दबद्ध केलेला आहे. या गीतांमध्ये मुलं रममान होऊन वाचू ,लिहू लागतील . ही कल्पनाच भन्नाट आहे प्रीतीताईंची .

        एकूणच हा बालकवितासंग्रह मुलांमध्ये वाचनाची गोडी,आवड निर्माण करणारा आहे,ज्ञानामृत पाजणारा आहे .


निसर्गातील विविध घटकांवर, समाजातील घटकांवर, देशावर, प्राणी, फुलपाखरे, झाडे,पाणी, याविषयीची आपुलकीची,प्रेमाची,जिव्हाळ्याची भावना निर्माण करण्याचा माणस स्तुत्य आहे. मूल्यशिक्षण व शासनाच्या विविध विषयावरील राष्ट्रीय अभियान राबविण्याबाबत मनोदय अधोरेखीत होत आहे. प्रीतीताई यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा बालकवितासंग्रह मुलांसाठी उपयोगाचा व मार्गदर्शक ठरावा असाच आहे. याबाबत त्यांचे कौतुक केले पाहिजे. 

    मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांचे आहे तर हा संग्रह समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर यांनी प्रकाशीत केला आहे. याची प्रस्तावना जेष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे,पुणे यांनी समर्पक लिहीली आहे. त्यांच्यामते या संग्रहामुळे  तनावातून बालकांना आनंदाचे दोन क्षण प्राप्त होतील. असे वाटते . ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचा शुभेच्छा संदेशही बोलका आहे . पाठराखण एकनाथ आव्हाड यांनी अगदी मोजक्या व योग्य शब्दात केलेली आहे. अंतर्गत सजावट सुहास जगताप यांनी सुंदर केली आहे.


      हा संग्रह मुलांच्या ज्ञानात व आनंदात यथायोग्य भर घालेल . याची मला खात्री आहे. विद्यार्थीप्रेमी शिक्षिका प्रीतीताई जगझाप यांनी असेच नवोपक्रम राबवून मुलांच्या आवडी निवडीशी एकरुप होऊन ज्ञानदानाचे कार्य करीत राहावे. हीच मंगलकामना .


समिक्षक :

- अरुण हरिभाऊ विघ्ने

आर्वी, वर्धा

मो.८३२९०८८६४५



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)