विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना ओळखून संधी व प्रेरणा द्या - माजी आमदार शिरीषदादा चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



 

नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आवडणारा त्यांचा चेहरा फुलवणारा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम कारण या कार्यक्रमात आपल्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ त्यांना उपलब्ध होत असते.आणि असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आमची हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था ही विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी आहे असे मत अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी हिरा प्रतिष्ठान संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवाच्या उद्धघाटन प्रसंगी व्यक्त केले. 


पुढे ते म्हणाले सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खूप काही शिक्षण,क्रीडा,विविध स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी संस्थेमार्फत नवनवीन सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून पालकांनी निश्चित व्हायला हवे की काकासाहेब  यांच्या शाळेत शिकणारा आमचा विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न राहील तेथे त्याचा सर्वांगीण विकास होईल तो केवळ सुशिक्षित न होता सुसंस्कृत होईल असे आमचे स्वप्न आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर उपशिक्षणाधिकारी श्री भावेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी शाळेबद्दल बद्दल चिकित्सक राहणे गरजेचे आहे. 


लहान वयात मिळालेली अनुभवाची शिदोरी ही त्यांचा पुढील मार्ग निश्चित करत असते त्यासाठी शिक्षणाबद्दल पालकांनी काळजी घ्यावी. केवळ स्पर्धा म्हणून शिक्षणाकडे न बघता गरज म्हणून बघा.आधुनिक शिक्षणात होणारा बदल पाहता आपल्या पाल्यांना आपल्याला ओळखता यायला हवे त्याचे अंगभूत गुणांना संधी देता यायला हवी. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर संस्थेच्या संचालिका सौ अनिता चौधरी यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांची मेहनत तसेच विद्यार्थी व पालकांची उत्सुकता याला दाद दिली व पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुप्तगुणांना ओळखून तशी संधी द्या तसेच प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित रहा सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा पालक शिक्षक सभा असो , तसेच आपल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्या पद्धतीने त्यांना संधी दिली जाते याचा मला आनंद असे सांगितले. 


कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर युवा नेते प्रथमेश चौधरी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की पालकांनी केवळ पाल्यांच्या अभ्यासाकडेच लक्ष न देता त्यांच्या अंगभूत कलांना संधी द्या कारण फक्त शिक्षण व्यक्तीला पुढे नेते असे नाही तर त्याला इतर स्पर्धांमध्ये देखील सहभागी व्हायची संधी दिली पाहिजे शिवाय आपल्या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे स्पोर्ट्स गेम जसे की हॉर्स रायडिंग, हॉलीबॉल ,फुटबॉल  टेबल टेनिस  स्केटिंग अशा विविध स्पोर्ट्स चे साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात  येणार आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रेरणास्थान नंदुरबार नगरपालिका प्रथम माजी महिला नगराध्यक्ष सौ.इंदुकाकू चौधरी,संस्थेचे संचालक श्री बलवंत जाधव, श्री संजय सोहनी,हिरा फाउंडेशनच्या संचालिका सौ.प्रणिता चौधरी ,युवा नेते प्रणव चौधरी नगरसेवक श्री.प्रशांत चौधरी ,जय मल्हार न्यूज चे संचालक श्री.शैलेंद्र चौधरी,संस्थेचे सचिव श्री रुपेश चौधरी, प्राचार्य श्री सुरेन्द्र पाटील, मुख्याध्यापक श्री किरण त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते. 


संस्थेच्या अधिनिस्त असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कला महोत्सवात विविध विविध नृत्य प्रकार,नाटिका, एकांकिका अश्या 40 कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले त्यात एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते त्यावेळी समारंभात सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रेरणास्थान सौ. इंदुकाकू चौधरी यांच्याकडून भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री रुपेश चौधरी यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून संस्थेची प्रगती व पुढील वाटचालीची रूपरेषा सादर केली. 


कार्यक्रमाच्या उद्घघाटनाचे सूत्रसंचालन सौ.पल्लवी चौधरी व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री.सुरेन्द्र पाटील यांनी केले तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे सूत्रसंचालन श्रीमती चेतना चौधरी व श्री.सतीश काटके यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरा प्रतिष्ठान अधीनिस्थ सहकारमहर्षी श्री अण्णासाहेब पि के पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर,सौ.ताईसाहेब इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर,संस्कृती शिशु विहार व नूतन बाल मंदिराच्या सर्व प्राचार्य,मुख्याध्यापक,प्राध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)