तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र केदार यांचा होणार गौरव !
कोल्हापूर ( शालेय वृत्तसेवा ) :
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन ( सर फाउंडेशन) यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाउंडेशन नॅशनल २०२२’ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाले आहेत. ‘नवोन्मेष' या प्रकल्पाअंतर्गत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर तज्ज्ञ समितीमार्फत ही निवड केली जाते.
कोल्हापूर मधील विद्या मंदिर यादववाडी (उंचगाव) ता.करवीर या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र केदार यांना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम' या नाविन्यपूर्ण व महत्वाकांक्षी नवोपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.
या पुरस्काराचे वितरण मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या ‘एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स' मध्ये होणार आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ‘कॉन्फरन्स' मध्ये शैक्षणिक विषयावर मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशी मेजवानी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मिळणार आहे. मिळालेल्या या सन्मानामुळे रविंद्र केदार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
त्यांना या नवोपक्रमासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .