सावित्रीमाई फुले हे फक्त नाव नाही. सावित्रीमाई फुले म्हणजे विषमता, मानसिक गुलामी, अधंविश्वास, अज्ञान आणि जबरदस्तीने लादलेले धर्मग्रंथ व त्यांच्या नावाने समाजात समाजात निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून, द्वेषाची, हिनतेची आणि अज्ञानाची व्यवस्था लाथाडून महिलांना मानसन्माना सोबतच शिक्षण संरक्षण बहाल करणाऱ्या सावित्रीमाई फुले ह्या आधुनिक भारताच्या क्रांतिकारक आहेत. भारतीय समाजामध्ये एक गोष्ट आजही जाणवते ती म्हणजे येथे सत्य पचवले जात नाही. अफवा, अज्ञान, अंधविश्वास, विषमता, अनिष्ट रुढीपरंपरा यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा उदोउदो केला जातो. आज जर आपण पाहिले तर ज्या सावित्रीमाई मुळे महिला शिकल्या सवरल्या वाचायला लागल्या घरात घरभर साड्या, अंगावर परफ्यूम फिरायला गाडी नटायला वेगळी रुम सर्व काही भौतीक सुखाचा आनंद येथे महिला घेत आहेत. परंतू आलिशान घरामध्ये, अंधविश्वास, अनिष्ट रुढीपरंपरा दिसतील परंतू सावित्रीमाईचे पुस्तके आणि फोटोही दिसत नाही हे बघुन मनामध्ये सल निर्माण होऊन मनालाच टोचते.
ज्या सावित्रीमाई नी अंगावर घेण घेतले, फाटके लुगडे नेसले, वेळ प्रसंगी अंगावरचे दागिने विकुन मुलींचा सांभाळ केला, विधवा पुर्नविवाह, विधवा मातांना आश्रय देऊन स्त्रियांच्या जिवनात शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणली म्हणून आज अंगावर महागडी साडी आणि परफ्युम आला. परंतु परफ्युम मारताना सावित्रीमाई यांनी अंगावर घेतलेल्या शेणाची महिलांना जाणीव नसेल तर काय म्हणावं. महालांनाच शिकवण्यासाठी सावित्रीमाई यांना येथील धर्म मार्तंडाचा विरोध होता हा विरोध झुगारून सावित्रीमाई फुले यांनी महिलांना शिक्षण देणे सोडले नाही. सावित्रीमाई ची परिस्थिती कल्पना शक्तीच्या बाहेर ची आहे. सावित्रीमाई मुळे शिवायला वाचायला लागलेल्या महिलांना सावित्रीमाई वाचायला वेळ नाही हिच खरी खंत आहे. अर्थात वरिल विधान सर्वच महिलांना लागु होते अजिबात नाही आजही काही महिला आहेत कि ज्या घर संसार सांभाळून मिळालेल्या वेळा मध्ये टिव्ही सिरियल मध्ये गुंतुन न बसता सावित्रीमाई वाचतात त्यांच्या विचाराचा प्रसार प्रचार करतात त्यांना तर वंदन आहेच. परंतु बहुतांश महिलांना सावित्रीमाई बद्दल अजूनही काही माहिती नाही यांची खंत वाटते.
१ जानेवारी ला बहुतांश महिलांनी रात्री बारा वाजता पासुन फेसबुक, व्हाट्सएप, आणि इतर सोशल मिडिया च्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा चा वर्षाव केल्याचे दिसुन येते. नवीन वर्ष या महिलांचे काही बदलु शकते की नाही हे तर माहिती नाही. परंतु १ जानेवारीने महिलांचा इतिहास बदलून टाकला याची जाणीव महीलांमध्ये दिसून आली नाही. १ जानेवारी १८४८ रोजी महिलांची पहीली शाळा राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी सुरु करून महिलांना शिक्षणाचे द्वार खुले केले आणि १ जानेवारी हा महिला शिक्षणाचा पहीला दिवस आहे. परंतु महिला शिक्षणाचा पहिला दिवस, महिलांची पहीली शाळा या विषयी अपवाद वगळता महिलांनी सोशल मिडिया, किंवा इतर ठिकाणी बोलताना लिहताना दिसल्या नाही. थोडा तरी विचार करा १ जानेवारी महिलांच्या जिवनाला कलाटणी देणारा दिवस असुनही महिला या दिवसापासून अनभिज्ञ आहेत तर शिक्षण नेमके म्हणायचे तरी कशाला? अशा वेळी सावित्रीमाई यांच्या दोन ओळीची मुद्दामहून आठवण होते त्या म्हणजे...
ज्ञान नाही विद्या नाही। ते घेणेची गोडी नाही।
बुद्धी असुन चालत नाही। तयास मानव म्हणावे का।
लिहणे वाचणेही नाही। उपदेश पटायचा नाही।
पशुना कळे ते न कळेही। तयास माणव म्हणावे का।
वरिल ओवींचा विचार केला तर शिक्षणाचा अर्थ व गांभीर्य लक्षात येते. ज्ञान म्हणजे फक्त लिहणे वाचने नसुन जागृतता आहे. लिहलेल्या चा अर्थच आजही काहींना कळत नाही म्हणून सावित्रीमाई फुले म्हणतात त्यांना मानव म्हणावे का? बर काहींना समजून सांगितले म्हणजे उपदेश केला जागृती केली तर तेही पटत नाही तर त्यांना माणूस म्हणावे का असा सरळ प्रश्नच सावित्रीमाई करतात.
सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण सुरू करून फक्त मुलींनाच शिक्षण दिले नाही तर त्या एक अभ्यासु, इतिहासाची जाण असलेल्या, सत्य असत्य मधला फरक समजून सत्याचा स्विकार करून सत्यावर स्पष्ट आणि परखड बोलणाऱ्या, आणि समाजाचे हित कशामध्ये आहे त्या गोष्टीची जाणीव समाजाला करून देणाऱ्या सावित्रीमाई फुले या भारतीयांच्या खऱ्या अर्थाने आईच होत्या. आई ज्या प्रकारे मुलाची काळजी घेते त्याही पेक्षा जास्त काळजी सावित्रीमाई फुलेंनी समाजाची घेतली. सत्य असत्याची जाणिव करून देताना सावित्रीमाई फुले म्हणतात..
दुर फेकुनी रुढी द्यारे
परंपरेची मोडून दारे
लिहणे वाचणे शिकुन घ्यारे
छान वेळ आली.. इंग्रजी माऊली आली
भटधर्माच्या क्ल्रप्त्या नाना।
अज्ञानामुळे शुद्रजनांना
पिळती छळती बहु तयांना
पेशवाई मेली.. इंग्रजी माऊली आली
वरिल ओळीमध्युन आपणास शिक्षण कोणी नाकारले, समाजाला कोण पिळले, छळले, अनिष्ट रूढी परंपरा कोणाच्या हिताच्या होत्या हे स्पष्ट होते. परंतु सावित्रीमाई यांनी लिहलेले आजही आमच्या समाजाला, आमच्या स्त्रियांना कळत नाही तेव्हा मनोमन असे वाटते कि खरचं शिक्षणामुळे मानसिक गुलामी नष्ट झाली की फक्त स्वरूप बदलून तशीच आहे हा प्रश्न मनात येतो. इंग्रज शिक्षण देण्यासाठी व माणसाला माणूस म्हणून वागवण्यासाठी तयार आहेत आणि या संधीचा फायदा घेतला तर आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांनी समाजाचा छळ केला ती पेशवाई आता राहली नाही म्हणून योग्य वेळ आहे याचा आपण फायदा करून शिक्षण घ्यावे हा या मागचा हेतु होता. सावित्रीमाई फुले या लेखिका आणि कवियत्री होत्या हे तर आजही लोकांना बहुतांश लोकांना माहीतच नाही. शिक्षण आणि त्यातही इंग्रजी शिक्षणाचे महत्व कीती आहे आणि त्यामुळे काय जिवनात बदल होऊ शकतो हे सावित्रीमाई फुले यांच्या च ओळीमध्युन बघु.
विद्येविन गेले। गेले वाया पशु।।
स्वस्थ नका बसु। विद्या घेणे।।
शुद्र अतिशुद्र। दु:ख निवाराया
इंग्रजी शिकाया। संधी आली।।
इंग्रजी शिकुणी। जातीभेद मोडा
भटजी भारुडा। फेकुनिया।।
विद्या अर्थात शिक्षण नसल्याने अनेक पिढ्यांचे जिवन लयास गेले होते. आपल्या जिवनाचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला शिकणे महत्त्वाचे आहे. जे काही धर्माच्या नावाखाली येथे शुद्र अतिशुद्रांवर अन्याय अत्याचार होत होते ते जर दुर करायचे असेल तर शिकणे आवश्यक आहे. शिक्षणाने विचाराच्या कक्षा रुंदावल्या जातात आणि माणूस जागृत होतो म्हणजे अन्याय अत्याचार सहन करत नाहीत. जातीभेद हा समाजाच्या अज्ञानावर टिकुन आहे. आणि याच जातीभेदाला नष्ट करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून भटजीचे भारुड फेकून दिल्या शिवाय शिक्षणाचा फायदा होणार नाही. सावित्रीमाईला जर आपण अभ्यासले त्यांचे कार्य विचार आणि लिखाण जर बघितले तर आपल्याला जाणिव होईल की सावित्रीमाई यांच्या वर संताच्या विचाराचा सुद्धा प्रभाव होता. कारण संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील बराच सारांश त्यांच्या लिखाणात आपल्याला बघायला मिळतो. पण हा संदर्भ जोडण्यासाठी आम्हाला संत तुकाराम महाराज व सावित्रीमाई फुले या दोघांनाही वाचने आवश्यक ठरते. सावित्रीमाई फुले आपल्या काव्यफुले मध्ये लिहतात की...
नवस करिती। बकरु मारिन
नवस फेडीन। बाळजन्मी।।
धोंडे मुल देती। नवसा पावती
लग्न का करती। नरी नर।।
वरिल ओळींचा विचार केला तर संत तुकाराम महाराज देखील अशाच पद्धतीने समाजामध्ये अंधविश्वासाम नष्ट करण्यासाठी आपले अभंग लिहत होते. समाजातील लोक अंधविश्वास व भोदुगिरी या मध्ये फसलेले असतात. त्यांना बाहेर काढायाचे तर शिक्षण अर्थात जागृती होणे आवश्यक असते. आज आम्ही शिकलो पण जागृत झालो नाही. आजही अनेक ठिकाणी स्वतः ला उच्च शिक्षित समजणारे लोक नवस करतात, कर्मकांड करतात, सावित्रीमाई फुले म्हणतात की जर धोंडे मुल देतात तर महिला आणि पुरुष यांना लग्न करण्याची काय गरज आहे. बकराचा जिव घेऊन कोणता देव मुल जन्माला घालत असेल. मुल होणे ही एक नैसर्गिक प्रक्रीया आहे. त्यामागे विज्ञान आहे. म्हणूनच मुल जन्माला घालायचे तर नर नारी यांचे मिलन आवश्यक असते. असे प्रखर विचार आजही काही लोक ऐकु शकत नाहीत. कारण असे ऐकले तरी त्यांना पाप लागण्याची भिती वाटते. परंपरा सावित्रीमाई फुले यांनी दिडशे वर्षाअगोदर हे समाजामध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला. सावित्रीमाई फुले यांनी दिडशे वर्षापेक्षा जास्त वर्षाअगोदर कर्मकांड, अंधश्रद्धा, विषमता, भेदभाव व अज्ञान या विरोधात आवाज उठवून समाजाला शत्रु आणि मित्राची ओळख करून दिली। महिलांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक उर्जा भरण्याचे काम सावित्रीमाई फुले यांनी केले. पण महिला आजही माणसिक गुलामी मध्ये दिसत आहेत म्हणून घरामध्ये सावित्रीमाई चा फोटो देखील लावण्याची हिम्मत होत नाही. भारतातील प्रत्येक स्त्रिने सावित्रीमाई ला सर्वोच्च स्थान देऊन सावित्रीमाईच्या उपदेशावर चालणे गरजेचे होते परंतु तसे चित्र सध्या तरी दिसत नाही. कारण आजही मानसिक गुलामी मनातून निघालेली नाही हेच दिसते. मानसिक गुलामी का निघाली नाही हे आपण सावित्रीमाई फुले यांच्या च ओळीद्वारे बघुया.
विषम रचीती। समाजाच्या रिती
धुर्तांची निती। अमानव।।
समाजाच्या चालीरीती ह्या आजही विषमता विचार सरणी असलेल्या लोकांच्या हाती आहे. आहे हे धुर्त लोक अमानवीय विचार समाजामध्ये रुजवत असतात. विषमता जर दूर करायची असेल तर धुर्त लोकांना बाजूला सारावे लागेल तरच समाजाचे हित होईल यावर सावित्रीमाई चा विश्वास होता. आपण वरील बाबींचा विचार केला तर शिक्षण म्हणजे फक्त लिहणे वाचने नसुन माणसिक गुलामगिरी झुगारून जागृत होऊन विज्ञानवादाचा स्विकार करणे होय. एवढे महान विचार सावित्रीमाई फुले यांनी अतिशय कठीण परिस्थिती आपल्याला सांगितले परंतु आजही ते सत्य व परखड विचार आजही आमच्या पचनी पडत नाहीत हीच शोकांतिका आहे. ३ जानेवारी हा सावित्रीमाई फुले यांची जयंती दिन. ३ जानेवारी हा महिलांच्या जिवनातील महोत्सव दिवस आहे. नवीन साडी घालणाऱ्या वडाच्या झाडाला फेरे मारणाऱ्या, मंदिरात अनवाणी पायाने चालत चालत जाणाऱ्या महिला ३ जानेवारी ला सावित्रीमाई फुले यांच्या फोटो पुढे दोन फुले ठेवून अभिवादन करतील का हा तर ज्यांच्या त्यांच्या संस्कार, आणि शिक्षणावर अवलंबून आहे. जयंती निमित्त सावित्रीमाई फुले यांच्या विचार व कार्यास वैचारिक वंदन. !
- विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा 9130979300
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .