जवळ्यात जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात; 'मी जिजाऊ बोलतेय' एकांकिका रंगली!

शालेयवृत्त सेवा
0

 श्रावस्ती गच्चे, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, श्रुती मठपती या मुलिंचे झाले कौतूक !



नांदेड  ( शालेय वृत्तसेवा ):

राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात उतरवली. म्हणून त्या स्वराज्यजननी ठरतात . ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला आणि घडवले तद्वतच स्वराज्यालाही जन्म दिला असे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. ते राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, कमलबाई गच्चे, इंदिरा पांचाळ आदींची उपस्थिती होती. 


          राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूष्पपूजन करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, साहेब शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, राजू शिखरे, पांडूरंग गच्चे यांची उपस्थिती होती. त्यानंतर राजमाता जिजाऊंच्या वेषात 'मी जिजाऊ बोलतेय' ही एकांकिका श्रावस्ती गच्चे, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, श्रुती मठपती यांनी सादर केली. यावेळी आनंद गोडबोले, अनुष्का झिंझाडे आणि अक्षरा शिखरे यांची समयोचित भाषणे झाली. 


         यावेळी बोलतांना ढवळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी शिवाजी महाराजांना घडवलं;  तानाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला, हिरोजी फर्जंद, मुरारबाजी यांच्यासह हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली. त्याच विचारांवर स्वराज्याची निर्मिती झाली. जिजाऊ माँसाहेबांचे विचार, संस्कार आजही आपल्याला  बळ, प्रेरणा देत आहेत आणि देत राहतील असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष अंबुलगेकर यांनी केले तर आभार संतोष घटकार यांनी मानले. ग्राम पंचायत कार्यालयातही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुष्पपुजन व धूपपूजन करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)