एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अत्यंत साध्या माणसाची कहाणी..

शालेयवृत्त सेवा
0

 



नसानसात निसर्ग प्रेम,अत्यंत साधा माणूस ..या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात..  अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. 


फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे  रामय्याने खंमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली.रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसांत मोठे वृक्षही होतील.कोण कोणत्या प्रकारचे आहेत हे वृक्ष?रामय्यांनी लावलेल्या झाडांत असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. 


बेल , पिंपळ, कदंब, कडूनिंब, चंदन, रक्त चंदन असे मोठे मोठे वृक्ष रामय्याने लावलेत. त्याचे गाव सगळीकडे हिरवे गार झाले आहे, तेही त्याच्या एकट्याच्या ध्यासातून.सरकारी जमिनीत रक्तचंदनाची झाडे लावून ती मोठी झाल्यावर सरकारतर्फेच लिलावाच्या पद्धतीने विका. म्हणजे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. ही रामय्यांची सूचना सरकारने मान्य देखील केली.


रामय्याची आपल्या कामावर निष्ठा आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फळ आता सगळीकडून त्यांना मिळायला लागले आहे. लोक आता त्यांच्या कामाची वाहवा करायला लागले आहेत. त्यांना आपोआपच नावलौकिक मिळायला लागला आहे.  काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांसोबत त्यांना २०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे.प्रसिद्धीची आस नसलेल्या, धनाची लालसा नसलेल्या, पण निसर्गाची समृद्धी सतत वाढत राहो या उत्कट इच्छेने काम करणाऱ्या या अवलीयाला शतशः प्रणाम..!  


- संतोष द पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)