साने गुरुजी कथाकथन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उत्साही नोंदणी.. २८ डिसेंबरला होणार स्पर्धा

शालेयवृत्त सेवा
0

  

प्रियदर्शिनी विद्यासंकुल येथे :२८ डिसेंबर बुधवार रोजी स्पर्धा



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने साने गुरुजींच्या संस्कार स्मृतींची पेरणी बालमनावर करण्याच्या उदात्त हेतूने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेत नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आलेले होते. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंतरजालावर उत्साही नोंदणी केलेली असून सदर स्पर्धा २८ डिसेंबर बुधवार रोजी पार पडणार असल्याचे नांदेड जिल्ह्याचे साने गुरुजी कथामाला जिल्हा संयोजक तथा गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सांगितले आहे.


नांदेड शहरातील प्रियदर्शिनी विद्यासंकुल, एमजीएम महाविद्यालयासमोर, नमस्कार चौकाजवळ आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक, कवी, अनुवादक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक,  ललित व प्रयोगजिवी कला संकुलाचे संचालक डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते संपन्न  होणार आहे. ज्येष्ठ बालसाहित्यिक पंडित पाटील बेळीकर, प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर साने गुरुजींचा वारसा पुढे चालवणारे प्रसिद्ध कथाकार प्रवीण राऊत, प्रसिद्ध विषयतज्ञ रवी पांडागळे, उपक्रमशील शिक्षक अनुरथ कसबे, सारंग स्वामी हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.


या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी विनाशुल्क होती. सहभागी स्पर्धकांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून पारितोषिके व कौतुकपत्र देण्यात येतील. सोबत साने गुरुजींचे श्यामची आई हे ग्रंथ देऊन गौरविण्यात येईल. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे.


कथा मराठी भाषेतूनच सादर करावी. संस्कारक्षम, बोधप्रद असावी. ५ ते ७ मिनिटांची वेळ एका स्पर्धकास भेटेल. स्पर्धकांनी स्पर्धास्थळी वेळेवर उपस्थित राहावे. सोबत पालकांना आणावे. असे आवाहन जिल्हा संयोजक व्यंकटेश चौधरी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा सहसंयोजक पद्माकर कुलकर्णी, विलास कोळनूरकर, रामेश्वर आळंदे, केशव दादजवार, अक्षय ढोके, सचिन दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)