साने गुरुजींचा वारसा जपण्याची गरज : प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर

शालेयवृत्त सेवा
0

 

साने गुरुजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उदंड प्रतिसाद !




जान्हवी पांचाळ आणि संचिता आष्टेकर प्रथम


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षण क्षेत्रातील माऊली म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांची शिकवण पानापानांतून मिळते. साने गुरुजींच्या शिकवणीचा हा वारसा जपण्याची गरज आहे. प्रत्येक चांगला विद्यार्थी घडण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीही साने गुरुजी समजून घेणे आवश्यक आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलाचे प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केले.


साने गुरुजी कथामाला हेलसच्या वतीने आज प्रियदर्शनी विद्या संकुलात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी पंडित पाटील बेरळीकर, कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कथा स्पर्धेचे जिल्हा संयोजक तथा गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, प्रियदर्शनीचे संचालक बालासाहेब मादसवाड यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले.


उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना पृथ्वीराज तौर म्हणाले की, साने गुरुजी कथामालेतून संस्कारांची शिदोरी कायम जपली जात आहे. खरे तर प्रत्येकाला आपल्या जगण्यातली गोष्ट शोधता आली पाहिजे. त्यातील गमतीजमती शोधता आल्या पाहिजे आणि त्यातूनच भविष्यातील उत्कृष्ट कथाकार, साहित्यिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हेलसकर नावाच्या एका शिक्षकाने सुरू केलेली साने गुरुजी कथामाला आणि जिल्हा कथाकथन स्पर्धा राज्यभर व्यापली आहे. ही व्यापकता साने गुरुजींच्या शिकवणीची साक्ष देते. त्यामुळे साने गुरुजीच्या संस्काराला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आपण आपल्या आई-वडिलांकडे एखाद्या वस्तूसाठी हट्ट करताना ती वस्तू खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या परिश्रमाची जाणीव आपल्यात आली पाहिजे. ही जाणीव आल्यानंतर निश्चितपणे आपण एक उत्तम विद्यार्थी आणि पाल्य घडतो, असेही ते म्हणाले.


कथाकथन स्पर्धेचा समारोप करताना ज्येष्ठ कवी पंडित पाटील बेरळीकर यांनी मुलांना संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील. त्यामुळे ही संधी उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम अ.भा. साने गुरुजी कथामाला हेलसने करून दिली आहे. ही संस्कारांची शिदोरी अशीच पुढे जपण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी कथाकार राम तरटे यांच्या कथाकथनाने उपस्थितांना खिळवून ठेवले.


दरम्यान, जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे उद्घाटन, साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन आणि दीप प्रज्ज्वलन डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते संपन्न झाले. कथाकथन स्पर्धेचे परीक्षण प्रवीण राऊत, रवी पांडागळे, अनुरथ कसबे, सारंग स्वामी, केशव दादजवार, अक्षय ढोके, पद्माकर कुलकर्णी, सचिन दिग्रसकर, विलास कोळनूरकर यांनी केले. कथाकथन स्पर्धेचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक तथा गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. ते म्हणाले की, साने गुरुजी अखिल भारतीय कथामालेच्या माध्यमातून राज्य स्तरावर साने गुरुजी कथाकथन स्पर्धा आयोजित करत साने गुरुजींच्या सांस्कृतिक शिकवणीची परंपरा पुढे जोपासण्यात येत आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी साने गुरुजी यांच्या विचाराशिवाय अन्य पर्याय नाही आणि त्यामुळे साने गुरुजींचा विचार पुढे नेण्यासाठी ही कथामाला महत्त्वपूर्ण आहे असेही ते म्हणाले.


या कथाकथन स्पर्धेला जिल्हाभरातील विविध शाळांतील स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बाल आणि किशोर गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.





कथाकथन स्पर्धेवर मुलींचा ठसा :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलसच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकचन स्पर्धेत बाल गटातून कु. संचिता सुभाष आष्टेकर हिने प्रथम, कु. अनुष्का काळवा मेहेत्रे द्वितीय तर कु. शर्वरी शंकरराव वडवले हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. किशोर गटातून कु. जान्हवी भुजंगराव पांचाळ प्रथम, कु. ज्योती साहेब मिरकुटे द्वितीय तर कु. धनश्री भारत देवकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय येण्याचा बहुमान मिळवत मुलींनीच या स्पर्धेवर आपला उसा उमटविला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)