वरुळ जि. प. शाळेची शैक्षणिक सहल नाशिक व सापुतारा येथे उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 शैक्षणिक सहलीत विद्यार्थीहीसह पालक, गावचे सरपंच सुद्धा सहभागी !



नंदुरबार ( गोपाल गावित ) :

नंदुरबार तालुक्यातील शिंदे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुळ शाळेची शैक्षणिक सहल नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड व गुजरात राज्यातील सीमेवर असलेले थंड हवेचे ठिकाण सापुतारा येथे आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीचे नावीन्य म्हणजे  या शैक्षणिक सहलीत फक्त विद्यार्थी न राहता पालक, गावचे सरपंच सुद्धा  सहभागी झाले होते. 


विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा विकास करणे, त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनाशक्तीला वाव मिळावा तसेच शालेय गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांचा सामाजिक, शैक्षणिक व भावनिक विकास करणे ही देखील शाळेची महत्त्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना पालकांचा शाळेशी क्रियाशील सहभाग असणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती ही पालकांवर बहुदा अवलंबून असते. 


वरुळ गावात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असून पालक मजूर वर्गातील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी तसेच पालकांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक  यांच्यातील आंतरक्रिया मजबूत झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही शैक्षणिक सहल विद्यार्थी, पालक व गावचे सरपंच यांच्यासोबत आयोजित करण्यात आली होती. या सहलीमुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील अंतरक्रिया वाढण्यास खूप मदत झाली. त्यांच्यातील संबंध मैत्रीसारखे झाल्यामुळे विद्यार्थ्यांविषयी किंवा त्यांच्या स्वतःच्या काही अडचणी असतील तर त्या शिक्षकांसोबत चर्चा करू लागले. यामुळे शिक्षकांना सुद्धा पालकांच्या अडचणी समजून घ्यायला मदत झाली. विद्यार्थ्यांच्या विकासात येणारे अडथळे समोर आल्यामुळे त्यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षकांना या सहलीमुळे एक नवीन दिशा मिळाली.


सहलीला सुरुवातीला सप्तश्रृंगी गडावर जाऊन सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन घेतले. तेथील इको पॉईंट पाहण्याची संधी विदयार्थ्यांना मिळाली. निसर्गातील विविधता डोंगर, दरी जवळून पाहण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी सापुतारा येथे मत्सालय संग्राहलयातील विविध प्रकारची मास्यांचे निरीक्षण करता आले. विद्यार्थी बोटींगमध्ये बसून आस्वाद घेत होते. संग्रहालयात अदिवासी संस्कृतीतील विविध कला साहित्य पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. गार्डन परिसरातील फुलांचे, वनस्पतींचे निरीक्षण करता आले. 


सहलीचे नियोजन नंदुरबार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत चौरे, शिंदे केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंजय ठाकरे, गावचे सरपंच गुलाब वळवी, मुख्याध्यापक अनिल माळी व सहशिक्षक दयानंद जाधव यांच्या सहकार्यातून पार पडली. सदरील सहलीत माता-पालक गीताबाई भिल, शर्मिलाबाई ठाकरे, बसूबाई भिल, पाराबाई वळवी, राजू वळवी, परशुराम भिल, संजय भिल, सुनील ठाकरे, सरीबाई वळवी, मिथुन ठाकरे, रोशनी वळवी, ताईबाई भिल, इमाबाई भिल, साईनाथ वळवी, गणेश भिल, उनेश ठाकरे,इत्यादी पालक सहभागी झाले होते. नवापूर येथील शिक्षक योगराज भामरे यांनी स्वखर्चाने  सर्वांना  स्वादिष्ट रुचकर भोजन दिले.

वाचा:तारांगणाचे निमित्त ज्ञान… विज्ञानाची झेप 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)