बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने.घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने. दिले मृतांना संजीवन तू केल्या दूर निराशा.तू ज्ञानाचे गाणेभाऊ तूच सूर्याची भाषा. तमो युगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा.काही माणसं एकट्याने मोठी होतात. काही माणसांना समाज मोठा करतो. तर काही माणसांमुळे समाज मोठा होतो. ज्या माणसामुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या परंपरेत अभिमानानं ज्या नावाचा उल्लेख करावा वाटतो ते नाव म्हणजे शिक्षणमहर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख.
बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमलयापेक्षा उत्तुंग आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती."चिखलात पाय आणि पायात काटा,अशाच वाटा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाट्याला असतात" या वास्तवाचे भान असलेल्या भाऊसाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी २७ डिसेंबर १८९८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, भाऊसाहेब हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे. त्यामुळे त्यांनी पंजाबरावांना चांगले वळण लावले.
पापळला १८७४ ला त्यांची शाळा सुरु झाली. १९०६ ला त्याना शाळेत टाकण्यात आले. तेव्हा ते ७ वर्षाचे होते. शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यंच्या वडिलांनी घरीच एका शिक्षकाची राहण्याची व्यवस्था केली. गोसावी गुरुजींचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला. मराठी, व्याकरण व गणित त्यांचे फार चांगले होते. ते कुशाग्र बुद्धीचे निग्रही होते. नियमितपणा, आज्ञाधारकपणा मनोनिग्रह त्यांच्या स्वभावात रुजू लागले. रेखीव पोषाखाची व निटनेटकेपणाची त्यांना गोडी होती. गावात तिसर्या वर्गा पर्यंत शाळा होती. चौथा वर्ग नसल्यामुळे एक वर्ष पुन्हा तिसऱ्या वर्गात शिक्षण घ्यावे लागले. पुढे भाऊसाहेबांचे आजोळ सोनेगाव च्या जवळ असलेल्या चांदुर रेल्वेच्या प्रार्थमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला. माध्यमिक शिक्षण कारंजा लाड येथे तर मॅट्रिकचे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून पूर्ण केले. पुण्याला फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमीडिएटचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी आपल्याला इंग्लंडला जायचे असे त्यांनी मनाशी पक्के ठरविले.
इंग्रजीतून भाषण व लेखन करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. पाश्चात्य संस्कृती, शिष्टाचार, चालीरीती व सभ्यता याचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यांनी इंग्लडला जाण्याची गोष्ट घरी काढली तेव्हा आई व काकांनी त्यांची ही कल्पना उचलून धरली. त्यांना वाटले आपला मुलगा कीती मोठा झाला आहे की तो आता परदेशात जात आहे. त्यांना त्याचा फार अभिमान वाटला. पण त्या खर्चा साठी शामरावांना संपूर्ण शेती गाहाण टाकून पैसा उभा करावा लागला. २१ ऑगष्ट १९२० रोजी पंजाबराव एस. मलोत्रा यांच्या बोटीने ७ सप्टेंबर १९२० ला इंग्लंडला पोचले. ते कॉलेज मध्ये प्राध्यापक व विध्यार्थ्यान सोबत फार जिव्हाऴयाने वागत. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबराव अभ्यास करून उच्च विद्याविभुषीत झाले. डॉ.पंजाबराव १५ जुलै १९२६ रोजी मुंबई गेट वे ऑफ इंडीयावर उतरले. अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात ही घटना सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशीच होती.
शामराव देशमुख या सामान्य शेतकर्याने आपला मुलगा सातासमुद्रापलीकडे पाठवावा आणि हा सहा वर्षात विद्याविभूषीत होऊन विद्येचा डॉक्टर होऊन परत यावा यापेक्षा मातोश्री राधाबाई व शामरावाना कोणता आनंद हवा होता? डॉ. पंजाबराव देशमुख पापळला आले या बातमीने सारा वर्हाडचा आसमंत फुलला. ठिकठीकाणी त्यांच्या सत्काराचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिक्षणामुळे होणारी दैना,अज्ञान, निरक्षरता हा शाप समाजाला आहे. हे त्यांनी ओळखले होते म्हणून त्यांनी श्री. शिवाजी मराठा हायस्कूल काढण्याचा निर्णय घेतला. १जुलै १९२५ हा दिवस अमरावतीच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा व सुवर्ण अक्षराने लिहावा असा ठरला. गोपाळराव देशमुखानच्या आवारात एका शेड खाली शाळा सुरू झाली एक महिन्याच्या आतच सरकार मान्यता मिळाली,पण मराठा समाजात पदवीधर तरुणांचा तुटवडा असल्याने हे विद्यालय चालविणे फार कठीण बाब होऊन बसली होती. ह्या विद्यालयात एम.ए.ऑनर्स, डी फिल्ड, बार-ऑट-लॉ असा विद्या विभुषीत महामानव शिक्षक म्हणून विना वेतन काम करणारे डाॕ.पंजाबराव देशमुखासारखे शिक्षक लाभले.
आपल्या अगाध ज्ञांनाचा उपयोग मराठा पिढीतील तरुणांना शिक्षणात प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केला. त्यांनी श्रद्धानंद बोर्डींगची स्थापना केली. समाजातील बौद्ध, मांग, चांभार, मुसलमान असे सर्व विद्यार्थी त्यांनी बोर्डिंग मध्ये जमा केले. हे एक क्रांतिकारी पाउल होते.सार्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण देऊन हजारो विद्यार्थी बाहेर पाठविले. हि त्यांची कितीतरी दैदिप्यमान क्रांती होती!शिक्षणा सोबत विद्यार्थी मजबूत व सुदृढ बनावेत असे त्याना वाटे.या साठी त्यांनी १९२६ साली श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली.ते कर्ते समाज सुधारक होते.
प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांडपांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते. तर ते होते कृतीनिष्ट.बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Baristar होते.
भाऊसाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार म्हणून अख्ख्या जगाने ज्यांचा गौरव केला असे दोन भाऊ-त्यात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत.देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी १९३१ मध्ये अमरावती येथे केली.यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास भारतीय शेती शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ' हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले.बहुजनांच्या शिक्षणातील अडचण ही प्रतीगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे. ही मनुवादी विचारधारा नेस्तनाभूत करण्यासाठी अखंड प्रयत्न केले.शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी "जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा" हा मंत्र दिला.
देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला शेतकऱ्यांसाठी ‘जागतिक कृषि प्रदर्शनाचे" आयोजन केले.तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे.ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.शिक्षण,शेती,सहकार, अस्पृश्यउद्धार,जातीभेद निर्मुलन,धर्म इ.विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले.ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ट असल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा ,दैववाद, अवैज्ञानिकता ,देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते.तसेच ब्राम्हणी वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवतो हे त्यांनी अनुभवले होते. खऱ्या अर्थाने भारतातील बहुजन समाज हा गुलामगिरीच्या शृन्कलांनी जखडलेला होता आणि १०% शेटजी,भटजी,लाटजी हा वर्ग सरकारी वर्ग नोकऱ्या,उच्चपदे,सोयी सवलतीचा लाभ घेत होता.जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान,दारिद्र्य,पारतंत्र्य यासाठी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले.
१९२७ सालच्या मोशी येथील हिंदुसभेच्या अधिवेशनात माईकचा ताबा डॉ.पंजाबराव देशमुखांनी घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा निषेध ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, "आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवरणासारख्या सुधारनाच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत.चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन दुरुस्त झाला नाही तर तो रांजनच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही." असे क्रांतिकारी विचार त्यांनी वेळोवेळी मांडले.डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला.पण भाऊसाहेब डगमगले नाहीत.
आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी आपली चुलत बहीण आक्काराणी साहेब यांचा विवाह इंदोरचे तुकोजी होळकर यांच्या सोबत लावून दिला आणि मराठा धनगर हे दोन्ही समाज एकच आहेत अशा प्रकारचा पुरोगामी विचार मांडून शंभर आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु.विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले.त्यांनी १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले. देशातील संपूर्ण देवस्थानाची संपत्ती सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्या संपत्तीचा उपयोग बहुजनांच्या शिक्षणासाठी करावा अशा प्रकारचा परिवर्तनवादी विचार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मांडला.
भाऊसाहेबांनी डॉ.बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता.भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता.ते म्हणत ,"मूर्तीत देव असेल तर देवाची मूर्ती घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल."
खरोखरच आजही त्यांचे विचार कीती आधुनिक आहेत. ओबीसीसाठी धडपडणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबानी ओबीसी च्या आरक्षणाच बील मांडल.त्याला सरदार वल्लभाई पटेल यांनी विरोध केला.ते म्हणाले "हे ओबीसी कोण आहेत? आम्ही तर sc,st लाच मागासवर्गीय समजतो".
बाबासाहेबांना समजलं की ओबीसी च्या आरक्षणाला विरोध होणार म्हणून बाबासाहेबानी ओबीसी च्या सर्व नेत्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं मी sc आणि st साठी आरक्षणाचा ड्राफ्ट तयार केला आहे.मला ओबीसी च्या आरक्षणाचा ड्राफ्ट तयार करायचा आहे.पण मी ओबीसी नसल्यामुळे मला तुमच्या आरक्षणाची मागणी करता येणार नाही म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे.त्यावेळेस ओबीसी चे नेते म्हणाले,"आम्हाला मांगा महाराच्या पंक्तीला बसायचं नाही,आम्हाला सध्या आरक्षणाची गरज नाही." पण बाबासाहेब दूर दृष्टीचे होते.त्यांनी विचार केला मराठा समाज जरी जमिनदार असला तरी सर्व मराठा बांधवांकडे जमिनी नाहीत.ओबीसी जमिनदार असला तरी सर्व ओबीसी, बांधवांकडे जमिनी नाहीत.अशा लोकांसाठी बाबासाहेबानी 340 कलम लिहील आणि जेव्हा यांना आरक्षणाची गरज पडेल तेव्हा त्यांची खानेसुमारी काढावी व त्यांना आरक्षण द्याव अशी घटनेत नोंद केली.काही लोक म्हणतात आंबेडकरानी कुठ काय केल आमच्यासाठी. मित्रांनो संविधानात आपल्या संवर्गासाठी काय मागणी करायची यासाठी संविधान सभेच्या निवडणुका होत्या. त्यात संपूर्ण भारतातून ओबीसीचे तीन नेते होते अमरावतीचे पंजाबराव देशमुख, यवतमाळचे तुकाराम गडाख आणि उत्तर प्रदेश चौराशिया. मिञानो पंजाबराव देशमुख आणि डाॕ.आंबेडकर मिञ होते.
पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे भेट घेण्यासाठी गेले.त्यावेळी ओबीसी चा ड्राफ्ट तयार केलेला होता .पंजाबराव देशमुख आमचा मराठा समाज ओबीसीत टाका हे सांगण्यासाठी गेलेले होते.बाबासाहेब म्हणाले या दादासाहेब बाबासाहेब पंजाबरावांना दादासाहेब म्हणायचेआणि पंजाबराव बाबासाहेबाना बाबासाहेब म्हणायचे.मोठ्या माणसाना जात,पात धर्म नसतो.आपल्याकडे गल्लीबोळात जात,पात धर्म असतो.मोठी माणस तशी नसतात ती प्रजेची असतात.आणि बाबासाहेब पंजाबरावांना म्हणाले दादासाहेब मी बसून बसून जरा थकलेला आहे,मी जरा फीरुन येतो.तुम्ही तो पर्यंत मी हा ड्राफ्ट तयार केलेला आहे. त्यावर थोडी नजर फिरवा.बाबासाहेब बाहेर गेले पंजाबरावाने ड्राफ्टवर नजर फिरवली आणि डोळ्यातून टपटपा अश्रू गळायला लागले.तेवढयात बाबासाहेब आले आणि म्हणाले दादासाहेब तुमच्या डोळ्यात अश्रू पंजाबराव म्हणाले, "बाबासाहेब तुम्ही फार मोठ्या दिलाचे राजे आहात,खूप मोठ्या मनाची माणसे आहात."बाबासाहेब म्हणाले,"मी अस काय केलय? दादासाहेब".पंजाबराव म्हणाले मी आपल्याकडे माझ्या मराठा समाजाला .ओबीसीत टाका म्हणून सांगायला आलो होतो ते काम तुम्ही आधीच करुन ठेवलं आहे.म्हणून तुम्ही खुप मोठे आहात.
विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय त्यांनी सुरू करून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेली.जीवनात प्रत्येक क्षेत्रांत क्रांती करनार्या या महापुरुषाने जगभर भ्रमण केले. इटली, रोम, जर्मनी मध्ये प्रवास केला. भारताच्या संसदेत अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले. प्रत्येक क्ष्रेत्रांत विचार पूर्वक पाउल टाकले.सतत चिंतन,मनन, व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी झटणारे त्यांचे मन होते. १० एप्रिल १९६५ रोजी रात्री ११.३० वाजता दिल्ली येथील विलिंग्डन हॉस्पिटल मध्ये त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या जयंती निमित्त भारत मातेच्या या महान सुपूञास विनम्र अभिवादन! व त्यांना कोटी कोटी प्रणाम!
- शंकर नामदेव गच्चे ,नांदेड
मोबाईल नंबर -८२७५३९०४१०
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .