वनभोजनातून चिमुकल्यांनी घेतला निसर्गशाळेचा आनंद! | Nature School

शालेयवृत्त सेवा
0

 


जवळा जि.प. प्राथमिक शाळेची निसर्गशाळा ; निरीक्षणासह घेतला खिचडी भजे आणि  रानमेव्यांचा आस्वाद!


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

'बिन भिंतीची उघडी शाळा

लाखो इथले गुरु

झाडे, वेली, पशू-पाखरे

यांच्या गोष्टी करु'

या गदिमांच्या निसर्ग कवितेप्रमाणे शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. कोरोनाचा प्रमाव असल्याने गेल्या दोन वर्षे  शाळा बंदच होती. शाळा बंद असल्यामुळे सर्व शालेय व सहशालेय उपक्रम स्थगित करण्यात आले होते.  आता ह्यावर्षी जिल्हा परिषदेच्या जवळा दे. येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला. 


मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, मिमीक्री, प्राण्यांचे हुबेहुब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मनोरंजक व मैदानी खेळात सहभाग घेतला. तसेच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, वापरण्यात येणारी पारंपारिक अवजारे व शेतीच्या पारंपारिक तथा आधुनिक पद्धती यांची प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्यात आले. विविध इयत्तांच्या व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभती दिल्या. सौर ऊर्जा पॅनलचा सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. निसर्ग शाळेत एकूण ५४ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.

शिक्षकांनी शेती करण्याच्या पद्धती व अवजारे यांच्याविषयी माहीती दिली. बैठे व मैदानी खेळ घेतल्यानंतर हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी भजांसह रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष मध्यान्ह भोजनावर ताव मारला. सदरील उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, सहशिक्षक एस.एम. घटकार यांनी केले होते. तर मनिषा गच्चे, हैदर शेख, मारोती चक्रधर, रतन टिमके, संघरत्न गोडबोले, साईनाथ गोडबोले, चंद्रकांत गोडबोले, शुभम गोडबोले, सत्यजित गोडबोले, अभिजित गोडबोले, विठ्ठल तोटकुलवार आदींनी परिश्रम घेतले.



काय पाहिले?


सौर ऊर्जा पॅनल, त्याची कार्यपद्धती औषधीयुक्त वनस्पती, पाण्याचे विविध स्त्रोत, रब्बी हंगामातील जोंधळा, मक्का, भुईमुग, गहू, गवत हरभरा, हळद आदी पिकांची शेते, विविध फळांची झाडे, मातीचे प्रकार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच कालव्याद्वारे पाणी पुरवठा, पाटाचे पाणी, गांडूळ खत प्रकल्प, रानटी झुडपे, विविध पक्षी आणि त्यांचे आवाज, घरटी, विविध रानभाज्या आदीं बाबींचे निरीक्षण करण्यात आले. तसेच शेंगा, बोरं, ऊसाची टिपरे, पाडाचे पेरु, मधमाशांचे पोळे या रानमेव्यांचा आस्वाद घेतला.

वाचा: क्षेत्रभेटीचा अनुभव 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)