नागापूर ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद शाळेस अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट

शालेयवृत्त सेवा
0

विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना याचा होणार उपयोग  !




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोविड काळानंतर लक्षणीय प्रमाणात विद्यार्थी संख्या वाढलेली दिसत आहे. कोविड काळात न परवडणारी इंग्रजी शाळांची फीस तसेच ऑनलाईन अभ्यास पाहता अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. याचाच परिपाक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणात्मक, संख्यात्मक वाढ व विकास होताना दिसून येत आहे. 


ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्यांना गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश दिल्याने पालकांचे शाळांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष जात आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे पालकांचा शालेय व्यवस्थापन तसेच इतर कार्यक्रमात लोकसहभाग वाढताना दिसत आहे. यातूनच शाळेला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा शाळेत असाव्यात यासाठी पालकदेखील तितकेच आग्रही झालेले आहेत. शाळांना गेल्या दोन वर्षांपासून PFMS प्रणालीने संयुक्त अनुदान वितरित करण्याच्या प्रयत्नात काही शाळांना दोन्ही वर्षांचे अनुदान मिळाले नसल्याने अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी स्वतः आपल्या पदरच्या पैशातून शाळेस आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. 


प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांनीदेखील आपली पदरमोड करून शाळेस निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील प्रत्येक शाळेस ग्रामपंचायत तर्फे वित्त आयोगाच्या अनुदानातून काही निधी जिल्हा परिषदेच्या शाळेस खर्च करणे बंधनकारक केलेले असल्याने तिथूनही शाळांना निधी उपलब्ध होतो आहे. याच पार्श्वभूमीवर नागापूर ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथे अद्ययावत साऊंड सिस्टीम देण्यात आलेली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठ, बालसभा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना याचा उपयोग होणार आहे. 


नागापूर शाळेस मिळालेल्या या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधावा अशी अपेक्षा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक अक्षय ढोके यांनी यावेळी सरपंच व्यंकटराव पांचाळ तसेच ग्रामसेवक जाधव यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)