भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी गुरुजींनी भरवला गणितीय बाजार !

शालेयवृत्त सेवा
0

 
स .भु .प्रशाला कुंभार पिंपळगाव च्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे थोर गणितज्ञ रामानुजन यांना अनोखे अभिवादन. !



जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

थोर गणितज्ञ रामानुजन यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने श्री स .भु .प्रशाला कुंभार पिंपळगाव तालुका घनसावंगी जि. जालना येथे गणितज्ञ रामानुजन यांना अभिवादन करण्यासाठीअनोखा उपक्रम राबवला .विद्यार्थ्यांना अनुभवातून गणित कळावे यासाठी गणितीय बाजार भरवला .


      सरस्वती भूवन प्रशालेत गणितीय बाजार, गणिती-वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, गणितीय भित्तीपत्रके स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी थोर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन  यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय गणित दिन' साजरा करण्यात आला.


       यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक सुभाष देठे, प्रभारी पर्यवेक्षक चंद्रशेखर पाटील, ज्येष्ठ शिक्षक महेश बहाळकर यांनी थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आजच्या कार्यक्रमात १६ गणिती-वैज्ञानिक रांगोळ्या, १० भित्तीपत्रके आणि व्यवसायातून शिक्षण, अनुभवातून शिक्षण व व्यवहारातून शिक्षण या उद्देशाने भरवलेल्या ८० गणितीय बाजारात दुकाने होती. ज्यांचा एकूण व्यवसाय २५ हजारांचा झाला. 


        या गणितीय बाजारात विद्यार्थ्यांबरोबरच गणेश चव्हाण, संतोष सवडे, मनिषा चव्हाण या शिक्षकांनीही आपले स्टॉल्स् लावले होते तसेच त्यांना झालेला नफा २०२०रू. शाळेला दिले. वैभव बागल, वैष्णवी सुरासे, अदिती कंटुले, गौरी कोठेकर या विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानूजन यांच्या जीवनकार्याविषयी मनोगते व्यक्त केली. गणितीय बाजारातील स्टॉलधारक ज्ञानेश्वरी कंटुले, सुजल हिवाळे, ऋतुजा शहाणे, अरमान तांबोळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपापल्या व्यवसायात गुंतवलेले भांडवल, झालेली विक्री आणि त्यातून झालेला नफा किंवा तोटा याविषयीचे अनुभवकथन केले. 


      त्यानंतर प्रमुख पाहुणे उपमुख्याध्यापक सुभाष देठे यांनी व्यवसायाभिमूख शिक्षणाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी विविध उदाहरणांद्वारे व्यवसायाची हातोटी व सचोटी कशी शिकावी हे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधाकर येवतीकर, सूत्रसंचालन भूषण पाटील आणि आभारप्रदर्शन योगेश अंभुरे या शिक्षकांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्वच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)