मानव विकास कार्यक्रमांतर्गत 147 मुलींना सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले ( भाप्रसे ) यांचे हस्ते सायकल वाटप

शालेयवृत्त सेवा
0

 


सायकल वाटप : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते 12 मध्ये शिकणाऱ्या 147 मुलींना सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले, भाप्रसे यांचे हस्ते  सायकल वाटप  करण्यात आल्या. यावर्षी या योजनेतून संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त सर्वप्रथम सायकल वाटपाचा मान या विद्यालयाने मिळविला आहे.


         यावेळी मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी तहसिलदार डॉ. मृणाल जाधव म्हणाल्या की, मुलींनो मानव विकास योजनेतून सायकल मिळाल्याने शाळेत ये-जा करण्याचा तुमचा वेळ वाचेल. तेव्हा चांगला अभ्यास करून मोठं व्हा. आपल्या परिसरातील बालविवाह थाबवा. तसेच मुलींनो आपल्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हा महिला अधिकाऱ्यांकडे बिनधास्त मांडा.


              याप्रसंगी संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके , प्राचार्या शुभांगीताई ठमके , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ चटलेवाड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. 

           गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी प्रास्ताविक केले. मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य शेख हैदर यांनी आभार मानले.

      

 "जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सह अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन अधिकारी सु. आ. थोरात व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात किनवट तालुक्यातील 35 शाळांतील 1132  विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात गतवर्षी 35 सायकली वाटप केल्या. त्या मुली नियमीत शाळेत येऊ लागल्या. आज सर्व समाजातील 147 मुलींना सायकली मिळाल्याने त्यांच्यासह पालकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता. हे या योजनेचं फलित आहे.

-अनिल महामुने,  

गट शिक्षाधिकारी , पं.स., किनवट "



        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  उपप्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक संतोषसिंह बैसठाकूर, किशोर डांगे, प्रमोद मुनेश्वर , प्रफुल्ल डवरे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)