विवाहित महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय

शालेयवृत्त सेवा
0

 महत्वाचा शासन निर्णय




महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१" मधील नियम क्र. २ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. सदर नियमातील क्र. २ (३) (तीन) अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू- सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये “महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्याची निवड करता येईल” अशी तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात सदर बाबत दिनांकासहीत नोंद असणे आवश्यक आहे.


तथापि, शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, बरेचदा विवाहीत महिला शासकीय कर्मचारी “तिच्या आई-वडीलांची किंवा तिचे सासू-सासरे यापैकी एकाची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता निवड केली आहे” असे त्यांच्या कार्यालयास संबंधितांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी केल्यानंतर कळवितात. तसेच अनेकदा याबाबतच्या सेवापुस्तकातील नोंदीत सदर नोंद कोणत्या दिनांकापासून घेण्यात आली आहे, याचा उल्लेख नसल्याने संबंधित वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचे प्रकरण निकाली काढताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे याबाबत नव्याने स्पष्ट आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :

आता, सदर शासन निर्णयान्वये खालील आदेश देण्यात येत आहेत.


(अ) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यापूर्वी “त्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता निवड केली आहे” असे अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालयास लेखी कळविणे बंधनकारक आहे.

(ब) उपरोक्त (अ) संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने त्या महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात अर्जाबाबत दिनांकासहीत नोंद घेणे बंधनकारक आहे.

हेही वाचा -शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत.

शासन निर्णय क्र.वैखप्र-२०२२/प्र.क्र.१७५/राकावि.२, १४ डिसेंबर, २०२२.

(क) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिने “आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी ती करीत आहे”, असे ज्या दिनांकास कळविले आहे, त्या दिनांकापासून केवळ पुढील कालावधीत संबंधितांनी ((१) आई-वडील किंवा (२) सासू-सासरे या दोघांपैकी एक यांनी) घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपुर्ती शासनाकडून करण्यात येईल. म्हणजेच ज्या कालावधीतील उपचार खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी विवाहीत शासकीय महिला कर्मचारी करीत आहे, त्या कालावधीत संबंधितांच्या सेवापुस्तकात सदर व्यक्तीची (१) आई-वडील किंवा (२) सासू-सासरे या दोघांपैकी एक यांची) नोंद असणे आवश्यक आहे.

(ड) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी वरील (अ) प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा कालावधीत त्याच्यात कसलाही बदल करता येणार नाही. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.


हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांनादेखील लागू करण्यांत यावा, मात्र यापुर्वीच निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरु करण्यांत येऊ नये. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)