कर्मयोगी संत गाडगेबाबा..

शालेयवृत्त सेवा
0

 


[ 20 डिसेंबर...संत गाडगे महाराज पुण्यतिथी  त्यानिमित्त लेख देत आहोत - संपादक ]



महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार... संत गाडगेबाबा.. हे एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक होऊन गेले. 

जन्म शेणगाव (जि. अमरावती) येथे परीट जातीत 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना गोधडे महाराज' किंवा  गाडगे महाराज म्हणूनच ओळखत. 1912 मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला. परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.


लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता.


चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.


स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात, परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.


लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या. तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.


अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली. संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.


समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.


संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांमध्ये होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते, जनसंपर्क होता, सुशिक्षित समाजथरातील काही लोकं स्त्रिया आणि अतिशूद्र या सर्वांना तुच्छ समजला जात होता. स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र करून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे गावून घेत होता. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहत होती. अशा महामानवाने...
20 डिसेंबर 1956 रोजी अमरावती मधील ऋणमोचन येथील पेढी नदीवर आपला देह ठेवला, आणि या जगाचा निरोप घेतला.


संत गाडगे महाराजांचे अनमोल विचार...

● देव दगडात नसून तो माणसांत आहे.

● अडाणी राहू नका,
मुला - बाळांना शिकवा.

● आई - वडिलांची सेवा करा.

● जो वेळेवर जय मिळवितो तो जगावरही जय मिळवतो.

● दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.

● दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.

● दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.

● धर्माच्या नावाखाली
कोंबड्या - बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देऊ नका.

● माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आहेत,
आई - वडील.

● माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.

● विद्या शिका आणि गरिबांना विद्येसाठी मदत करा.

● शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.

● शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण या जगात कशासाठी आलोत हे कळते.

● सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले फक्त चपाती चोर.

● हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले. अशा या महान समाजसुधारकास विनम्र अभिवादन...!

( संकलित )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)