नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित, प्रमोदकुमार पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार, सतीश चौधरी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद नंदुरबार , गणेशदादा पराडके शिक्षण सभापती, जिल्हा परिषद नंदुरबार यांना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिक्षक अमीर सैय्यद, अनिल पाटील, नितीन वाघ, संदीप राकडे, शिवदास साळुंके, योगेश पुंडे, अशोक महाजन आदी उपस्थित होते. विषय : - १ ) शालेय क्रीडा स्पर्धेतील खेळ प्रकाराच्या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत. २ ) शिक्षणसेवक यांना नियमित शिक्षकांची वेतनश्रेणी लागु करणेबाबत. ३ ) सी.एम.पी.प्रणालीनुसार ०१ तारखेस वेतन अदा करणेबाबत. संदर्भ : - १ ) महाराष्ट्र शासन , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्र.राक्रीधो २०१८ / प्र.क्र .७२ / क्रीयुसे -२ दि . १६ सप्टेंबर २०२२ . २ ) महाराष्ट्र शासन , शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र.पीआरई / ३३ ९ ५ / २०२२ दि .२७ / ०२ / २००३ , महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा विभाग तथा जिल्हा परिषद नंदुरबारमार्फत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विविध खेळांचा केंद्रस्तरावर , तालुका स्तरावर , जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत शासन परिपत्रक असतांना देखील जिल्हा परिषदेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे .
डिसेंबर २०२२ अखेर विद्यार्थ्यांच्या , शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करुन त्यांच्यातील कलागुणांना वाव देणेसाठी आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे.जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्व असुन संस्कृती , परंपरा , सुदृढतेचा , मुलमंत्र , आनंदी व उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी खेळातील सक्रीय सहभाग आवश्यक आहे . शालेय जीवनात विद्यार्थी खेळाडुंचा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम , स्पर्धा आयोजित करण्यात येतात. क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी खेळ आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा बाबत सविस्तर माहिती मिळावी हा उद्देश आहे .
शासनाने क्रीडा धोरण जाहीर करुन त्याद्वारे महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा उद्देश समोर ठेवला आहे . त्याअनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी यांच्याकरीता विविध योजना आखुन त्याची अमंलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे केली जावी . भविष्यात शालेय विद्यार्थ्यांचा खेळाद्वारे विकास होत असताना त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगती करीता आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय तसेच राज्य स्पर्धेमध्ये प्राविण्य व सहभाग घेतला जावा. तसेच निवेदनासोबत असलेल्या २२ शिक्षण सेवकांनी ३ वर्ष सेवेचा कालावधी समाधानकारक पूर्ण केला आहे . तसेच संबंधित शिक्षणसेवकांनी तरतुदीनुसार विहीत कालावधीत संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र देखील सादर केले असून त्यांनी डी.एड्.अभ्यासक्रमही पूर्ण केलेला आहे.२२ शिक्षण सेवकांना तात्काळ नियमित शिक्षकांची वेतनश्रेणी लागु करणेबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे.
तसेच शासनाचे जि.प.शिक्षकांचे दि.१ ते १० तारखेच्या आत दरमहा वेतन अदा करावे असे परिपत्रक असतांना देखील नंदुरबार जि.प.प्रशासनाकडून सदर परिपत्रकाचे पालन होत नसल्यामुळे शिक्षकांचा गृहकर्ज , वाहन कर्ज, दवाखाना खर्च , मुलांचा शैक्षणिक खर्च आदींचे हप्ते थकल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील जि.प.शिक्षकांचे दरमहा वेतन हे दि.१ ते १० तारखेच्या आतच व्हावे याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे. लवकरच प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले जातील असे आश्वासन जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावीत तसेच शिक्षण सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी प्रहार शिक्षक संघटनेस आश्वासन दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .