जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती/कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत..
संदर्भ : शासन निर्णय क्र. जिपब ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दि. ०७/०४/२०२१.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. तद्नंतर, दि. २१/१०/२०२२ व दि.१८/११/२०२२ च्या पत्रान्वये सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरु आहे.
सदर सुधारित वेळापत्रकानुसार दि. १८/११/२०२१ ते दि. २१/११/२०२२ दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी संगणकीय बदली प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले आहे. अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्याआधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जांच्या पडताळणीबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर संवर्गीय शिक्षकांनी भरलेल्या अर्जाांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी. संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतांनाही जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आढळल्यास नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम कोणत्याही परिस्थितीत दिनांक २२/११/२०२२ ते २४/११/२०२२ या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.
पडताळणीअंती, ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिध्द होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी. मात्र, बदल्यासंदर्भात विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे, अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .