कोल्हापूर येथील शानदार सोहळ्यात पुरस्काराचे वितरण
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र आयोजित बारावी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूरचे मुख्याध्यापक गजानन पाटील यांना राज्यस्तरीय 'शिक्षकरत्न ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी , गणपत दादा पाटील , आमदार उल्हास पाटील , विकास शिंदे , शालन रणदिवे , माधवी शिनगारे, वेंकटराव जाधव उपस्थित होते.
गजानन घनश्याम पाटील हे आदिवासी डोंगरी किनवट तालुक्यात 27 वर्षापासून सेवारत आहेत. उपक्रमशील शिक्षक म्हणून ते नावलौकिक आहेत. सध्या ते जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नवोदय , स्कॉलरशिप , विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन त्यांनी केल्यामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले आहेत विद्यार्थी लाभाच्या योजनेतून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ते आग्रही असतात. कोविड काळात ऑनलाईन शिक्षण दिले. विद्यार्थ्यांना दहावी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा दररोज घेतली तसेच विद्यार्थी अष्टपैलू व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करतात. कोरोना काळात नोडल ऑफिसर म्हणूनही ते इस्लापूरला होते. अटल मिशन घन वृक्षातर्गत त्यांनी प्रकल्प राबविला.
उमरी (बा.) येथील नवक्रांती साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष असून साहित्य क्षेत्रात सुद्धा त्यांचे विविध पुस्तके आगामी येणार आहेत. ' नवक्रांती' विशेषांकचे प्रकाशन सुद्धा त्यांनी केले. कविता लेखन वृत्तपत्रातून स्तंभलेखन कथालेखन त्यांचा आवडीचा विषय इंग्रजी विषयावर प्रभुत्व असल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लागावी म्हणून त्यांनी संवादाचे एक पुस्तकच तयार केले. यापूर्वी त्यांना नांदेड जिल्हा परिषदेने आदर्श जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .