अर्धापूर : शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेतून..
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शाळेतील मुले म्हणजे टवटवीत फुले असतात. ही चैतन्याची फुले आणखी ताजी ठेवण्याचे काम आपल असते. यासाठी सर्वांनी आनंदात आपले कर्तव्य आणि प्रयत्न करत रहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांनी केले.
अर्धापूर येथे शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिरगे यांची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रंथभेट देऊन गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी स्वागत केले.
सहविचार सभेच्या प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भात तसेच विविध योजनांच्या संदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर येत्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त शाळा स्तरावर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.
मा. शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी सर्वांनी आनंदी राहून काम करण्याचे सुचवले. त्याचबरोबर माननीय आयुक्तांच्या ऑडिओ क्लिप नुसार सर्वांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. शाळेमध्ये शास्त्रज्ञांची जयंती, परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची माहिती, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंची माहिती विद्यार्थ्यांना परिपाठातून नियमितपणे करून देऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव साजरा करावा, शाळेतील गणित पेटी, मराठी पेटी, विज्ञान पेटी यांचा वापर नियमित करण्याच्या सूचनाही दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तराहून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करावे. विविध योजनांचा केंद्रनिहाय आढावादेखील यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या भरारी पथकासंदर्भात सर्वांनी दक्ष राहण्यास सुचविले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस-नांदला येथे शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची पुस्तके शाळेतील मुख्याध्यापक राम देवणे यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के यांनी प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला व काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
सहविचार सभेस शिक्षण विस्तार अधिकारी लोकदाजी गोडबोले, शेख निजाम, गजानन सोनटक्के, केंद्रप्रमुख व्यंकट गिते, आनंद मुदखेडे, विकास चव्हाण, विनोद देशमुख, शिवाजी सावते, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठकीच्या आयोजनासाठी विषय तज्ञ रजाक शेख, जाधव, केसराळीकर, खिल्लारे, अंकुश वार, विषय तज्ञ, उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत आदींनी परिश्रम घेतले. गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .