'माझे संविधान - माझा अभिमान' या अभियानाचे काय झाले? | constitution of India

शालेयवृत्त सेवा
0



          कोणत्याही देशाचे संविधान हे त्या देशाच्या समग्र बांधणीचा पाया असते. असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे तथा या मूल्यांनी देशातील सर्व प्रांतांना एकाच भारतीयत्वात बांधून ठेवणारे महान असे भारतीय संविधान आहे. भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीप्रणित गणराज्य घडविणारे हे संविधान आहे. तसेच भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य बहाल करणारे आणि समान दर्जा, समान संधी प्राप्त करून देणारे हे संविधान ज्याच्या प्रिअॅम्बलमध्ये ही संरचना मांडण्यात आली आहे. असे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतःप्रत अर्पण केले आहे. म्हणजेच संविधान सभेने समस्त भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत देशाला हे सर्वांगसुंदर असे संविधान अर्पण केले, ज्याचा गौरव दिन दरवर्षी साजरा केला जातो. 


       भारतीय संविधानाचे प्रमुख भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारीच आहेत.  संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानातील माहितीचा, संविधानातील प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलत्वांविषयी जाणिव जागृती होणे ही महत्त्वपूर्ण  उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवून गतवर्षीच्या राज्य सरकारने सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संविधानदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना गतवर्षी २२ नोव्हेंबरच्या आदेशानुसार देण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या २२ च्या नोव्हेंबर आदेशान्वये देण्यात आल्या होत्या.‌ यावर्षी बदललेल्या नव्या सरकारला ही बाब विचाराधीनही वाटली नाही.


         भारतीय संविधानातील मूलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि त्यातील मूलतत्वांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्याच्या दृष्टीने अत्यंत सजगतेने तसेच आकलनपूर्वक अंगिकार व्हावा या उदात्त दृष्टीकोनातून गतवर्षी 'माझे संविधान - माझा अभिमान' हा व्यापक स्वरूपाचा उपक्रम सलग चार दिवस राबविला होता. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्यलेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये, पोस्टर निर्मिती अशा विविध उपक्रमांचे आयोजन कोव्हिड - १९ चा प्रभाव पाहता आॅनलाईन अथवा आॅफलाईन पद्धतीने करण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या उपक्रमातील सर्व कार्यक्रमास शाळा, विद्यार्थी, पालक तथा लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही जसा जमेल तसा प्रतिसाद दिला. 


‌               याच कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, यांनी संविधान दिनाच्या दिवशी सकाळी १०.०० वा. एकाच वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेतला, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा संवैधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण इ. विषयवार परिसंवाद, चर्चासत्रे, प्रबोधनपर व्याख्याने यांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना शैक्षणिक कार्यक्रम म्हणून गणल्या गेले. इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंत वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, निबंधलेखन, घोषवाक्ये, स्वरचित काव्यलेखन, पोस्टर निर्मिती तर शिक्षकांसाठी फलक लेखन, डिजिटल पोस्टर निर्मिती असे विषय ठेवण्यात आले होते. या उपक्रमांचे आयोजन विद्यार्थी आणि शिक्षकांनी करून आपल्या कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ, फोटो इतर साहित्य समाजमाध्यमांवर काॅन्स्टीट्युशन डे, काॅन्स्टीट्युशनवीक, माय काॅन्स्टीट्युशन माय प्राईड  या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करण्यात यावेत असेही सुचविले होते. त्याचप्रमाणे ज्या भागात शाळा बंद होत्या त्या भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आॅनलाईनच्या माध्यमातून सहभागी व्हावे असे कळविण्यात आले होते. दरम्यान या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करीत असतांना कोव्हिडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे असा इशाराही देण्यात आला होता.

                कोरोना काळ असतांनाही मागील राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेत २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या चार दिवसांसाठी 'माझे संविधान माझा अभिमान' हा उपक्रम राज्यभर राबविला. आता कोरोना काहीच नसतांना गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दहीहंडी, दसरा दिवाळी वगैरे सण हे आमच्या काळात संपूर्णपणे निर्बंधमुक्त असतील असे आत्ताचे सत्ताधारी सांगत सुटले होते. जणू काही कोरोना काळात मागील सरकारने लावलेले निर्बंध म्हणजे त्यांची मोठी चूकच होती.  पण मग संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या शासनादेशाचा विचार करता यावर्षीही 'माझे संविधान माझा अभिमान' हे अभियान राबविण्यास हरकत नव्हती. २६ नोव्हेंबर रोजीच दिवसभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे थातूरमातूर परिपत्रक काढून शासन प्रशासन मोकळे झाले आहे. 'माझे संविधान माझा अभिमान'या अभियानाचे काय झाले? हा प्रश्न संविधानप्रेमी विचारत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा ही घोषणा दिली गेली आणि प्रत्येक घरावर तीन दिवस झेंडा फडकविण्यास बाध्य केले गेले. त्याचवेळी देशातील संविधानप्रेमींनी हर घर संविधान हे अभियान आता राबवावे अशी मागणी पुढे आणली. सद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनालाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने वेगवेगळे स्वतंत्र आदेश काढून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.  जिथे संविधानद्रोही सरकार असेल तिथे गतवर्षीप्रमाणे व्यापक स्वरूपाचे अभियान राबविण्यास उत्सुक असेल अशी अपेक्षाही करणे शक्य नाही. १९४९ ला संविधान आपण स्वतःप्रत अर्पण केले आणि १९५० ला या देशात लागू केले. यानुसार येणारी २०२४ आणि २०२५ ही दोन्ही वर्षे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचीच असतील! तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारे याबाबत काय भूमिका घेतात याकडे संविधानप्रेमींचे लक्ष लागलेले असेल.


  - प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.

   (  मो. ९८९०२४७९५३.  )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)