आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा

शालेयवृत्त सेवा
0

 


[ तारीख 15 नोव्हेंबर : क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त लेख देत आहोत.. संपादक ]


 "इंग्रजांनी ही भूमी सोडून स्वदेशी चालते व्हावे आणि आमचे राज्य आमच्या स्वाधीन करावे " असा विचार मांडून बिरसाने स्वराज्याची घोषणा केली. तसेच या "भूमीचे मूळ मालक आम्ही जंगलाचे धनी आम्ही मूळ रहिवासी तरीही आम्ही पराधीन कसे ? " असा परखड सवाल ते विचारीत. आमचे संपूर्ण स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे आमचे अधिकार आम्हाला हवे आहेत अशी विचारधारा त्यांची होती.


संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. तो काळ पारतंत्र्याच्या होता. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलावरचा पारंपारिक अधिकार नाकारला होता त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत रांची जवळील उलीहातू येथे सुगाना व करमी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला.


ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदाराकडून शेतकऱ्यावर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनांदोलन केली. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात बिरसा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले होते. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्यलढ्यांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.


सन १९०० मध्ये बिरसा पहाडामध्ये आदिवासी समाजास मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली बिरसा मुंडांना चक्रधर पुर येते बंदी बनवून रांची येथील कारागृहात ठेवण्यात आले. तुरुंगात त्यांच्यावर अनेक अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ९ जून १९०० रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्यलढाण्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. 


बिरसा आज विचाराने सदैव आपल्या जवळ आहे कारण "उलगुलांनला अंत नाही आणि मला मरण नाही " असा बिरसांचा विश्वास होता. शहीद कधीच मरत नसतात ते अमर होत असतात. बिरसाही अमर झाला. भावी पिढ्या सदैव त्याला आदर्श ठेवतील असाच तो जगला. बिरसा चे नाव पुढे येताच उलगुलान हा शब्दही पुढे उभा राहतो. बिरसा व उलगुलान यांचा संबंध हा माणूस व त्यांची सावली असा आहे. उलगुलान हा मुंडारीशी भाषेतील शब्द आहे. सर्व पातळ्यावर एकाच वेळी उठाव.. असा याचा साधा सरळ अर्थ आहे. सर्वांनी एकाच वेळी एकसंध होऊन न्यायासाठी लढलेली व्यापक लढाई म्हणजे उलगुलान होय !


बिरसा निसर्गालाच देव मानायचा. बिरसाच्या कथनातील 'सिंगा बोंगा ' म्हणजे कुठलीही देवप्रतिमान नाही. मंदिर मशिद किंवा चर्चेची संकल्पना त्यात नाही. त्यांचा सिंगाबोंगा म्हणजे निसर्गशक्ती ! जीव जगत यात व्याप्त असलेली स्वयंचलित ऊर्जा हे बिरसाच्या दृष्टीत सिंगाबोंगाचे स्वरूप आहे. बिरसा देशकारक समाज हितकारक कामे केल्याने ते सर्वमान्य झाले आहेत.


सत्तेशी तीव्र लढा देणे त्यांची कुटील रणनीती उधळून लावणे. बिरसाने उलगुलान हे केवळ स्वजनहित जपणारे नव्हते तर समाजहित व राष्ट्र हित जपणारे होते. म्हणूनच लोक बिरसाला धरती आबा भगवान बिरसा या आदराने आजही पाहत आहेत.



उलगुलान हा सशस्त्र जन संघर्ष बिरसाने जाणीवपूर्वक चेतविला होता कारण :


१ .मुंडा राज स्थापन करणे.

२. जंगल जमीन निसर्ग संपत्ती यावरील आदिवासींचा पहिला हक्क त्यांना परत मिळवून देणे.

३. जंगल राज स्थापन करणे.

४. दिक्कूनी हडपलेल्या जमिनी आदिवासींना परत मिळवून देणे आणि मुंडाच्या धरतीवरून त्यांना हाकलून लावणे.

५. आदिवासींच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी व न्याय हक्कासाठी लोकमत जागविणे.

६. स्वराज्याचे घोषणा व स्थापना करणे. 

७.खुंटकट्टी ग्रामव्यवस्था पूर्ववत अमलात आणून आदिवासीचे हितरक्षण करणे व दिक्कूना प्रतिबंध घालणे. 

८.आदिवासींच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचे जतन करणे व त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना धडा शिकविणे. 

९.आदिवासी मधील अंधश्रद्धा कुप्रथा व धार्मिक अवडंबन यांचे उच्चाटन करून नवी समाज व्यवस्था निर्माण करणे.

१०. समतेची व न्यायाची संस्कृती उभारणे.

११. सामाजिक शेती पद्धती अमलात आणणे सत्ता संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि पंचायत पद्धतीच्या माध्यमातून ग्राम सुधार चळवळ राबविणे.

१२. दिक्कूंच्या ताब्यात असलेल्या मुंडा सकट इतरही आदिवासींच्या धार्मिक स्थळांचा कब्जा घेणे.

१३. आदिवासींच्या सामुदायिक जीवनाला व्यापून टाकणाऱ्या पाचवी दडपशाहीचे उच्चाटन करणे.

१४. आदिवासींचे मजबूत व व्यापक संघटन बनविणे त्याचे अस्तित्व रक्षण करून त्यांना त्यांची ओळख करून देणे त्यांना स्वाभिमानी व संघर्षशील बनविणे त्यांना स्वयंपूर्ण करणे.

१५. आदिवासी विरोधी कायद्यांचा प्रखर विरोध करणे न्यायासाठी साहेब व सरकार यांच्याशी लढा देणे.

१६. मायभूच्या रक्षणार्थ स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या प्राप्तीसाठी ब्रिटिश सत्तेशी तीव्र लढा देणे त्यांची कुठल्या रणनीती उधळून लावणे.



बिरसाची विचारधारा :


◼️आदिवासींचे सर्वांगीण शोषण करणारे व त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे सर्व दिक्कू होय.

◼️स्वातंत्र व स्वाभिमान हा प्रत्येक आदिवासींचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो त्याला मिळालाच पाहिजे.

◼️वन शुल्क व शेतजमिनीचे शुल्क अन्यायकारक आहे आदिवासीने ते देऊ नये.

◼️आदिवासींनी वेट बिगारी करू नये भीक मागू नये.

◼️ब्रिटिशांच्या आदिवासी विरोधी जाचक कायद्यांना आदिवासींनी कडाडून विरोध करावा.

◼️पोलीस न्यायाधीश जमीनदार जागीरदार पुरोहित महाजन अथवा सामंत यांच्या आदेश आदिवासींनी मानू नये कर्जबाजारी होऊ नये सेवक पत्र लिहून देऊ नये.

◼️सर्व आदिवासींनी संघटित राहून लढल्यास महाराणी व्हिक्टोरिया चे राज्य समाप्त होईल आपले राज्य येईल यावर विश्वास ठेवावा.

◼️ब्रिटिशांनी लादलेल्या गुलामगिरीचा आदिवासींनी कसून विरोध करावा स्वराज्यासाठी प्राणपणाने लढावे.


- रमेश मुनेश्वर 

स्तंभलेखक किनवट, नांदेड

संवाद ७५८८४२४७३५

____________________________________

( लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)