स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही गतिमान करण्यासाठी बिंदुनामावली तात्काळ प्रमाणित करण्याबाबत..
अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.२५.११.२०२२ रोजी संपन्न झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान प्रत्येक महसूली विभागाच्या स्तरावर असलेल्या मागासवर्ग कक्षाकडून गट क व गट ड मधील कोणकोणत्या संवर्गाच्या बिंदुनामावल्या अंतिमरीत्या प्रमाणित करण्यात आल्या आहेत आणि कोणकोणत्या संवर्गांच्या बिंदुनामावल्या प्रमाणित करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे, याचा आढावा घेण्यात आला.
बैठकीअंती अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत:-
१.प्रत्येक विभागीय स्तरावरील मागासवर्ग कक्षास प्राप्त झालेल्या बिंदुनामावल्या प्रमाणित करतेवेळी त्यामध्ये काही त्रुटी असल्यास, त्यांची पूर्तता करण्यासाठी पत्रव्यवहार न करता संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून त्रुटींचे निराकरण तातडीने करण्यात यावे.
२. राज्यातील लिपिक-टंकलेखक संवर्ग हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आला आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या प्राप्त झालेल्या बिंदुनामावल्या प्रमाणित करण्यास सर्वोच्च प्राथम्य देण्यात यावे.
३. राज्य शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील संवर्गातील पदांच्या बिंदुनामावल्या विहित कालमर्यादेत प्रमाणित होत आहेत, याची खातरजमा करण्याच्या दृष्टीने आपणाकडून प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आढावा घेण्यात यावा आणि बिंदुनामावल्यांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली निघतील याची दक्षता घेण्यात यावी. आपणांस विनंती करण्यात येते की, अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांनी दिलेल्या वरील निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, असे पहावे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .