गझलकार रमेश बुरबुरे यांचा 'सूर्या तुझ्या दिशेने' हा संग्रह म्हणजे काळोखगर्भ ध्वस्त करणारा उजेडप्रहार ! - अरुण विघ्ने

शालेयवृत्त सेवा
0

 




     " मी गझल जेमतेम लिहायला लागलो. मी काही फार मोठा गझलकार वगैरे नाहीय. म्हणतात ना माणूस आजन्म विद्यार्थी असतो त्याचप्रमाणे मी गझलेचा विद्यार्थी आहे " . असं म्हणणारा महाराष्ट्रात सर्वदूर परिचीत असलेला तरुण गझलकार म्हणजे यवतमाळचा रमेश अरुणराव बुरबुरे . याचा "सूर्या तुझ्या दिशेने " हा ताकदीचा गझलसंग्रह नुकताच हाती पडला .यापुर्वी त्याचे पहिले पुस्तक " अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ " मागील वर्षी येवून गेले. या दोन्ही पुस्तकांमुळे त्याची आंबेडकरी गझलकार म्हणून साहित्य जगताने नोंद घेतली आहे . त्याच्या गझलेने व त्याच्या दमदार सादरीकरणाने तो प्रकाशझोतात आला . त्याची गझल वाचक, रसीकांच्या थेट काळजात स्थान मिळविते . प्रख्यात आंबेडकरी गझलगायक, महाकवी कालकथीत वामनदादा कर्डक यांची गझल व गायकी प्रबोधनकारी होती . बाबासाहेबांचा विचार, त्यांची चळवळ समाजमनापर्यंत पोहोचविण्याचं काम दादांनी केलं . हे जगजाहीर आहे. तोच वारसा जपण्याचं व पुढे नेण्याचं काम इतर गझलकाराप्रमाणेच रमेशची गझलही करताना दिसते . म्हणून रमेशची गझल ही सूर्यकुळाची गझल ठरते . हा संग्रह म्हणजे काळोखगर्भ ध्वस्त करणारा उजेडप्रहार आहे. व्यवस्थेशी सतत संघर्षरत राहायला शिकविणारी गझल आहे .गझल म्हणजे कवितेचाच एक भाग . वेगळेपणा एवढाच की गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र आशय मांडते .मराठी गझलेच्या दुनीयेत सुरेश भटसाहेबांचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.


त्यांनी मराठी गझलेच्या अनुषंगाने फार मोठं कार्य केलं. मराठी रोवलेची ओळख करून दिली.  आणि बघता बघता त्याचा बोधीवृक्ष झालाय . अलीकडे अनेक तरुण गझलेकडे आकर्षीत होत आहेत. नविन विषय व आशय कवेत घेऊन गझल आपल्या कक्षा रुंदावित आहे . तसेच आंबेडकरी साहित्तिक संविधान निर्मात्यांना  महासूर्याची उपमा देऊन गौरविताना दिसतात . शकानुशतके अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या गावकुसाबाहेरच्या समाजाच्या वस्तीत कालांतराने सूर्योदय होऊन ज्या महामानवाने वस्ती(जीवन) प्रकाशमान केली त्यांना सूर्य संबोधतांना साहित्तिक दिसतात. तसाच हा कवी सुद्धा आपल्या गझलेतून आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतो .


" तप्त सूर्याचा निखारा पेटुनीया सांगतो की

एक आहे बाप माझा सूर्य ज्याला बोधतो मी "


यावरून हा गझलकार आंबेडकरी गझलेच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे जाणवते. पण यावरून आपल्याला असा समज करून घेता येणार नाही . कारण तो इतर विषयावरही तेवढ्याच ताकदिने लिहीतो . त्याने आपल्या गझलेतून शेतक-याची व्यथा-वेदना, माय-बापाची वेदना, मुलींचे भवितव्य, बेरोजगारी, स्त्रीयांचे प्रश्न, व्यवस्था, संवैधानीक मूल्ये, जी आपली जिवनमूल्ये आहेत , या विषयावरही तो आपली लेखनी झिजविताना दिसतो . त्याच बरोबर भ.बुद्ध, म. फुले, सावित्रीमाई फुले, बाबासाहेब, रमाई यांचा मानवतावादही मांडतो.


"घे जरा जयभीम माझा कर नमो बुद्धाय मित्रा 

माणसांना जोडण्याचा ना दुजा पर्याय मित्रा !"


हा मतला वैश्वीक विचार मांडतो . माणसाला माणसाशी जोडण्याचा ,समतेचा, बंधुभावाचा, माणुसकीचा विचार मांडतो. डाँ.बाबासाहेब आणि भ.बुद्धांचे तत्वज्ञान विश्वाने स्विकारले आहे . हा विचार सबंध मानव समूहाचा विचार झाला आहे. हा विचार मानवी मनात माणुसकी,एकात्मता, राष्ट्रीयत्वाचा विचार पेरणारा आहे. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्व प्रथमतः भारतीय आहोत आणि नंतर जाती धर्माचे. हाच विचार रमेश गझलेतून मांडताना म्हणतो...


" मी भारतीय आधी जाती नि धर्म नंतर

  इतके मला कळले घटनेस वाचल्यावर !" 


भारतीय संविधान सर्व भारतीयांना समान  नागरीकत्व प्रदान करते . समानतेचा,न्यायाचा, एकतेचा, बंधुभाव, मैत्रीचा, स्वातंत्र्याचा विचार प्रदान करते . रमेशची गझल अंधश्रद्धा,जातीभेद, दडपशाही, हुजरेगीरी, मुजोर व्यवस्था, अन्याय ,अत्याचार, भ्रष्टाचार ,आताची पत्रकारीता या गोष्टीचा खरपूस समाचार घेताना दिसतो. त्याच्या एका गझलेतील शेर मला बोलका वाटतो ...

         

" डाग चारित्र्यावर नाही त्यांचिया जर

  भीत इतके कां असावे लेखकाला !"


साहित्तिकांनी,लेखकांनी,पत्रकारांनी सत्यशोधकवृत्तीतून कुणाचेही मिंधे न होता अन्यायाविरोधात  लिहीलं पाहिजे. आपण समाजाचं देणं लागतो . किमान या भावनेतून उतराई होण्यास्तव तरी सत्याची बाजू परखडपणे मांडली पाहिजे. असा सूर रमेशच्या गझलेचा आहे .अप्रिय घटना जर देशात घडत असतील तर त्याविरोधात आपली लेखनी बेडरपणे चालविली पाहीजे. साहित्तिक,लेखक,पत्रकार देशात खुप आहेत. पण वंचितांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्यांनी गप्प न बसता व्यवस्थेला जाब विचारला पाहीजे . याविषयी रमेशचं धोरण स्पष्ट आहे ..


"पेटता दिसता मला दुस-या कुणाची झोपडी

विझविण्यासाठी तिला धावून गेलो पाहिजे !"


येथे त्याची गझल मानवतेचा /माणुसकीचा विचार मांडते. यात कुठेच एककल्लीपणा 

दिसत नाही .स्त्रीयांच्या रक्षणाबाबत तो व्यवस्थेला प्रश्न विचारून संविधानीक मूल्यांचा जागर करतो. संविधानानुसार स्त्रींयानाही त्यांच्या सुरक्षिततेचे हक्क व अधिकार मिळायला पाहिजे आणि जर  मिळत नसेल तर तिने आपले हक्क कायद्याने हिसकाऊन घेण्यासाठी सज्ज असलं पाहिजे, असे तो म्हणतो. 


" शांत बसण्याचा नव्हे हा काळ पोरी

   लेखणीचा वारसा सांभाळ पोरी !"


मुलींनी शिकलं पाहिजे .आपल्या हक्कासाठी कायद्याचा अभ्यास करून आपल्या अधिकारासाठी तिने स्वतः लढणं शिकलं पाहिजे. त्यासाठी लिहीतं झालं पाहिजे. असा प्रामाणीक सल्ला त्याची गझल आजच्या तरुणाईला देवू इच्छिते . एवढच काय तर शेतक-यांच्या या अवस्थेसाठी तो निसर्गालाही प्रश्न विचारतो ...


" थकलो करून सेवा आजन्म मी निसर्गा

  तू शाप मज दिला अन वरदान वादळाला !"


                         किंवा


" शेत ओलेचिंब झाले आसवाने

  कां दिला इतका दगा या पावसाने !"


निसर्गाच्या लहरीपणाचे बरेच चटके शेतक-याला सहन करावे लागतात . हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेतो , तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रूशिवाय काहीच शिल्लक उरत नाही. शेतक-याच्या, स्त्रीयांच्या, माय-बापाच्या, लेकीच्या,वंचितांच्या प्रश्नावर रमेशची गझल हळवी होतांना दिसते . सहाजीकच आहे. तो एका शेतमजूराचा लेक आहे आणि एका लेकीचा बाप आहे . म्हणून त्याचे शब्द कधीकधी धारदार शस्त्र बणून वंचितांची काळजी मांडण्यास तत्पर असल्याचे आपणास दिसते .


" ठेवली परजून माझी लेखनी मी

  आडवा येऊ नको तू लेखनीला !" 


नियम /कायदा मोडून अश्यक्तांवर अन्याय करणा-याला असा सज्जड दमही प्रसंगी त्याची गझल द्यायला मागेपुढे बघत नाही . त्याची प्रामाणिक लेखनी कुणाची गय करीत नाही .मग तो घराचा असो की बाहेरचा . तशी ती सर्वांचीच असते म्हणा ! पण फरक एवढाच की , आयत्या वेळी कुणी म्यान करतात तर कुणी तिचा योग्य वेळी वापर करतात. असो , तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. चळवळीला बळ देणा-या कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्यासाठी त्याची गझल काम करणार असल्याचेही तो म्हणतो...


" आणावयास तुकडे एकत्र चळवळीचे

   एकेक शेर माझा होणार लोहचुंबक !"


           रमेशची गझल ही आंबेडकरी विचारांची असून वैचारीक क्रांतीला वाहून घेणारी आहे. म्हणूनच तिला अन्यायाची चीड आहे. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले असतानाही काही सत्तापिपासू लोक दडपशाहीने काही लोकांचे अधिकार का नाकारतात, का हिरावून घेतात ? असा प्रश्न विचारते. समता, स्वातंत्र्य,न्याय ,बंधुता, मानवता, सत्य ,शांती, अहिंसा, हे तत्व समाजात रुजविण्यासाठी रमेशची गझल व्यवस्थेशी झगडते . ताकदीनिशी धडपडते .त्याची गझल आपल्याकडून झालेल्या काही चुकांविषयी पश्चातापही व्यक्त करते..!


" उगाच त्यांना बसवत आलो मुकुटावरती

   इतिहासाचा पाया ज्यांनी रचला नाही !"


कष्ट कुणी केलेत आणि मलिदा कोण खातंय ? काय बोललास तू आणि काय करतोस तू ? अशी परिस्थिती आपणाला दिसते आहे . मानव कल्याणासाठी बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, स्वाभिमानाचा, शिक्षणाचा,

न्यायाचा,स्वातंत्र्याचा संदेश आज लोकांना रुचने अपेक्षित आहे . बुद्धाने मानवतेचा, करुणेचा, मैत्रीचा, शांतीचा, सत्याचा ,मानवी कल्याणाचा ,वैज्ञानीक दृष्टीकोण मांडला. यात मानव हा केंद्रस्थानी असून त्यात त्याच्या कल्याणाचा मार्ग आपल्याला सांगीतलेला आहे. तो विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघावा, असे पूर्ण स्वातंत्र्यही बुद्ध मानवाला देतात . यात मानवाचे कोणतेही नुकसान नाही. हाच वैश्वीक विचार रमेशची गझल मांडते  . त्याची गझल स्त्री सौंदर्य आणि निसर्ग 'सौंदर्यात' फारशी रममान होताना दिसत नाही . ती शेतक-याच्या बांधावर रमते, कष्टक-यांना हक्क मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारते , वृद्धांची काळजी वाहते, स्त्री रक्षणासाठी त्यांच्या पाठीशी उभी राहते , तिच्यात संविधान मूल्ये ओतप्रोत भरून असल्याचे दिसतात, ती वैचारीक परिवर्तन मांडते, ती काळोखाच्या गर्भात उजेडप्रवाही होऊन वाहते ,कदाचित तिला मानवतावादाच्या मार्गावर चालून अजून पल्ला गाठायचा असावा .सामाजीक जाणीवेतून तिला व्यक्त व्हायचे असावे . म्हणून ती आंबेडकरी गझल ठरते .


            कदाचिक काहींना ती काटेरी वाटत असावी . पण सत्य कटू असतं आणि ते बोचतं, रुततं, मानवी मनाला अस्वस्थ करतं .पण त्यातून चांगलंच निष्पन्न होत असतं . हा खरेपणा मांडण्याची ताकद रमेशच्या गझलेत आहे . तिला सामाजीक, राजकीय, शैक्षणिक ,आर्थीक जाणिवांचं भान आहे .गझल लेखनातून वैविद्यपूर्ण वैचारीक प्रवाह मांडले जात आहेत .ही गझलेच्या दृष्टीने महत्वाची बाब असावी. असं मला वाटते . जशी कथा, कादंबरी, कविता या प्रकारातून विविध विचार प्रवाह मांडले जातात. त्याचप्रमाणे गझलेच्या कक्षाही हळुहळू रुंदावल्या जात आहेत . ही खरच अभिमानाची बाब आहे.


            रमेशची गझल ही विविध प्रतिमा, प्रतिकांच्या उपयोजनातून शब्दबद्ध झाली आहे. विविध प्रश्नांच्या मालीकेतून ही गझल वाचकांना विचार करायला लावणारी , वाचकांच्या मनात घर करणारी ठरते. जे प्रश्न तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनाशी निगडीत आहेत. अवती भोवतीचे, आपल्या घरातील, समाजातील, देशातीलच आहेत तेच या गझलेत आहेत. हे प्रश्न भविष्यात ख-या अर्थाने प्रत्येक वाचकांचे, कवी,गझलकारांचे,साहित्तिकांचे होणे गरजेचे आहे . असे प्रश्न प्रत्येक सर्जकाला पडले  तरच प्रश्नांचे शवविच्छेदन होईल. 


             "सूर्या तुझ्या दिशेने " हा गझलसंग्रह थिंक टँंक पब्लिकेशन्स ,सोलापूर यांनी प्रकाशीत केला असून, प्रस्तावना प्रसिद्ध गझलकार प्रा.डाँ.सिद्धार्थ भगत यांची आहे. पाठराखण प्रसिद्ध वक्ते, समीक्षक प्रा.डाँ.अशोक पडवेकर यांनी केली तर प्रा.विलास भवरे यांचे सदिच्छा पत्र असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ व रेखाटने प्रा.बळी खैरे सरांचे आहे.  मराठी व आंबेडकरी साहित्यात नव्याने प्रवेश केलेल्या या दमदार साहित्यकृतीसाठी गझलकार रमेश अरुणराव बुरबुरे यांचे अभिनंदन व हार्दिक मंगलकामना.!


- अरुण विघ्ने

आर्वी, वर्धा मो.८३२९०८८६४५


पुस्तकाचे नाव: सूर्या तुझ्या दिशेने

गझलकार : रमेश अरुणराव बुरबुरे

प्रकाशन : थिंक टँंक पब्लिकेशन,सोलापूर

पृष्ठसंख्या : 100 मूल्य : 120/-₹

मो. 9767705170

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)