नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आनंद ही जीवनाची श्रेष्ठ प्रेरणा असून आयुष्याचा उद्देश ही तोच असावा अशी अपेक्षा राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केली आहे... ते उपक्रमशील आदर्श शिक्षक गंगाधरराव सावळे यांनी आयोजित केलेल्या सृजनशील शिक्षक स्नेहांकितांच्या शरद ऋतूच्या चांदण्यातील आनंद स्नेहमिलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा आनंद उत्सव संपन्न झाला..
कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रमाता आई जिजाऊ आणि भारताच्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाला.. या प्रसंगी पुढे बोलताना डॉ नांदेडे यांनी जीवन आनंदाच्या सकारात्मक मांडवाखालीच बहरते, उमलते आणि फुलते असे सांगून सारे ऐश्वर्य आनंद, समाधान आणि संतुष्टीशिवाय व्यर्थ असल्याचे आपल्या तासाभराच्या व्याख्यानात प्रतिपादन केले..या प्रसंगी काही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या असाधारण कार्यकर्तृत्वाचा सन्मान ही करण्यात आला..
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्रातील थोर विचारवंत , लेखक श्री शेषराव मोरे यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातील अनेक प्रसंग आपल्या खुमासदार शैलीत सादर केले... विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षानी लिहिलेली अनमोल ग्रंथ संपदा किती खडतर तपश्चर्या होती हे त्यांच्या भाषणातून ऐकून प्रेरित झालेले शिक्षक प्रेक्षक थक्क झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे पदी उपप्राचार्य शिंदे, अभियंता भुजंगराव कर्हाळे , अशोकराव कदम उपस्थित होते. विचारवंत , उपक्रमशील आणि प्रतिभाशाली शिक्षक स्नेहांकिताच्या या शारद आनंद उत्सवाच्या यशस्वितेसाठी लिंबगाव जिल्हा परिषद शाळेचे साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षक गंगाधर सावळे ,डॉ हेमंत कार्ले, हिंगमिरे यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गंगाधर सावळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्रतिभाशाली आणि धडपडणाऱ्या शिक्षकांच्या अशा सृजनशील आनंद उत्सवाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. एकमेकांच्या विचार विनिमयातून जीवन अधिकाधिक आनंदी होऊ शकते असे प्रतिपादन केले.. कार्यक्रमाचे अत्यंत सुरेख सूत्र संचालन आणि आभार श्रीमती स्नेहा सावळे यांनी मानले. उपस्थित सर्व शिक्षकांना स्नेह भोजन देण्यात आले आणि काही शिक्षकांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने या सुंदर शिक्षक सोहळ्याची सांगता करण्यात आली..!
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .