वाचन प्रेरणा दिन: शाळेला पाच हजार बक्षीस जाहीर
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही हानी भरून काढण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपले कर्तव्य सकारात्मक भूमिकेतून करून विद्यार्थ्यांना जगासोबत चालण्यासाठी सज्ज करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिग्रस-नांदला (ता. अर्धापूर) येथे वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के, समग्र शिक्षा अभियानाचे डॉ. दादाराव शिरसाठ, केंद्रप्रमुख विनोद देशमुख, मुख्याध्यापक राम देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या शाळेचे वातावरण पाहून माझे मन हरखून गेले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद केला. त्या म्हणाल्या, जे काही करायचे ते मनापासून केले पाहिजे. महान विभूतींचे चरित्र आचरणात आणले तरच आपले भविष्य घडू शकते. चांगले वाचाल तसे तुम्हीही चांगले करू शकाल. त्या त्या क्षेत्रात नाव कमवू शकाल. म्हणून वाचण्यासाठी किमान दररोज दोन तास तरी दिले पाहिजे. मग ते अभ्यासाचे पुस्तक असेल किंवा इतर वाचनाचे पुस्तक असेल, वर्तमानपत्र असेल. वाचनाने बुद्धीला चालना मिळते.
प्रारंभी डॉ. एपीजे कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताच, मुलींनी वाटेत फुलांचा सडा टाकून स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेने पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत केले.
गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी शाळेतील मुख्याध्यापक श्री राम देवणे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचे उत्तम कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन करून, स्वागतशील भावनेने काम करत राहिलो तर त्या कामाचा आपणाला आनंद मिळतो आणि नाइलाज म्हणून जर एखादे काम आपण केले तर त्या कामाचे ओझे वाटू शकते. श्री राम देवणे हे संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते जेथे जातील तेथील शैक्षणिक वातावरण संपूर्ण बदलून टाकत असतात, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेल्या मराठवाडा गीताचे साभिनय सादरीकरण केले. परिपाठात डॉ एपीजे कलाम यांच्या संदेशाचे सामूहिक वाचन करण्यात आले. मनश्री क्षीरसागर, अंजली क्षीरसागर या विद्यार्थिनींनी स्वलिखित कविता वाचन केले. तर प्रवीण क्षीरसागर, अनुष्का क्षीरसागर कावेरी सरपाते या विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख विनोद देशमुख यांनी प्रास्ताविकात केंद्रातील सर्वच शाळा ह्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे प्रतिपादन केले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त सौ मंजूषा मोघेकर यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सूत्रसंचालन निलावती बोरगावकर यांनी केले. तर आभार सौ अनुजा पवार यांनी मानले. यावेळी ग्रामसेवक शिवानंद गाडे, पालक दिनेश क्षीरसागर, गावातील सर्व माता पालक, सहशिक्षिका ज्योती देशमुख, कांता गोरे, शेख फरीद लाला, सुशीला पावडे आदी शिक्षक उपस्थित होते.
शाळेतील वातावरण आणि मुलींचे सादरीकरण, उत्साह पाहून शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी शाळेला पाच हजार रुपयांची देणगी जाहीर करून, शाळेत ॲस्ट्राॅनाॅमी क्लब आणि वाइल्ड लाईफ क्लब यासाठी हा निधी खर्च करण्याचे आवाहन केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .