वाजेगाव संकुलात विविध उपक्रमांनी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अक्षर परिवार नावाने राज्यभर सुपरिचित असणाऱ्या वाजेगाव संकुल मधील दिवाळी सुट्टी पूर्वीचा प्रथम सत्राचा शेवटचा कार्यदिन अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रमांनी गजबजला. पंधरा ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती राज्यभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच आजच्या दिवशी जागतिक हात धुवा दिन देखील जगभर साजरा होत असतो. त्या निमित्त अक्षर परिवारातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाजेगाव बीट चे सृजनशील शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सर्व शाळांनी परिपाठात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी उद्धृत केलेल्या दहा मौलिक संदेशांचे विद्यार्थ्यांना वाचन करून दाखविले. तसेच त्यांच्या जीवन चरित्राचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. आज रंगीबेरंगी, कल्पक रांगोळीने शाळेची पटांगणे सजलेली दिसून आली. अनेक शाळांनी वाचन संस्कृती विद्यार्थ्यांत जोपासावी यासाठी वाचू आनंदे तासिका, ग्रंथांची ज्ञान कावड शोभा यात्रा आयोजित केल्या होत्या.तसेच विद्यार्थ्यांची वाचन गती वाढविण्यासाठी मी ही गतीने वाचन करणार हा विशेष उपक्रम राबविला.


जागतिक हात धुवा कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हात धुण्याचे शास्त्रीय पद्धतीने सात पायऱ्यांच्या हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करून दाखविण्यात आले. फत्तेपूर, वाडीपुयड नवीन येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी आरोग्यदायी राहणीमान कसे असावे याचे मार्गदर्शन केले. सतरा ऑक्टोबर पासून दिवाळी सुट्टी लागत असल्याने प्रत्येक वर्गशिक्षक यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कायम राखणारा,अध्ययन निष्पत्ती आधारित, मनोरंजक दिवाळी अभ्यास देऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन खंड पडणार नाही याची दक्षता घेतली. तसेच प्रथम सत्राचा निकाल जाहीर करून प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप केली.


विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असे आवाहन करण्यात येऊन त्यांच्याकडून पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी मुलांनी मातीचे दिवे बनविणे, आकाश कंदील बनविणे यासारखे कार्यानुभव अनुभवले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)