उपक्रमशील शिक्षिका आशालता स्वामी : 21 व्या शतकातील आधुनिक सावित्री !

शालेयवृत्त सेवा
0

 



आधार शोधत वरवर जाणारी वेल, पुष्पलते सारखं नेहमी टवटवीत, ताजतवानं, शैक्षणिक क्षेत्रात निर्धोक स्वामीत्व मिळविलेल्या जिल्हा परिषद आदर्श मुलींचे हायस्कूल, मुखेड येथील आशालता स्वामी यांचा उल्लेख  21 व्या शतकातील आधुनिक सावित्री म्हणून करता येईल. त्यासोबतच कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक जीवनात शिक्षणाची आवड, दानशूर, धर्मपरायण व कार्यक्षम गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना आधुनिक राणी अहिल्याबाई होळकर म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. स्त्री कर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टीने त्या केवढ्या उंचीच्या आहेत हे त्यांच्या कार्य वर्णनातून उलगडा होईल. आशालता स्वामी यांचा जन्म 20 जून 1975 रोजी झाला. 


मुलगी म्हणजे परक्याचं धन ही विचारसरणी असलेल्या आपल्या समाज व्यवस्थेत आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं नाही. चाकूर तालुक्यात नवकुंड झरी गावात त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. जेमतेम दहावी बोर्डाची परीक्षा दिली असतानाच त्यांचे वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झाले.आजही आपल्या समाजात बालविवाह अनिष्ट प्रथा प्रचलित आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि शिक्षणाची गोडी पाहून त्यांचे सासरे गंगाधर मठपती, पती सारंग गंगाधर मठपती, नणंद सुशीला यांनी त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी सुविधा व प्रोत्साहन दिले. 


विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या व न पटलेल्या मिश्र समाज व्यवस्थेत सासरच्या मंडळी कडून मिळालेल्या बळावर स्वावलंबित्व आणि स्व- उन्नयनासाठीचे व्यवसायिक पदविका, पदवीचे शिक्षण प्राप्त केले. शिक्षणामुळे जग मुठीत घेण्याची आस लावलेल्या आशालता - सारंग दाम्पत्याला संगमेश्वर व श्रद्धा ही अपत्ये झाली. सुखी संसाराचे स्वप्न रंगविलेली असताना नियतीला काही औरच मंजूर होते. त्यांच्या पतीला दुर्धर आजाराने ग्रासले. आशालता स्वामी यांना जाणणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याबद्दल पहिली प्रतिक्रिया विचारली असता रुग्णशयेवर असलेल्या आपल्या जोडीदाराची तन-मन धनाने सुश्रुषा केली. या आदिमायाने आपल्या सशक्त व्यक्तिमत्त्वाचा कणखरपणा दाखविताना लढवय्याबाणा सतत जागृत ठेवून नियतीपुढे हार न मानता तिच्याशी जिद्दीने दोन हात करत राज्य व राज्याबाहेरील अनेक नामवंत इस्पितळात औषधोपचार केले. 


संगमेश्वर वयाचा अठरा वर्षाचा बारावीला शिकताना आणि श्रद्धा सोळा वर्षाची दहावीला शिक्षण घेत असताना त्यांचे पितृछत्र हरपले आणि आशालता स्वामी यांना अकाली वैधव्य वाट्याला आले. नियतीच्या या कठोर आघाताने डळमळीत न होता आलेल्या संकटाचा धैर्याने सामना करून आज संगमेश्वर आणि श्रद्धाचे बीएस. सी. एमएस. सी., बी. एड. आपल्या मुला मुलीचे शिक्षण पूर्ण करून त्यांना नोकरी व्यवसायाला लावले. स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेल्या कौटुंबिक संसारिक सुखदुःखाच्या, संकटाच्या, आघातांच्या भट्टीतून तावून सलाकून निघालेल्या अनुभवाच्या आधारावर त्यांच्या शैक्षणिक कामकाजात आत्मविश्वास, कोमलता, समंजसपणा, उबदारपणा, शिस्तप्रियता दिसून येते. 


मुलींचे हायस्कूल, मुखेड येथे शिक्षणाचे कार्य करताना मुलींचं संरक्षण हा त्यांचा प्राधान्याचा विषय आहे. रस्त्यावर येता जाताना जिथे कुठे शाळेतील मुली दिसतात त्या ठिकाणी मुलींची कुठे व कोणत्या कामासाठी जात आहात अशी चौकशी करतात. सततच्या पालक संपर्कामुळे पालकांचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांच्या भरवशावर मुलींच्या बाहेरगावातील सह-शालेय कार्यक्रमात सहभागाबद्दल पालक निश्चिंत असतात. त्यांच्यातील मातृत्वाच्या वात्सल्याने त्या शाळेतील मुलींचे वर्तनाबद्दल समुपदेशन करतात व शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. मुलींनी शिक्षण घेऊन जीवनात खूप मोठं व्हावं या उद्देशाने शिष्यवृत्ती वर्गाला अध्यापन, विद्यार्थिनींना वैयक्तिक मार्गदर्शन करतात. दिव्यातील वात ज्याप्रमाणे सतत प्रज्वलित असते त्याप्रमाणे त्यांच्या मनात त्या शाळेत असो अथवा नसो सतत शाळेबद्दल विचार रेंगाळत असतात. 


कुटुंब जणू त्यांचे शरीर तर शाळा ही त्यांची आत्मा आहे. शाळापूर्व तयारी इयत्ता पहिलीतील जून 2022 मध्ये प्रवेशित पाल्यांच्या माता पालक गटांना पालकांच्या घरी जाऊन आयडिया कार्ड व कृति कार्ड वर त्यांनी माता पालक गटांचे समुपदेशन केले. याचे छायाचित्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओत दिसून येते. आदर्श शिक्षिका, निर्णय घेण्याची क्षमता, विद्यार्थ्यांप्रती तळमळ, संघ प्रवृत्ती, धाडसी, कामाप्रती दक्ष, स्वतः शैक्षणिक साहित्य तयार करून अध्यापन करणे, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अध्ययन गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना लंच टाईम मधील वेळ देऊन त्यांना शिकत करणे, गणित विषयाची आवड, कधीही राग न करणाऱ्या, प्रसन्नचित्त, घर व शाळा यांच आपसी टेन्शन याची कधीही सर मिसळ न करणाऱ्या, इत्यादी व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये त्यांच्या मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक व क्षेत्रीय अधिकारी त्यांच्याबद्दल व्यक्त करतात. 


त्यांना गायनाची आवड असून पेटी तबल्यावर गायन करता येते. त्यांचा आवाजात गोडवा असून गणाचार्य मठाचे भजनी मंडळात देखील गायन करतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण, संगीत या विषयाच्या शिक्षकांची शाळा संकुलात आपसी देवाण घेवाण, स्थानिक कलाकारांची मदत घेण्याची शिफारशी केली आहे. ज्ञान एकात्म असून अध्ययन क्षमता- निष्पत्ती बाबत विषयांतर्गत विभक्तीकरण करू नये अशी शिफारस देखील या धोरणाने केली आहे. स्व. सारंग गंगाधर मठपती त्यांचे पती हिच त्यांची अंतरिक प्रेरणा असून त्यांचे नाव अजरामर राहावे याकरिता आयुष्याचा जोडीदार आजारपणात इस्पितळात असताना त्यांना मिळालेल्या मदतीचा ओघ व साथ मिळाली याची हृदयात साठवणूक करून आजही दरवर्षी पतीच्या पुण्यतिथी दिवशी रुग्णांच्या नकळत तपासणी शुल्क त्या अदा करतात, रक्तदान करतात. 


शाळेच्या भौतिक संसाधनात्मक विकासासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासाठी देणगी देतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मानव संसाधनाची सेवा उपलब्ध करून प्रायोजकत्व स्वीकारतात. पुरस्कार आणि प्रसिद्धीच्या प्रकाश झोतापासून दूर राहून निर्हेतुक भावनेने शैक्षणिक व सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या त्यांच्या व्रतवैकल्याच्या दानशूर सेवावृत्तीला त्रिवार सलाम. माँ तुळजा भवानी या आधुनिक सावित्रीला उदंड आयुष्य प्रदान करून त्यांच्या कार्याला बळ आणि ईश्वरी वरदान प्राप्त होवो या प्रार्थनेसह नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभकामना !

       

- अभय परिहार, अधिव्याख्याता, 

डायट, नांदेड. संपर्क क्रमांक : 9004119926

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)