जीवन तर सारेच जगतात
त्यात थोडा सुगंध वाहू दे. ।
जे चंदनाप्रमाणे झिजतात
त्यांचे जीवन कीर्तिमान होऊ दे. ।
ज्यांचे जीवन कीर्तिमान झालेले आहे अशाच एका भारत मातेच्या महान सुपूत्रांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात घेतलेला हा परामर्श.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम एक अशी व्यक्ती की ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देशाच्या सेवेसाठी समर्पित केले.त्यांनी मिसाईल टेक्नोलॉजी मध्ये देशाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली.लाखो भारतीयांना स्वप्न पाहण्याची आणि स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रेरणा दिली.त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१, रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथे झाला.
तुम जैसे सपने देखोगे! वैसे ही बन जाओगे!
पाचव्या वर्गात शिकत असताना आकाशात उडणाऱ्या चिमण्यांना पाहणे त्यांना फार आवडायचे. एका दिवशी वर्गात त्यांनी शिक्षकाला विचारले या चिमण्या उडतात कशा ? प्रश्न साधा होता. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतोच? पण त्याचे उत्तर मात्र कोणी शोधत नाही. त्यांनी ज्या शिक्षकाला हा प्रश्न विचारला ते शिक्षक होते सुब्रमण्यम अय्यर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सुब्रमण्यम सर्व वर्गातील मुलांना समुद्राच्या काठावर घेऊन गेले आणि उडणाऱ्या पक्ष्यांना दाखवून त्यांनी सांगितलं की "पक्षाच्या शरीराची रचना त्यांच्या उडण्याला पोषक असते. लहान कलाम यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, नाही तर त्यांच्या मासूम डोळ्यांना उंच भरारी घेण्याचे स्वप्न सुद्धा मिळाले. पण हे स्वप्न पूर्ण कसे होणार ? कारण परिस्थिती अत्यंत बिकट होती. कागदाची पतंगच मोठ्या मुश्किलीने मिळायची. अब्दुल कलाम यांना सात भावंड होती. त्यामुळे घरात खाण्यापिण्याची चिंता होती. छोट्या कलामला भाकरी खाणे फार आवडायचे. पण ज्या ठिकाणी ते राहायचे त्या ठिकाणी तांदूळच मोठ्या प्रमाणावर पिकाचा त्यामुळे भाकरी मिळणे मुश्कील होते. तरीही त्यांची आई आशी अम्मा आधी छोट्या अब्दुल साठी दोन भाकरीची तरतूद करायची.एक दिवस आईच्या हिश्याची भाकरी आपणच खाल्ली ही गोष्ट त्यांना त्यांच्या मोठ्या भावा कडून कळली त्यादिवशी अब्दुल कलाम अत्यंत भावनिक झाले.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जेव्हा दहा बारा वर्षाचे झाले तेव्हा त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. त्यांचे वडील जैनुब्द्दीन रामेश्वरम ते धनुष्यकोडी नावेतून प्रवाशांना नेण्या आणण्याचे काम करत. ते आपली नाव कधीकधी किरायाने देत. चक्रीवादळात त्यांची नाव तुटते. त्यामुळे घरात पैशाची चणचण भासू लागते. अब्दुल कलाम पेपर विकून आपल्या कुटुंबाला मदत करीत. अभ्यासाची त्यांना फार आवड होती. ते रोज सकाळी चार वाजता उठून लवकर आंघोळ करून गणिताच्या शिकवणीला जात. सकाळी लवकर उठून अंघोळ करण्याचे कारण हे होतं की गणिताचे शिक्षक सकाळी चार वाजता आंघोळ करून येणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवणी फुकट घेत. सकाळी पाच वाजता शिकवणीवरून आल्यावर अब्दुल कलाम तीन किलोमीटर लांब धनुष्यकोडी रेल्वे स्टेशनला जाऊन पेपर आणून घरोघरी जावून पेपर वाटत.ते कधीच थकत नसत. पेपर वाटून आल्यावर त्यांच्या आई आशी आम्मा त्यांना जेवण देत.
मुलाची शिक्षणाची आवड बघून त्यांच्या आईने त्यांच्यासाठी बाजारातून एक छोटा कंदील विकत आणलेला असतो. ते कंदिलाच्या प्रकाशात रात्री अकरा वाजेपर्यंत अभ्यास करत. व सकाळी चार वाजता उठत अब्दुल कलाम आठ नऊ वर्षाचे असतानाची गोष्ट आहे. एक दिवस ते आपल्या कुटुंबासोबत रात्रीचे जेवण करीत असतात. त्यावेळी अचानक त्यांची नजर वडिलांच्या ताटाकडे गेली. त्यावेळी त्यांनी पाहिले की वडिलांच्या ताटात जी भाकरी आहे ती खूप करपलेली आहे. पण त्यांचे वडील काहीही न बोलता शांतपणे ती करपलेली भाकरी खात आहेत. त्यांच्या आईच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी वडिलांची क्षमा मागितली. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले "काही हरकत नाही मला तर करपलेली भाकरी आवडते". छोट्या कलामला त्याचे खूप आश्चर्य वाटते. नंतर त्यांनी आपल्या वडिलांना विचारले की खरंच तुम्हाला करपलेली भाकरी आवडते का ? वडिलांनी उत्तर दिले की करपलेली भाकरी आल्यावर खाणाराचे फार काही नुकसान होत नाही. पण रागात,द्वेशाने बोललेले शब्द मात्र सगळं काही बिघडू शकतात. म्हणूनच तथागत भगवान बुद्ध म्हणतात "वादाने माणसे दूर जातात शब्दाने बाणापेक्षाही तीव्र जखमा होतात".
कबीर म्हणतात "शब्द संभल कर बोलिये, शब्दको हात ना पाँव एक शब्द दवा करे, तो दुसरा करे घाँव!डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती कार्यकाळ २००२ ते २००७ होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आनण्याचा व्यवसाय करीत. या कुटुंबाची रामेश्वरम् वर खूप श्रद्धा होती. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत शिक्षकांकडून जातिभेदाचे काही कटू अनुभव त्यांना आले.शाळेत असतानाच गणिताची त्यांना विशेष आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. आणि तेव्हापासून डॉ. कलाम यांना पैशाचे महत्व पटले.
मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेण्यासाठी आणि शिष्यवृत्ती मिळावी म्हणून त्यांनी तीन रात्री जागून आपला प्रबंध पूर्ण केला. त्यांची खूप इच्छा होती की आपण विमानाचे पायलट व्हावे. जेव्हा ते एयर फोर्स मध्ये भरती होऊ इच्छित होते पण त्यावेळी भारतीय संरक्षण खात्यात भरती फक्त ८ लोकांचीच झाली आणि नऊ नंबर ला अब्दुल कलाम होते. त्यावेळी ते खूप नाराज झाले. पण ते नेहमी म्हणायचे स्वप्न ते नव्हे, की जे रात्री झोपेत पडते, स्वप्न तर ते आहे जे झोपच येऊ देत नाही. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न झोपेचे नव्हते तर त्यांचे स्वप्न हे जागृत डोळ्यांचे स्वप्न होते.जे की त्यांनी सत्यात उतरवले. डिग्री तर मिळाली.आता ते अवकाश तंत्रज्ञानाकडे वळले. आकाश पुढे होते, पण पाय मात्र जमिनीत रुतून बसले होते. पावसात चिमण्या आपला आसरा शोधतात पण गरुड मात्र पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून आकाशात ढगांच्याही वर जातो. देशाचे पहिले स्पेश लाँच व्हेकलपासून ते अणूबाँम्ब चाचणी पर्यंतचा प्रवास, तसेच पाच हजार किलोमीटर अंतर पार करणाऱ्या अग्निबान मिसाईल पर्यंतचा प्रवास डॉ. कलाम यांनी पार केला. पण या बुलंदी पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अग्निदिव्यातून जावे लागले.बुलंदीपर्यंत पोहोचण्याची इच्छा शक्ती ही माणसातील जिद्द, स्वप्न पाहण्याची व ते स्वप्न सत्यात उतरण्याची त्यांनी भारतीयांना प्रेरणा दिली.
त्यांच्या स्वप्नांची सुरुवात होते १९६० पासून जेव्हा अब्दुल कलाम आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी दिल्लीला येतात. त्या ठिकाणी आल्यावर ते संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनतात. या विभागाचे प्रमुख बनल्यावर त्यांनी स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरचा आराखडा तयार करून संरक्षण मंत्री व्ही.के.कृष्ण मेनन यांना दाखवला व एका वर्षात त्यांनी भारतीय सैनिकांसाठी छोटे हेलिकॉप्टर बनवले. त्याचे नाव नंदी असे ठेवले पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीचे हेलिकॉप्टर तयार करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पुढे विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह वाढला. प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष अभ्यासू व परिश्रमी असलेले अब्दुल कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे.
१९६३ नंतर ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत दाखल झाले. सॅटेलाइट लाँच व्हेकल - ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी असे वक्तव्य विक्रम साराभाई यांनी केले होते. डॉ. कलामानी त्यांची भविष्यवाणी सार्थ करून दाखवली. नंतर साराभाईचे नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्या वेळी डॉक्टर कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये मध्ये दाखल झाले. अमेरिकेतील टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्णीबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरू केले. त्यावेळी इस्ञोची नवीनच स्थापना झालेली होती. त्यांनी १९८० साली रोहिणी नावाच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करून तो पृथ्वीच्या कक्षेत सोडला. त्यांच्या या कामगिरीमुळे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी प्रचंड प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी अग्नि, नाग,आकाश, त्रिशूल ,ब्रह्मोस अशा विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार केली. आणि भारताचे नाव संपूर्ण जगाच्या पटलावर उंचावले.११ मे १९८४ हा दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी अमेरिकेच्या गुप्तहेर सेटेलाइटला गुंगारा देऊन चाचणी घेण्यात यशस्वी झाला.ही डॉ.कलाम यांच्या क्षमतेचे सर्वोच्च प्रमाण होते. या परमाणु चाचणीची जगाला कसलीच कल्पना येऊ न देता यशस्वी चाचणी झाली.त्यावेळी डॉक्टर कलाम प्रधानमंञ्याचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेय यांनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली आणि आज अशी परिस्थिती आहे.लाथा घाला पण मंत्री करा.
वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर होता.. व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नि क्षेपणास्त्र यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉ कलाम मनाने खुप संवेदनशील, साधे, सरळ होते . त्यांना रूदविना वाजवण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉक्टर कलाम यशाचा एक एक शिड्या चढत सर्वोच्च स्थानी पोहोचले. पण एवढे यशस्वी होऊनही त्यांच्या कडे काय होते ? ना स्वतःचे घर,ना जमीन ना, एखादी गाडी राष्ट्रपती बनल्यावर त्यांच्याकडे जे होते ते सर्वच त्यांनी दान करून टाकले. ते म्हणाले की मी राष्ट्रपती झालो. मला आता कोणत्याच वस्तूची गरज नाही. कारण सरकारच माझा सगळा खर्च उचलणार तर मला आता संपत्तीची काय आवश्यकता ? राष्ट्रपती बनल्यावर ते दोन सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवनात आले व कार्यकाळ संपल्यावर दोन सुटकेस व त्यांची पुस्तके तेवढेच घेऊन बाहेर पडले. पण राष्ट्रपती भवनात मात्र अमुलाग्र बदल करूनच ते बाहेर पडले. ७५ वर्ष जुनी असलेल्या घरातील सर्व भांड्यांची व्यवस्थित रचना करून त्यांनी किचन म्युझियम बनवले. अशोका हॉलला नवीन टेक्निकलने सुसज्ज केले. मुलांकडून आलेल्या भेटवस्तूंचे एक संग्रहालय तयार केले. मुगल गार्डन ची सहल करणाऱ्यांसाठी आलेल्या प्रवाशांच्या पाणी आणि स्नॅक्सची व्यवस्था केली. या सर्व गोष्टी डॉक्टर कलाम यांच्या साधेपण आणि चांगुलपणा याचीच आजही साक्ष देतात.
भारत सरकारने त्यांना १९८१ ला पद्मभूषण,१९९० ला पद्मविभूषण,तर १९९७ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉक्टर कलाम हे अविवाहित, व पूर्ण शाकाहारी होते. वीस वर्षात विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात.त्यांचे बालपण अथक परिश्रमांत गेले. अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगून जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉक्टर कलाम हे तरूणांसाठी सदैव प्रेरणा देणारी एक संजीवणी आहेत.
राष्ट्रपती भवनातील पशुपक्षांवर डॉक्टर कलाम यांचे विशेष प्रेम होते. मोरा पासून घोड्या पर्यंत त्यांनी स्वतः उभे राहून त्यांचा इलाज करून घेतला.सैन्य दलातील एका घोड्याला एका डोळ्याने दिसत नव्हते. व्हेटर्नरी स्पेशलिस्ट डॉक्टर कडून त्यांनी घोड्याच्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेतले. एका मोराचा पाय मोडला होता तर त्यांनी त्याची प्लास्टर पट्टी केली. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी आपले संपूर्ण जीवन लहान मुले आणि तरुणांसाठी समर्पित केले.आय.आय. एम. शिलॉंग येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते खाली कोसळले आणि त्यांचा अंत झाला. तो दिवस होता २७ जुलै २०१५ भारताने आपला एक महान सुपुत्र गमावला.एका विज्ञान युगाचा अंत झाला. भारताच्या या महान सुपुत्रास त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !
लेखक - शंकर नामदेव गच्चे
( एम. ए. बी. एड.) जि.प. प्रा. शाळा वायवाडी केंद्र पोटा बु.!! ता. हिमायतनगर जि. नांदेड
मोबाइल नंबर -८२७५३९०४१०
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .