तरल भावस्पर्शी शिक्षिका उषा नळगिरे - अभय परिहार

शालेयवृत्त सेवा
0

 



शारदीय नवरात्रौत्सवात आदिशक्ती देवीची आराधना करण्यात येते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना, देव्हाऱ्यात अखंड नंदादीप प्रज्वलित करून सप्तशतीच्या पठनाद्वारे नवरात्री व्रत केले जाते. भारत वर्षामध्ये हिंदू संस्कृतीनुसार विविध देवी देवतांची पूजाअर्चा करून मनोकामनांची पूर्ती व्हावी, स्व उन्नती सोबतच देशोन्नती व्हावी आणि चिरंतन मानवी मूल्यांची जपणूक होऊन समाज व्यवस्था टिकून राहावी ही मनोधारणा देशवासीयांची दिसून येते. खऱ्या अर्थाने देशोन्नती साठी समाजातील स्त्री व पुरुषांच्या शक्तीचे बरोबरीने योगदान महत्त्वाचे असते. 


भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना देवीची उपमा तर दिल्या गेली आहेच त्याचबरोबर आज स्त्रीशक्ती स्व आणि देशोन्नतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले ज्ञान, कौशल्य, क्षमता इत्यादी गुणांनी त्या - त्या क्षेत्राची यशोशिखरे गाठत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील असंख्य कर्तबगार शिक्षिकांपैकी प्रातिनिधिक नऊ शिक्षिकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल लेखमालेतून सर्व शिक्षिकांचा सन्मान करणे या उद्देशाने पहिल्या लेखमालेत उषा नळगिरे प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी मक्ता तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांच्या आंतरिक व बाह्य व्यक्तिमत्व गुणविशेषितांची पटले उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


उषा नळगिरे यांच्या कामाचा परामर्श घेतला असता संवेदनेपेक्षा वेदनेवर काम करण्याचा स्वभाव दिसून येतो. शाळाबाह्य,अनियमित, स्थलांतरित मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शाळेत टिकवून ठेवणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे. वाडी,वस्ती, पाली, ऊसतोड कामगार व हंगामी मोल मजुरी व्यवसाय करणाऱ्या स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी बालरक्षक शिक्षिका म्हणून उल्लेखनीय कार्य अविरत करत आहेत. सन 2017 - 18 ते आजतागायत 13 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. 


तरल भावस्पर्शी स्वभावाच्या उषा नळगिरे यांनी सामाजिक, आर्थिक, वंचित गटातील पालकांना, आदिवासी, हंगामी कामगारांच्या वस्तींना भेटी देऊन शिक्षण हे स्व-उन्नयनाचे साधन असून पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालक व पाल्यांच्या भावनिक तादात्म्याची अनुभूती घेताना पाल्यांच्या शिक्षण वाटेतील काटे बाजूला करून पुष्प आच्छादन करताना एका नवीन दिवसाचा उषःकाल आणताना दिन विशेषचे औचित्य साधत शैक्षणिक साहित्याचे असंख्य वेळी वाटप केले आहे. स्वतःचा,कुटुंबातील सदस्यांचा जन्मदिवस साजरा करणे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिनविशेष, थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी आणि वेळप्रसंगी दिनविशेषची वाट न पाहता सढळ हाताने गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा उषा नळगिरे यांचा स्थायीभाव आहे. समस्याग्रस्त, कायद्याचे संरक्षण आवश्यक असलेल्या बालकांच्या निरीक्षणगृहाला भेट देऊन अशा मुलांच्या शिक्षणासाठी कळवळा येऊन त्यांना मदत करतात.


योग्य वेळी योग्य संस्काराचे महत्त्व लक्षात घेऊन मुलांनी व्यसनापासून दूर राहावे याकरिता तंबाखूमुक्त शाळेमध्ये राज्यस्तर सुलभकाचे कार्य करताना 05 मुलांची महाराष्ट्र भूषण म्हणून निवड करण्यात आली आहे. सतत नाविन्याचा आणि उपक्रमशीलतेचा ध्यास घेतलेल्या उषा नळगिरे यांनी कोरोनाच्या आपदेमध्ये शाळा बंद पण शिक्षण आहे या अंतर्गत  शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घरोघरी शाळा या ऑफलाइन शिक्षण पद्धतीचा अंगीकार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवून अध्ययनक्षय होण्यापासून बचावात्मक उपाययोजना केली. 


वर्ग अध्यापन ही शिक्षकाची संकुचित भूमिका असून राष्ट्र उभारणीसाठी सुशिक्षित नागरिक घडविणे, समुदायासोबत कार्य करणे ही खरी शिक्षकाची भूमिका आहे. प्राथमिक स्तरावरील बालकांमध्ये राष्ट्रभक्ती, निसर्ग प्रेम, स्वावलंबन, प्राणिमात्रांवर दया, सेवा समर्पण या मूल्यांचा परिपोष व्हावा याकरिता उषा नवगिरे यांनी स्काऊट गाईडचे ॲडव्हान्स प्रशिक्षण घेतले आहे.  यामध्ये राज्यस्तरावर सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार हिरक पंख यांनी आठ मुली सन्मानित करण्यात आले आहेत. बदलत्या काळातील तंत्र, कौशल्य, स्वतःला अपडेट ठेवण्याची वृत्ती या गुणांमुळे उषा नळगिरे या सतत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थी - सुलभक भूमिकांमधून स्वयं प्रेरणेने सहभाग घेतात. 


सी सी आर टी उदयपूर येथील क्राफ्ट स्किल, भाषा - गणित अध्ययन समृद्धी, राज्यस्तरीय बालरक्षक प्रशिक्षण, वयानुरूप समकक्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, बालविवाह निर्मूलन, स्मार्ट गर्ल, मासिक पाळी व्यवस्थापन, शाळापूर्व तयारी अशा प्रशिक्षण कार्यक्रमातून सुलभक म्हणून उषा नळगिरे यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या हृदयात लोकप्रियतेचे स्थान निर्माण केले आहे. ' माझी तंबाखू मुक्त शाळा ' - पुस्तक, ' स्पंदने जगण्याची ' - काव्यसंग्रह, ' मैत्री ' - मैत्रिणींनी एकत्रित लिहिलेला सामूहिक काव्यसंग्रह, हिरकणी 20 महिलांच्या संघर्ष कथा संपादित, विविध लेख - निपुण भारत, व्यसनमुक्त भारत, मासिक पाळी, किशोरवयीन मुलींची आव्हाने, ई.साहित्य निर्मितीतून त्यांचा प्रतिभाविष्कार दिसून येतो.


गुणी शिक्षक, बालरक्षक, उत्सव स्त्री जाणिवांचा, व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान, राज्य साहित्य प्रतिष्ठान, राज्यस्तरीय बेस्ट टीचर अवार्ड, शिक्षणरत्न सन्मान, राज्य तसेच देशपातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा कुसुमताई चव्हाण महिला भूषण, शासकीय, निम शासकीय, अशासकीय संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या गाव पातळी ते राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणासाठी ऑस्ट्रिया देशातील सोनी इंटरनॅशनल फाउंडेशन सोबत कार्य, रक्तदान, लसीकरण या राष्ट्रीय कार्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे. 


अध्यापन, समाजसेवा, राष्ट्रीय कार्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत फोटोग्राफी, काव्य लेखन आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात आलेल्या अनुभवांना शब्द रूपात व्यक्त करण्यासाठी डायरी लेखनाचा छंद त्या जोपासत आहेत. सहकार्याची भावना, समाजकार्यात पुढाकार, विद्यार्थ्यांप्रती प्रेम, जबाबदारी वेळेत पार पाडणे, सकारात्मक दृष्टिकोन, उपक्रमशील, स्वयंप्रेरित राहून इतरांना प्रेरित करणे, स्पष्टवक्तपणा, विविध सहशालेय उपक्रमांची सृजनात्मकता, आधुनिक महिला आघाडीतील अग्रगण्य महिला हे त्यांच्याप्रती *सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, मित्र - मैत्रिणी व अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया* आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्याच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलपणे शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या सुहृदयी सहचारिणी मिळाल्या बद्दलचा सार्थ अभिमान पतीला झाल्याशिवाय राहणार नाही.


सर्वगुण संपन्न, शांत, संयमी यांच्या कार्याला शब्दबद्ध करणे म्हणजे *गागर मे सागर* भरण्यासारखे आहे. केवळ उत्सव स्त्रीशक्तीचा करताना त्यांच्या किर्तीचा सूर्य अखंड प्रकाशत राहो या सदिच्छांसह नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! 


- अभय परिहार, अधिव्याख्याता

डायट नांदेड. संपर्क क्रमांक -9004119926

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)