उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांची उपेक्षा समाजाला न परवडणारी

शालेयवृत्त सेवा
0

 



कंधार येथील अखिलच्या पुरस्कार समारंभात डॉ. गोविंद नांदेडे यांचे प्रतिपादन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

उपक्रमशील, गुणवंत आणि विद्यार्थी हितासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांची उपेक्षा आणि अवहेलना समाजाला आणि राष्ट्राला परवडणारी नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे ते अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कंधार ने आयोजित केलेल्या गुरुगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कंधार लोहा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला . 

     

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने या भव्य सोहळ्याचा प्रारंभ झाला. कार्यक्रमारंभी प्रमुख अतिथीचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले..   कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिलचे कंधार तालुका अध्यक्ष हणमंत जोगपेठे यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश  विशद करून शिक्षक सन्मानाचा शिक्षकांच्या कार्यावर सकारात्मक प्रभाव होतो असे सांगून गुरुगौरव पुरस्कारासाठी निवड करताना सर्वोत्तम शैक्षणिक कार्य हाच निकष असल्याचे जोगपेठे यांनी सांगितले. आ श्यामसुंदर शिंदे आणि पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे या प्रमुख अतिथीच्या  हस्ते उपक्रमशील शिक्षकांना  गुरुगौरव पुरस्कार देऊन सपत्नीक  सन्मानित करण्यात आले. 

    

डॉ नांदेडे यांनी पुढे बोलताना शिक्षकांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय विकासातील अपूर्व योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून शिक्षकांनी  आजीवन अध्ययन करण्याचे आवाहन केले. अध्यापन करताना विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणारे आणि विचारप्रवर्तक प्रश्नांधारीत  अध्ययन अध्यापन करण्याचे आवाहन केले. 

     

अखिलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर  यांनी शिक्षकांना दिलेली  अशैक्षणिक कामे तात्काळ बंद करण्याचे शासनास आवाहन केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आम्ही आमचे पवित्र कर्तव्य म्हणून करत असल्याचेही त्यांनी  विशद केले. अखिल चे राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदासराव बसवदे यांनी कंधार  तालुका शाखेने शिक्षक गौरवाची सुंदर परंपरा कायम राखली असल्याचे सांगून गुरू गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. देविदासरव बसवदे यांनीही शिक्षकांची अशैक्षनिक कामे तात्काळ बंद करण्याचे आवाहन केले  आपल्या अध्यक्षीय भाषणात कंधार लोहा तालुक्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिक्षकांच्या या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य आपणास लाभल्याचे सांगून तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले. 


तालुक्यातील सर्व शाळांतील सर्व विद्यार्थ्याच्या हाती संगणक टॅब्लेटस देण्यासाठी आमदार निधीसह जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या स्वनिधितून प्रयत्न करण्याचे  सर्वांना  आवाहन केले.  कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन परशुराम  कौंसल्ये यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)