उपक्रमशीलतेला चालना देणारी माझी काटेमुंढेरीची शाळा - सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अपयशाचे काटे तुडवीत यशाची मुसंडी घ्यायला लावणारी  ’माझी काटेमुंढेरीची शाळा’ या साहित्यकृतींवर नांदेडचे सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ डॉ. हनुमंत भोपाळे यांनी साधला संवाद. ’चला कवितेच्या बनात’ ह्या लोकप्रिय उपक्रमात व शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात डॉ. हनुमंत भोपाळे यांनी विचार मांडले. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांची इच्छा लक्षात घेऊन डोंगर, तळे आदी ठिकाणी शाळा भरवणे हे केवळ प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षकांमुळे शक्य होऊ शकते. अशा उपक्रमशीलतेला चालना देणारी साहित्यकृती म्हणजे माझी काटेमुंढेरीची शाळा होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले.


चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी अंतर्गत इंजि. शिवाजीराजे पाटील, मास्टर कोच, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 272 व्या वाचक संवादमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे यांनी गो.ना. मुनघाटे लिखित माझी काटेमुंढेरीची शाळा या साहित्यकृतीवर संवाद साधला.


डॉ. भोपाळे  पुढे म्हणाले की, ह्या कादंबरीतील नायक गोंडी भाषा शिकून त्या भाषेतून आदिवासी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधतो. अशा प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षकांमुळे शैक्षणिक चैतन्य निर्माण होते. मडगू पाटील यांच्या सारखी माणसं ह्या शिक्षकाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात, त्यामुळे निर्भयपणे अध्यापनाचे काम हा शिक्षक करू शकतो. कटकारस्थान करणार्‍या लोकांमुळे या कादंबरीतील त्यागी समर्पित वृत्तीने काम करणार्‍या नागोसे शिक्षकाला जीवाला मुकावे लागते. ही अतिशय गंभीर बाब आहे. असे अत्यंत प्रभावी संवाद साधतानाच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. हनुमंत भोपाळे यांनी दिली.


अध्यक्षीय समारोप करताना इंजि. शिवाजीराजे पाटील म्हणाले, माझी काटेमुंढरीची शाळा या कादंबरीवर डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केलेले भाष्य चिंतनशील, नवी दृष्टी देणारे असून वाचक संवाद हा उपक्रम देखील तेवढाच उपकारक असाच आहे. या कार्यक्रमाचे संचलन संयोजक अनंत कदम यांनी केले. संवादकांचा परिचय बाबुराव बसवदे यांनी करुन दिला तर आभार राघवी रामविलास नावंदर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी आनंद बिरादार, राजेंद्र एकंबेकर, बालाजी सुवर्णकार, हनुमंत म्हेत्रे, राजपाल पाटील, सुरेश वजनम, रामविलास नावंदर, मिटू पाटील, मुरलीधर जाधव आदींनी परिश्रम घेतले.


प्राचार्य डॉ. विनायक जाधव, मोहन निडवंचे, सुमित्रा वट्टमवार, गुंडप्पा पटणे, आकाश कांबळे, मुरलीधर जाधव, डॉ दत्ताहरी होणराव, प्रा. बालाजी सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)