पालकांनो जागे व्हा !

शालेयवृत्त सेवा
0

 




सध्याचे युग हे आधुनिक आहे, स्पर्धेचे आहे, धावपळीचे आहे, नवनवीन शोधांचे आहे, बदलाचे आहे, कोविड नंतरच्या परिस्थितीने बदललेले आहे. आताची पिढी प्रचंड हुशार आहे आणि प्रचंड तणावाखाली पण आहे. तसेच या आधुनिकतेच्या स्पर्धेच्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी त्यांची दमछाकही खूप होत आहे. हे सगळे खरं असलं तरी ही पिढी कुठेतरी हरवत चालली आहे, दूर चाललीये आपल्या कुटुंबापासून, संस्कारपासून , मित्र मैत्रिणींपासून, स्वतःपासून, त्यांच्यातील स्वतत्वापासून आणि हे सगळं कशासाठी? तर भौतिक सुखासाठी. हल्लीचे पालक आपल्या मुलांबद्दल एवढे जागरूक आहेत की मुलांना शिकायला शिक्षक घरी येतात. अध्ययन अध्यापन ही एक प्रक्रिया आहे, त्यासाठी विशिष्ट वातावरण असणे आवश्यक आहे. 


पूर्वीच्या काळीही मोठमोठ्या राजांची मुले गुरुजी जाऊन शिक्षण घेत. राम, कृष्ण पण ऋषींच्या आश्रमात जाऊन शिकले. महात्मा गांधी,  सावरकर डॉक्टर, आंबेडकर महात्मा फुले, डॉ. अब्दुल कलाम इत्यादी अनेक थोर व्यक्तिमत्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पुढे आली. सध्या स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार झाला आहे. विभक्त कुटुंबातील चार व्यक्ती एकाच घरात अशा राहतात की ज्यांची तोंड एकमेकांना क्वचित दिसतात. मग सुसंवाद सोडाच… आजी-आजोबांकडून जे संस्कार मिळत होते ते थांबले. 


एकत्र कुटुंब पद्धतीतून मिळणारे एकत्रतेचे धडे , मोठ्यांबद्दलचा आदर, राष्ट्रप्रेम , कौटुंबिक जिव्हाळा, सहकार्य वृत्ती इत्यादी गुणांचा ऱ्हास झाला आहे. त्याचबरोबर स्वार्थी वृत्ती वाढत चालली कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल इंटरनेट यांच्या आहारी पिढी गेली. इंटरनेटच्या अतिवापरामुळे नवीन पिढी नको त्या गोष्टींच्या आहारी गेली आहे. उत्क्रांती शास्त्राच्या नियमाप्रमाणे शरीराचा एखादा भाग दीर्घकाळ वापरला नाही तर पुढील पिढ्यांमध्ये तो हळूहळू नष्ट होत जातो त्यानुसार आम्ही चांगुलपणा , राष्ट्रप्रेम, सहकार्य भावना, कृतज्ञता, समता इत्यादी गुणांचा वापर केलाच नाही तर काळाच्या ओघात हे गुण पडद्याआड जातील, आणि चांगल्या विचारांची प्रेरित होऊन जीवन सत्कार मत जाण्याऐवजी ते षड्विकारांच्या पुरतीत जाईल. 


त्यासाठी पालकांनो जागे व्हा! पालकांनो वेळ निघून जाण्यापूर्वी जागे व्हा, अन्यथा याची झळ तुम्हालाच बसणार आहे संपत्ती कमावणारे यंत्र तयार करण्यापेक्षा माणुसकी जपणारा माणूस घडवा. "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" अशा प्रकारचा माणूस घडवण्यासाठी प्रथम आई-वडील सुसंस्कारित आरोग्य संपन्न व बुद्धिमान असले पाहिजेत, त्याशिवाय पुढची पिढी चांगली होऊ शकणारच नाही. त्यासाठी सर्वांना विनंती आहे आपणही जागे व्हा व इतरांनाही जागे करा.



लेखिका :

- सौ. राणी जयंत कुलकर्णी 

      पुणे महानगरपालिका

१६२ मुलांची चंद्रभागा नगर, कात्रज, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)