२० पेक्षा कमी पटाच्या शाळा शासनाने बंद करू नयेत. बंद केल्यास न्यायालयीन लढा देणार..

शालेयवृत्त सेवा
0

 



पुरोगामी शिक्षक संघटनेचे शासनास निवेदन

   

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांची माहिती संकलन करून सदर शाळा जवळच्या शाळेत समायोजीत करण्याचा शासन स्तरावरून चालेला प्रयत्न वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून शासनाने सदर शाळा पट संख्येअभावी बंद करू नयेत अन्यथा संघटनेच्या वतीने न्यायालयीन लढा देण्यात येईल या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना मेलद्वारे नुकतेच पाठवले आहे.

       निवेदनाची प्रत राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनाही पाठवण्यात आली आहे.

      

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी  व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची नावे व संबधित शाळांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाल्यास सदर शाळांचे नजीकच्या शाळेत समायोजन करता येईल काय ? अशी माहिती संकलन करण्याच्या सुचना सर्व शिक्षणाधिका-यांना दिल्या आहेत.

     

खरे पाहता इयत्ता १ली २ री मधील लहान बालकांना गावातील शाळेत रुळण्यासाठी वेळ लागतो आणि बालमानशास्त्राचा विचार करता अशी लहान बालके परगावी शिक्षणासाठी प्रवास करुन पाठवणे उचीत नाही. तसेच त्यांच्या सुरक्षततेक्षा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

       

वाडीवस्तीवरील बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने वस्ती तेथे शाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणारी तेथील मुले व मुली शिक्षण प्रवाहात आली आहेत. बालकाचा शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा २००९  नुसार राज्यातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला त्याच्या इच्छेनुसार मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. बालकाच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार १ कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या वाडीवस्तीवरील शाळा पट संख्या कमी आहे म्हणून बंद करता येणार नाहीत. शाळा बंद झाल्यास तेथील मुले पुन्हा शिक्षणापासून वंचित राहतील.


निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे,राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, राज्य संघटक अशोक मोरे आदींच्या सह्या आहेत.


२० पेक्षा कमी पटाच्या बहुतांश शाळा ग्रामीण व डोंगराळ भागात आहेत. वाडीवस्तीवर जन्म होणे हा त्या बालकाचा दोष नसून तेथील शाळा पटसंख्या अभावी बंद करणे हा त्या विद्याथ्यांवर अन्याय होईल. सदर शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयीन लढा देणार !

- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)