पुणे येथील बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांनी बालकुमारांसाठी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या 'पियूची वही' ह्या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीच्या अंतिम फेरीत माझे 'नदी रुसली, नदी हसली' हे पुस्तकही होते. 'नदी'चा पुरस्कार हुकला आणि तो 'पियू'ला मिळाला. याचे मला अजिबात वाईट वाटले नाही. उलट नदीला पुरस्कार मिळाल्यावर जितका आनंद झाला असता, तितकाच पियूला पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. कारण कोणत्याही साहित्यिकाला मी माझा प्रतिस्पर्धी समजत नाही. प्रत्येक कलाकृतीचे एक प्रारब्ध असते. त्यानुसार त्या कलाकृतीचे यशापयश ठरत असते. ह्या यशाबद्दल डॉ. संगीता बर्वे यांचे हार्दिक अभिनंदन!
ह्या कादंबरीची नायिका पियू ही सातवीत शिकणारी चुणचुणीत आणि संवेदनशील मुलगी आहे. तिचं खरं नाव प्रियंका असलं, तरी सगळे तिला पियूच म्हणतात. ही पियू एका वहीत आपली दैनंदिनी लिहिते. एखाद्या दिवशी हे लेखन दोन तीन वाक्यांचं असतं, तर कधी ते दोन तीन पृष्ठांचंही असतं. ही रोजनिशी म्हणजे पियूची मैत्रीण आहे. ही रोजनिशी म्हणजे पियूच्या मनाचा लख्ख आरसा आहे.
बाळगोपाळांना मिळालेली उन्हाळी सुट्टी म्हणजे पालकांवर येऊन पडलेले मोठे धर्मसंकट वाटते. उन्हापासून बचाव करण्यासाठी पालकांना आराम पाहिजे असतो आणि बालकांना आराम अजिबात मानवत नसतो. बालकांना गुंतून राहण्यासाठी सतत काहीतरी नवीन उद्योग लागतो. म्हणूनच तर हुशार पालक आपल्या पाल्यांना संस्कारवर्गात, उन्हाळीवर्गात किंवा वेगवेगळ्या शिबिरांत गुंतवून ठेवतात.
पियूला उन्हाळी सुट्टी लागली आहे. तिला घरात एका जागी बसून करमत नाही. डोक्याला काहीतरी खुराक लागतोच. आईवडलांच्या परवानगीने तिने खिडकीचे गज रंगवायचे काम हाती घेतले. आधी खिडकीचे गज घासून काढले. बाबांसोबत बाजारात जाऊन रंग आणि ब्रश आणले. खिडकी रंगवली. हे काम करताना तिला फुल्ल टू धमाल मजा आली! पियूने रंगवलेली रंगीत खिडकी आता घरातल्या सगळ्यांचीच आवडती झाली आहे.
एके दिवशी मित्रमंडळीसोबत जाऊन 'जंगल बुक' हा सिनेमा पाहिला. पियूला पक्षीनिरीक्षण करायला आवडतं. पियूला बागेत शिंजीर, होला, हळद्या, तांबट हे मित्र भेटतात. आता पियूला बुलबुल, खंड्या, शिंपी, सुगरण, वेडा राघू, दयाळ, हळद्या, हे पक्षी ओळखता येऊ लागले आहेत.
तांबट पक्षी दिसतो चिमणीएवढा, पण 'कुक कुक' करतो गिरणीएवढा. हे पियूचे निरीक्षण आहे. तांबट पक्ष्याला पाहून पियूने कविता लिहिली :
'तांबट तांबट, अरे ए तांबट,
खातोस का चिंच आंबटचिंबट'.
कोकिळेचे लाल डोळे बघून पियूला प्रश्न पडला, की कोकिळेचे डोळे आले आहेत. पियू पक्षीनिरीक्षण करायला लागल्यापासून तिचे डोळे आणि डोके दुखणे बंदच झाले आहे. पियू आता नजरेचा आणि डोक्याचा वापर करते आहे, असे आई म्हणते. पियूची आई कमी वेळा हसते आणि जास्त वेळा रागावते.
खिडकीजवळच्या फांदीवर बसून कोकीळ 'कुहू कुहू' अशी हाक मारतो. पियूला वाटतं, तो 'पियू पियू' म्हणतोय. मग पियू आणि कुहूची एकमेकांना साद घालण्याची जुगलबंदीच सुरू झाली.
पियूच्या घरात आणखी एक मित्र आहे, तो म्हणजे हिरू डॉग. पियू त्याच्यासोबत चेंडूफेकीचा खेळ खेळते. ती चेंडू फेकते आणि तो तोंडात धरून चेंडू आणून देतो.
एके दिवशी पियू आकाशदर्शनासाठी वरसगावला गेली होती. तिथे पुरंदरेकाकांनी त्यांना ग्रह आणि तारे यातील फरक समजावून सांगितला. रात्री झोपेत, स्वप्नात तिच्याभोवती चांदण्या फिरत होत्या. त्यातल्या काही चांदण्या तोडून तिने फ्रॉकच्या खिशात भरल्या. आपल्या भावविश्वात पियू चांदणीसारखी चमचम चमकत असते.
शिंजीर पक्ष्याला बघताच पियूला कविता सुचली:
'अंजूमावशीच्या बागेत रोज येतो शिंजीर
वरच्या मजल्यावरून त्याला पाहतात कुंजीर'.
पियूला असा शब्दांशी खेळण्याचा नाद लागला आहे.
पियूला आता डायरी लिहिण्याचे फायदे समजू लागले आहेत.
अंजूमावशीच्या बागेत एके दिवशी पियूला मुंगूसराव, मुंगशीणबाई आणि त्यांची दोन खट्याळ मुलं दिसतात.
एके दिवशी पियूकडे गुड्डी आणि सायली ह्या दोन मैत्रिणी आलेल्या असतात. त्या दिवशी गारांसह पाऊस पडतो. तिघींनीही गारा वेचून मनसोक्त खाल्ल्या. अंगणात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या बनवून सोडल्या. पियूला अशा अनेक आयडियाच्या कल्पना सुचत असतात आणि ती त्या बिनधास्त अमलात आणत असते.
पियूला आपल्या केसांचा बॉयकट मारायची इच्छा आहे, पण शाळेमुळे मनासारखे काही करताच येत नाही, असे पियूला वाटते.
पियू अनेकदा धडपडते आणि पडते. आई तिला धांदरटपणा कमी करायला सांगते, पण पियूला ते जमतच नाही. काय करणार!
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर कसे होते, हे समजून घेण्यासाठी पियू आईवडलांच्या मदतीने घरातच प्रयोग करते. सुरवंटापासून बनलेलं ते नाजूक पंखांचं, जर्द पिवळ्या रंगाचं, इटुकइवलं फुलपाखरू बघून पियूला कोण आनंद झाला! पुस्तकात वाचलेलं आता तिला प्रत्यक्ष पाहायला मिळालं होतं. त्या फुलपाखरासोबत पियू दिवसभर बागडत होती. पुस्तकी माहितीपेक्षा बालकुमारांना असे प्रात्यक्षिक ज्ञान अधिक आवडते.
एके दिवशी पियूची आई हिरूला घरात कोंडून बाहेर जाते. आई येईपर्यंत हिरू कापसाची गादी फाडून चिंध्या चिंध्या करून टाकतो. आई काठी घेऊन त्याच्या मागे धावते. हिरू आईचे सगळे फटके चुकवतो. ते पाहून पियूला धमाल मजा येते.
एके दिवशी सकाळीच पियू आईवडलांसोबत पर्वतीच्या मागच्या टेकडीवर फिरायला जाते. पियूला आरोग्याच्या चांगल्या सवयी लावायची बाबाची इच्छा आहे, पण साखरझोपेपुढे पियूला दुसरे काही सुचतच नाही. टेकडीवर तिला खूप सारी झाडे भेटतात.
पियू गुपचूप आईचा मोबाईल पळवते आणि आपला सेल्फी काढते. पियूचा तो सेल्फी पुस्तकात छान छापला आहे.
बाबाचा लाडका हिरू ही आईसाठी डोकेदुखी आहे. तो घराबाहेर जातो आणि घाणीत लोळून अंग घाण करून येतो. आई त्याला मारूमारून आंघोळ घालते.
जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. बाबांनी पियूसाठी आठवीची नवीन पाठ्यपुस्तके आणली.
पियूच्या बागेतल्या झाडावर, अगदी खिडकीजवळ तांबट आणि तांबटीणबाईनं छान घरटं बनविलं होतं. तांबटांचं बाळ घरट्यातून पियूकडे टुकूटुकू बघत असे. पियूही टक लावून त्याच्याकडे बघत बसे.
जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही. सगळेच पावसाची वाट पाहू लागले.
पियूने पावसाला उद्देशून कविता लिहिली आहे :
'पावसा पावसा पड पड
भरपूर पड, भरपूर पड
गावाकडे पड, इथेही पड
सगळीकडे पड, खूप खूप पड
पड रे बाबा, एकदाचा पड'.
आपण पडल्यावर आपल्याला खरचटतं. इतक्या उंचावरून पडल्यावर पावसाला खरचटत असेल का? हा प्रश्न पियूला सतावतो आहे.
पियू पेन्सिलला टोक करायला जाते, तर ते टोक वारंवार मोडून जातं. बालपणीचा तुमचा माझा अनुभव यापेक्षा वेगळा नसतोच.
पियू आता खूपच समजूतदार आणि स्वावलंबी झाली आहे. ती आपलं दप्तर आपणच भरते. घरी आल्यावर सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवते. दररोज आपले पायमोजे आपणच धुऊन ठेवते. पियूतला हा बदल कौतुकास्पद आहे! पियू यंदा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प करते.
सायली, गुड्डी आणि पियू ह्या मैत्रिणी भेटल्या की खूप गप्पा मारतात. हसतात, खिदळतात. गुड्डी शाळेतल्या बाईंची नाकातून बोलण्याची नक्कल करते..
पियूला झाड व्हायला आवडतं. देव प्रसन्न झाला आणि त्याने विचारले, तर पियू देवाला म्हणणार आहे, की देवा मला हिरवंगार झाड कर.
झाड होण्याचे किती किती फायदे आहेत!
एकतर शाळेत जायला नको. चालणं नाही, फिरणं नाही. एका जागी शांत उभा राहायचं. सर्वांना गार सावली द्यायची. पक्षी येतील. फांद्यांवर घरटी बांधतील. सगळी मज्जाच मज्जा!
पियूचं आणखी एक स्वप्न आहे. निसर्गातला एक छानसा, रंगीबेरंगी पिसांचे पंख असलेला पक्षी व्हावं, असं पियूला नेहमी वाटतं
जो झोपतो, त्याचं नशीब झोपतं, असं आई नेहमी म्हणते. पण पियूला रविवारी सकाळी उशिरापर्यंत झोपून गोडगोड स्वप्नं पाहायला फार आवडते. तशी पियू काही आळशी मुलगी नाही.
पियू एका रविवारी आपल्या 'निसर्ग' ह्या ग्रूपसोबत सिंहगडाची सहल करते. बागकाम करते. बाबांसोबत बाजारात जाऊन भाजीपाला आणते.
पियूला पावसात भिजायला खूप आवडते. आई अजिबात विरोध न करता परवानगी देते.
एके दिवशी पियूने 'मीच ग्लोबल होईन' ही कविता लिहून बाईंना दाखविली. पियूने कवितेच्या माध्यमातून, कल्पनेत का होईना, मंगळावर जाण्याचा आनंद लुटला आहे. पियू आपल्या आसपास वावरणाऱ्या बेडूक, पाल, गोगलगाय, मुंग्या इ. जीवांचे बारकाईने निरीक्षण करते. जे दिसले, ते दैनंदिनीत टिपून ठेवते.
पियूने एकदा आईबाबांसोबत कात्रजच्या सर्पोद्यानाची सफर केली. तिथे एक मोठा साप छोट्या सापाला गिळताना पाहिला. सुट्टीत दररोज पहाटे उठून टेकडीवर फिरायला जाणं, नवनवीन वाटा शोधून काढणं, झाडं, पानं, फुलं यांचं निरीक्षण करणं, पक्षी पाहणं, जे जे पाहिलं, जे जे केलं, ते रात्री झोपण्यापूर्वी वहीत लिहून ठेवणं अशा कितीतरी सुंदर गोष्टी पियू नियमित करते.
पावसात झाडाखाली कधीच उभे राहू नये, वीज पडण्याची शक्यता असते, असे शास्त्रीय ज्ञान बाळगोपाळांच्या गप्पांतून मिळत जाते.
पियूची ही वही अतिशय आनंददायी आहे, मात्र शेवटच्या भागातील हिरू डॉगीच्या मृत्यूचे वर्णन वाचून वाचकही अस्वस्थ होतो. बागेत खड्डा खणून हिरूला त्यात पुरले. त्यावर चाफ्याचे झाड लावले. त्याला नाव दिले, 'हिरू चाफा'.
पियूची ही वही शाळेच्या हेडबाईंनी मुद्दाम वाचली आणि त्यांनी पियूचे खूप कौतुक केले.
डॉ. संगीता बर्वे यांनी पियूच्या माध्यमातून मराठी बालसाहित्यात वाढाळू वयातील एक निरागस आणि लोभस नायिका उभी केली आहे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून बालकुमार वाचकांच्या मनावर रोजनिशी लेखनाचे महत्त्व बिंबविले आहे. लेखिकेने मुलामुलींमध्ये दडलेल्या सर्जनशीलतेची ओळख शिक्षकांना आणि पालकांना करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. उमलत्या वयातील लेकरांची ऊर्जा कशी सत्कारणी लावायची याचा धडा दिला आहे. लेकरांमध्ये लपलेल्या सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होण्यासाठी शिक्षक - पालकांनी काय दक्षता घ्यायची, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे ही कलाकृती होय. लेखिकेने वापरलेली बालसुलभ, अनौपचारिक आणि लडिवाळ भाषा हे ह्या कलाकृतीचे बलस्थान आहे.
डॉ. संगीता बर्वे यांनी पर्यावरणाविषयीची सजगता, स्वावलंबन, संवेदनशीलता, अध्ययनशीलता, प्रयोगशीलता, कलात्मकता, कल्पकता, विज्ञाननिष्ठा, ध्येयनिष्ठा, तत्परता, भूतदया इ. मूल्यांचे संस्कार अतिशय सहजतेने बिंबवले आहेत. लेखिकेचे लेखन जितके भावस्पर्शी आहे, तितकेच चित्रकार ऋजुता घाटे यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील बोलकी चित्रे अतिशय आकर्षक आहेत. ज्योत्स्ना प्रकाशनाने पुस्तकाची निर्मिती वहीच्या आकारात करून ह्या अक्षरांची कोवळीक जपली आहे. १०० पृष्ठांचे हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, हे ह्या कलाकृतीचे खरे यश आहे आणि हाच खरा पुरस्कार आहे.
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
'पियूची वही' ( बालकादंबरी)
लेखिका : डॉ. संगीता बर्वे
मुखपृष्ठ : ऋजुता घाटे
प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे व मुंबई.
पृष्ठे १०० किंमत रु. १००
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .