भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, राज्य शैक्ष. संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व डायट च्या संयुक्त विद्यमाने शाळाभेट !

शालेयवृत्त सेवा
0


 


 नंदुरबार  (शालेय वृत्तसेवा) : 

आय.आर.आय.एस.ई प्रकल्प अंतर्गत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, राज्य शैक्ष. संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व डायट नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर भेटी करतांना डॉ. सौरभ दुबे, प्राध्यापक तथा सहाय्यक प्रकल्प संशोधक आयसर पुणे, श्रद्धा भुरकुंडे, सहयोगी प्राध्यापक, डायट नंदुरबारचे वरिष्ठ अधिव्याख्याता  रमेश चौधरी, अधिव्याख्याता तथा समन्वयक डॉ. राजेंद्र महाजन, अधिव्याख्याता सुभाष वसावे, आयसरचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाने, आयसरचे सहयोगी प्रज्ञा पुजारी, शुभम पाटील यांच्या पथकाने शाळांच्या भेटी करण्यात आल्या. 


या प्रकल्पातर्गत  शाळा भेटीत अक्कलकुवा तालुक्यातील  पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रम शाळा मोलगी, माध्यमिक विद्यालय  मोलगी, जि. प. उच्च प्राथमिक शाळा बिजरीपाटी ,जि.प. प्राथमिक शाळा साकलीउमर, शासकीय आश्रम शाळा डाब अशा पाच शाळांना भेटी देण्यात आल्या. सदर भेटी दरम्यान आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपारिक वेशभूषा धारण करून मान्यवरांचे स्वागत केले तसेच माध्यमिक विद्यालय  मोलगी येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती वाद्यांसह पारंपारिक सिबली नृत्याचे  दर्शन घडविले. 


यावेळी प्राध्यापक तथा संशोधक डॉ. सौरभ दुबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, आपल्या मनातील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याबाबत स्पष्ट केले. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या विविध घटनांमधून आपल्याच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्याचे आवाहन केले. श्रद्धा भुरकुंडे व प्रज्ञा पुजारी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोग टाकाऊ वस्तु पासून कसा तयार करतात व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयातील विविध संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 


खेळीमेळीच्या आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानातील वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पुणे येथील आयसर संस्थेचे सर्व संशोधक अधिकारी यांनी मुक्तपणे संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी व विज्ञानाचा योग्य तो प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले होते. या भेटीत ड्रोन कॅमेराद्वारे विद्यार्थी प्रात्यक्षिकांची अनुभव संकलन करण्यात आले. 


सदर शाळाभेट करताना मोलगी केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यवंशी व डाब केंद्राचे केंद्रप्रमुख पवार उपस्थित होते. सदर शाळा भेटीचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)