वारंगा येथील सरपंच उद्बोधन कार्यशाळेत डॉ नांदेडे
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
लोकांची सर्जनशील उत्पादन क्षमता वाढेल अशा विकासाची लोकांना प्रेरणा द्या ,त्यासाठी गावातील शाळा ही गावाच्या शाश्वत विकासाचा आणि लोकोध्दाराचा राजमार्ग असल्यामुळे शाळा नवाध्यापन तंत्रज्ञानाने समृध्द करण्याचे आवाहन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांनी केले आहे. ते राज्य शासनाच्या वतीने आयोजित हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील आकरा तालुक्यातील नव निर्वाचित सरपंच कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
नवनिर्वाचित सरपंचांना विकास कार्यप्रणालीचे उद्बोधन होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ही कार्यशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. पुढे बोलताना माजी शिक्षण संचालकांनी गावाची सुधारणा आणि गावाचा विकास या दोन वेगळ्या संकल्पना असल्याचे प्रतिपादन केले. गावातील सुख सुविधायुक्त साधनांची उपलब्धी म्हणजे सुधारणा तर लोकांची सर्जनशील उत्पादकता संवर्धित करणे म्हणजे विकास होय . शिक्षणामुळे असा लोकक्षमतांचा शाश्वत विकास होतो असे त्यांनी प्रतिपादन केले.
या नवनिर्वाचित सरपंच उद्बोधन कार्यशाळेत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी हे तालुके तर नांदेड जिल्ह्यातील नांदेड, हदगाव, उमरी, किंनवट, माहूर, कंधार, लोहा, अर्धापूर आणि हिमायतनगर या नऊ तालुक्यातील सरपंच या उद्बोधन कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. वारंगा येथील सरस्वती शिक्षण संकुलात आयोजित या सरपंच उद्बोधन कार्यशाळेचे व्यवस्थापन आणि सनियंत्रन शासन प्रतिनिधी म्हणून बी एम वराळे आणि रामकृष्ण दिघडे हे करीत आहेत .
संस्थेचे प्रमुख सचिन क्षीरसागर आणि सहायक म्हणून मारोतराव कदम उद्बोधन कार्यशाळेत महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहेत. चार दिवस चालणाऱ्या या सरपंच उद्बोधन कार्यशाळेत ग्रामपंचायत व्यवस्थापन, कर निर्धारण, मनरेगा, ग्राम पंचायतीत ठेवावयाची अभिलेखे, केंद्र पुरस्कृत शाश्वत विकासाच्या नऊ सिद्धांतावर त्या त्या क्षेत्रातील व्यासंगी अभ्यासकांकडून सखोल उद्बोधन करण्यात येत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .