राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेणार | Medical college

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई दि 24 : सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.


वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालये स्थापन करण्याची व श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (आयएफसी) मदतीने सुरू असून, यासंदर्भातील कामाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त विरेंद्र सिंह, आयएफसीचे प्रतिनिधी पंकज सिन्हा, हर्षा कुंभचंदानी उपस्थित होते.


श्री. महाजन म्हणाले की, राज्य शासनाने सन 2030 पर्यंत सर्वांना परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा (Tertiary Helath care) पुरविण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे राज्य शासनाने निश्चित केले असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय विकसित करणे आणि सर्वांना परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे याकरिता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना महाराष्ट्र शासनाचे रणनीती सल्लागार म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे.


सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर राज्यात वैद्यकीय महाविद्यालये, सुपर स्पेशालिटी रूग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात गती देण्यात द्यावी, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिले.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले, आरोग्य सेवा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभारणे आणि आरोग्य सेवा विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. २०३० पर्यंत सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा पुरविणे, वैद्यकीय शिक्षणाचे व आरोग्य सेवांचे राज्यभरात श्रेणीवर्धन करणे, विद्यमान मनुष्यबळामध्ये कार्यक्षमता वाढविणे आणि काही उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा विकसित करणे ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

 

लातूर, नागपूर, यवतमाळ आणि औरंगाबाद येथे उभारण्यात आलेली अतिविशेषोपचार रूग्णालये तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी व त्यासंदर्भातील अहवाल कालमर्यादेत सादर करण्यात यावेत. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बांधकाम जलद गतीने पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री श्री. महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)