आदिवासी मुलींना नोकरी करत शिकण्याची संधी ; त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी -उत्तम कानिंदे

शालेयवृत्त सेवा
0




"एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिवासी मुलींना प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, होसूर येथे नोकरी करत शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 6 व 7 सप्टेंबरला गोकुंद्यात निवड चाचणी शिबीर आयोजित केले आहे. याविषयी उत्तम कानिंदे यांचा लेख -संपादक "



          देशपातळीवर नव रोजगार निर्मिती , नवी नोकर भरती बंदच आहे. अनेक कंपन्यांचा मनुष्यबळ कमी करण्यावर भर आहे. परंतु अशाही स्थितीत किनवटचे प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार(भाप्रसे) यांनी आदिवासी मुलींना नोकरी करत शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नांदीच ठरणार आहे. 


         महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट जि . नांदेडच्या वतीने टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, होसूर यांच्या सहकार्याने 12 वी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थिनींना ज्युनिअर टेक्निशियन या पदावर नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण करण्याची संधी प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार(भाप्रसे) यांनी उपलब्ध करून देऊन आदिवासी मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे.




         मागील वर्षी भरती शिबीर आयोजित करून 150 मुलींची निवड केली होती. यातील 80 मुलींनी बेंगलूरू व चेन्नई येथे प्रशिक्षण घेतले. त्यापैकी सुमारे 50 मुली आज टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसूर येथे ज्युनिअर टेक्निशियन या पदावर कार्य करीत आहेत. कामासोबतच शिकण्याची संधी गतवर्षी उपलब्ध करून दिली होती. यास प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. म्हणून याही वर्षी 12 वी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण 18 ते 21  वयोगटातील, वजन 45 किलो ग्रॅम व किमान उंची 145 सेमी असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींना आकर्षक वेतनासह ज्यूनियर टेक्निशियन या पदावर कार्य करीत बी.एस्.सी. ( मॅन्युफॅक्चरींग सायंस ) ही पदवी मिळविण्याची संधी व त्यानुसार कंपनीत उच्च पदावर कार्य करण्याची संधी पुन्हा एकदा यावर्षी उपलब्ध करून दिली आहे.


         मंगळवारी (ता. 6 सप्टेंबर ) नांदेड , हिंगोली , लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील व बुधवारी (ता. 7 सप्टेंबर ) सकाळी 9 वाजता यवतमाळ , अमरावती, अकोला जिल्ह्यातील व इतर ठिकाणच्या मुलींची निवड चाचणी महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा (किनवट) जि.नांदेड येथे होणार आहे. तेव्हा आदिवासी मुलींनी बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका, टी.सी., आधार कार्ड व जातीचे प्रमाण पत्र ह्या सर्व प्रमाण पत्रांच्या स्वयंसाक्षांकित सत्यप्रतीसह उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार(भाप्रसे) यांनी केले आहे.


         याविषयी अधिक माहितीसाठी नियोजन अधिकारी शंकर साबरे (9404490023) व समन्वयक तथा सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) नितीन जाधव (9527105559 ) यांचेशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.


      सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ( सीएमआयई ) या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार 2017 ते 2022 या काळात भारतीय श्रमिकांमधील 2 कोटी स्त्रिया नाहीशा झाल्या आहेत.  त्यामुळे ग्रामीण भागांत मुलींच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. अशा  स्थितीतही आपल्या कल्पकतेने प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी  आदिवासी मुलींना नोकरीसह आपलं शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 
        दुःख, दैन्य, अज्ञान, अंधःकार यामुळे प्रगतीपासून कोसो दूर गेलेल्या अतिदूर्गम पाड्या-गुड्यातील आदिवासींच्या झोपडीत आशेची ज्योत पेटविणारा हा अनोखा उपक्रम ठरणार आहे.


- उत्तम कानिंदे ,
मीडिया समन्वयक  किनवट / नांदेड
9421758078
8055301800
ukaninde@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)