गुरूजींच्या जिल्हातंर्गत बदल्या लांबणार : ग्रामविकास विभागाने नेमलेल्या कंपनीने नव्याने माहिती मागवली | Intra-District Transfers

शालेयवृत्त सेवा
0

 




नंदुरबार ( गोपाल गावित ) :

कोविडमुळे दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या लांबलेल्या जिल्हातंर्गत बदल्या यंदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ग्रामविकास विभागाने खासगी कंपनीची नेमणूक करत आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची बदलीची प्रक्रिया पार पडली आहे. आंतरजिल्हा बदलीनंतर लगेच जिल्हातंर्गत बदल्याची प्रक्रिया होईल, अशी जिल्ह्यातील शिक्षकांना अपेक्षा होती. 


मात्र, आता बदलीसाठी नेमलेल्या कंपनीने पुन्हा जिल्ह्यातील शिक्षकांकडून नव्याने माहिती मागवली असून यामुळे सुमारे एक ते दीड महिना गुरूजींच्या बदल्या लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दोन वर्षापासून कोविडमुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाही. साधारण मे महिन्यांच्या अखेरीस अथवा जूनमध्ये होणार्‍या गुरूजींच्या बदल्यांना आता सप्टेंबर उजाडला तरी अद्याप मुहूर्त लागलेला नाही. आंतरजिल्हा बदली शिक्षकांची विलंबाने का होईना, बदली प्रक्रिया झालेली आहे. यामुळे जिल्हातंर्गत शिक्षकांच्या यंदा बदल्या होतील, या आशेवर जिल्ह्यातील गुरूजी आहेत. 


दरम्यान, बदलीसाठी शिक्षकांनी यापूर्वी स्वत:ची माहिती होय, नाही, स्वरूपात ऑनलाईन सादर केलेली आहे. मात्र, या माहितीच्या आधारे जिल्हातंर्गत बदल्या झाल्यास त्यात त्रुटी राहण्याची शक्यता असल्याने पुन्हा शिक्षकांकडून ते सध्या कार्यरत असणार्‍या अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील माहिती मागवण्यात आली आहे. सध्या ही माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.


साधारण आठ दिवसांत ही माहिती संबंधीत कंपनीपर्यंत पोहचल्यानंतर संवर्गनिहाय शिक्षकांकडून पुन्हा ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यासोबत संबंधीत शिक्षकांचा बदलीसाठी होकार अथवा नकार याची माहिती घेण्यात येणार आहे. ही माहिती भरून घेतल्यानंतर रिक्त जागांचा अंदाज येणार असून यात बराच वेळ जाणार असल्याने यंदा जिल्हातंर्गत बदल्या दिवाळीनंतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बदल्या लांबत असल्याने गुरुजींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दोन वर्षे पात्र असतांनाही बदली झाली नाही. आता निम्मे शैक्षणिक वर्षे संपत आले असल्याने बदल्या कधी होणार याकडे शिक्षकांचे लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)