गुणवत्ता म्हणजे विद्यार्थ्यांना आजन्म साथ देणारे सुरक्षा कवच ... डॉ गोविंद नांदेडे यांचे प्रतिपादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :       

स्वतःच्या परिश्रमाने अर्जित केलेली गुणवत्ता म्हणजे विद्यार्थ्यांना आजन्म साथ देणारे सुरक्षा कवच असते . गुणवत्ता जीवनभर आपले रक्षण करणारे अभेद्य कवच असते असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे. भक्ती लॉन्समध्ये आयोजित वीरशैव लिंगायत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी पूर्व शिक्षण संचालक बोलत होते. महाराष्ट्र वीरशैव सभेच्या नांदेड शाखेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक सन्मान भव्य समारंभात डॉ नांदेडे प्रमुख वक्ते म्हणून  बोलत होते.


प्रा मनोहर भोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज पांढरे, ओमप्रकाश निला, माधवराव पटने, अमोल पाटील , त्र्यंबकराव दाबकेकर आदि मान्यवर उपस्थित होते. जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आणि दीप प्रकाशमान करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. 

 

याच कार्यक्रमात वीरशैव गुरुगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा  शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयचंद ततापुरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाराष्ट्र वीरशैव सभेच्या गेल्या पस्तीस वर्षातील समाज उन्नतीच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला.  

   

वीरशैव गुरुगौरव पुरस्कार 2022 या महान सन्मानासाठी प्रा धोंडिबा मोतीराम किडे आणि प्रा डॉ शिवाजी बळवंतराव पटवारी यांना  सन्मानित करण्यात आले.. स्मृतिचिन्ह, पवित्र वस्त्र , सन्मानपत्र आणि पुष्पमाला असे गुरुगौरव पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी इयत्ता पाचवी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत , इयत्ता दहावी , बारावी बोर्ड परीक्षेत , नीट परीक्षेतील गुणवंत तसेच पदवी , पदव्युत्तर परीक्षा, नेट ,सेट पीएचडी परीक्षेतील दोनशे ते अडीचशे सर्वोच्च गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ प्रदान करून समाजातील  या गुणवतांचा गौरव करण्यात आला.

   

या प्रसंगी प्रमुख पाहुणे  बसवराज पांढरे यांनी महाराष्ट्र वीरशैव सभेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन  देते असे सांगून या कार्यक्रमाचे महत्व विशद केले. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र वीरशैव सभेचे तडफदार अध्यक्ष डॉ राजेंद्र हुरणे यांनी  विद्यार्थी गुणवंत गौरव आणि  शिक्षक सन्मानाचा हा कार्यक्रम महाराष्ट्र वीरशैव सभा गेली पस्तीस वर्षे निरंतर चालवत असल्याचे सांगितले . 


महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य अविरत करत आली आहे असे सांगून महाराष्ट्र वीरशैव सभा वधुवर परिचय मेळाव्याचे ही आयोजन करत असल्याचे सांगितले.  आपल्या अध्यक्षीय भाषणात राजमुद्रा अकादमीचे प्रा मनोहर भास्कर भोळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिद्द , अहर्निश परिश्रम आणि प्रयत्नातील सातत्य यातून यशाचे लक्ष्य साध्य करता येते हे सांगून पालकांनी विद्यार्थ्यांना कधी कधी अवास्तव  गरजांसाठी  नाही म्हणायला शिकावे आणि विद्यार्थ्यांनी नाही ऐकून घेण्याची सवय लावून घ्यावी असा संदेश ही राजमुद्रा अकादमीचे प्रा मनोहर भोळे यांनी सांगितले.  राजमुद्रा या आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात समाजाच्या युवकांना प्रशिक्षण देण्याचे त्यांनी मान्य केले . 


या कार्यक्रमास राजीव मिसाळे, अमोल पाटील, डॉ संगनोर, गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ उदगिरे सर , चिंचोलकर सर , मार्कोळे पाटील सर  यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र वीरशैव सभेची महिला आघाडी आणि युवा शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली . कार्यक्रमाचे आभार वैशाली पाटील यांनी मानले. गुणवंत विद्यार्थी  पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन मारकोळे पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक ब्याळे सर यांनी केले. शिक्षक ,पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांसह एक हजार प्रेक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)