शाळा ही मानवी जीवनमूल्यांची गंगोत्री.. गरुडा पुरस्कार कार्यक्रमात डॉ नांदेडे

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शाळा ही मानवी जीवनमूल्यांची गंगोत्री असून विश्र्वकल्यानाचे ते पसायदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे. गरुडा मित्र मंडळाच्या गरूडा पुरस्कार प्रदान कार्यक्रमात डॉ नांदेडे बोलत होते. गरुडा मित्र मंडळाच्या वतीने  दरवर्षी असाधारण  सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला हा पुरस्कार प्रदान करून सन्मान केला जातो.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गरुडा मित्र मंडळाचे समन्वयक डॉ पुरुषोत्तम दाड हे होते.. गुरू गोविंदसिंह वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जोंधळे आणि प्रसिद्ध डॉ कदम  हे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले एकनाथराव यांनाही त्यांच्या दीर्घ राष्ट्रसेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. दरवर्षी गरुडा मित्र मंडळाच्या वतीने श्रीची प्रतिष्ठापना करण्यात येते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री भक्तांना मोदक आणि मिष्ठान्न प्रसाद वाटप केला जातो.


कार्यक्रमाचा प्रारंभ श्रींची आरती करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात गरुडा मित्रमंडळाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय मानवतावादी कार्याचा गौरव केला. पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याप्रित्यर्थ  आणि भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक एकनाथराव  यांना  गरुडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पवित्र शाल , श्रीफल , पवित्र ग्रंथ  असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रारंभी आर जी कुलकर्णी यांनी  पुरस्कार प्राप्त पाहुण्याचा परिचय करून दिला. 


आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध डॉ पुरुषोत्तम दाड यांनी समाजात मानवतेचा दीपस्तंभ अखंड तेवत रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजाची शैक्षणिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक नीतिमत्ता सतत वर्धिष्णू व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.. कार्यक्रमाचे आभार दिगंबरराव क्षीरसागर यांनी मानले तर या सुंदर कार्यक्रमाचे कल्पक सूत्रसंचालन आर जी कुलकर्णी यांनी केले. सत्कारार्थीच्या हस्ते श्रींचा मोदक आणि मिष्ठान्न प्रसाद भक्तांना वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)