सार्वजनिक गणपती - एक आनंदोत्सव

शालेयवृत्त सेवा
0

 




सुगंधाने मंगलाने गंधलेले,

गणेशोत्सवाचे दशदिन,

एकतेने, पावित्र्याने,सहकार्याने,

सजलेले अनेक क्षण!


खरं सांगायचं तर, गणेशोत्सव हा माझा सर्वांत आवडता उत्सव. गणेशाची सुंदर, सुबक मूर्ती न्याहाळायला, त्यांची कारागिरी आणि आकर्षक रंगसंगती डोळ्यांत साठवायला मला फार मजा वाटते! माझे बाबा मूर्ती आणण्यासाठी सकाळीच मला आणि दादाला बाजारात नेतात. डोळ्यांत भरेल अशी बाप्पांची मूर्ती खरंतर दादाच्या हाती देण्याऐवजी कधीकधी ते माझ्या हातात देतात आणि म्हणतात, "मुलगा मुलगी एक समान मानणं हीच बाप्पाची खरी भक्ती." आमचं बिरवली छोटसं गाव. गावात मंडळाचा एकच गणपती बसतो आणि तोही इको फ्रेंडली शाडू मातीचा, नैसर्गिक रंग वापरलेला! आम्ही सर्वजण मिळून यासाठी सजावट करतो. 


वर्गणी मागायला कोणीही जात नाही. सगळे आपापल्या मनाने वर्गणी आणून देतात. ग्रामपंचायतीसमोर मंडप टाकून सजावटीमुळे गणपती इतका छान दिसतो की, दिवसभर तिथेच बसावं असं वाटतं. पण आई म्हणते, "अभ्यास करणारी मुले गणेशाला खूप आवडतात." म्हणून मी घरचा अभ्यास पूर्ण करूनच मंडपात जाते. मला वाटतं, घरोघरी गणपती बसविण्यापेक्षा सर्वांनी सार्वजनिक गणपती बसवावा. सर्वजण एकत्र येऊन पूजा करतील, पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल. एकत्र आल्यामुळे माणसांमधील प्रेम वाढेल. गणेशालाही हेच हवे असेल, नाही का? आम्ही सर्व मुलं सकाळी लवकर आपापल्या आईने बनविलेला प्रसाद आरतीसाठी नेतो व आरतीनंतर एकमेकांना वाटतो. वेगवेगळे प्रसाद खाताना आम्हाला खूप मज्जा येते. 


मोठ्यांना प्रसाद वाटताना गोड गोड आशीर्वादही मिळतात. आमच्या या सार्वजनिक गणेशोत्सवात आम्ही दहा दिवस नाटक, कथा, कवितांच्या भेंड्या, प्रश्नमंजुषा, आजी-आजोबांसाठी खेळ, निबंध स्पर्धा असे बरेच कार्यक्रम घेतो. स्त्रीभ्रूणहत्या, बाललैंगिक शोषण, संस्कार कथा, शिक्षणाची आवश्यकता या अनेक विषयांवर आम्ही मुलं जिवंत देखावे सादर करतो. यात आम्हाला सर्व गावकरी मदत करतात. सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांसाठी एक आनंदाची, एकमेकांचे सुखदुःख वाटण्यासाठीची पर्वणी ठरतो. 


पण आजकाल लोक याला विद्रूप रूप देत आहेत. कर्णकर्कश आवाज आणि गचाळ गाणी, नृत्य यांची साथ देत आहेत. आम्ही मात्र कानांना त्रास देणाऱ्या मोठ्या आवाजाच्या डिजेला आणि 'शीला कि जवानी' यांसारख्या गाण्यांना कटाक्षाने टाळतो. त्याऐवजी आजी-आजोबांच्या अभंगांना पसंती देतो. शेवटच्या दिवशी जड अंतःकरणाने आम्ही बाप्पाला निरोप देतो. आमचा गणेश इकोफ्रेंडली असला तरी गावातल्या हौदातच त्याचे विसर्जन करतो आणि बाप्पाला म्हणतो, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" आणि बाप्पासुद्धा आम्हाला खुणावतो . .


"रोज नव्याने मनी बाप्पा जागवा,

उत्सव आयुष्याचा रोज साजरा व्हावा!"




लेखन-

श्रीम. उषा नंदकिशोर काळे

पर्यवेक्षिका, पुणे महानगरपालिका.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)