खरा शिक्षक दिन हा 3 जानेवारीलाच - आमदार कपिल पाटील | Kapil Patil

शालेयवृत्त सेवा
0



खरा शिक्षक दिन हा 3 जानेवारीला असतो. ज्या दिवशी महामानवी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली 1 जानेवारी 1848 ला. सावित्रीबाईंसह फातिमा शेख शिक्षिका होत्या. देशातील पहिल्या महिला शिक्षकांचा जन्मदिवस खरं शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे. आम्ही तोच करतो. 


पण सरकारला शिक्षक दिनी शिक्षकांची आठवण आली असेल  तर किमान शिक्षकांना सन्मानाने पगार मिळेल, त्यांच्यावर अशैक्षणिक कामाचं ओझं राहणार नाही आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक विषयाला शिक्षक मिळेल याची व्यवस्था करणं ही जबाबदारी पहिल्यांदा सरकारने पार पाडावी. 


सरकारी शिक्षक दिन दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशात सर्वत्र साजरा होईल. पण त्याचवेळी नवीन शिक्षण धोरणाने गोरगरिबांच्या शिक्षणावर मोठं संकट आणलं आहे. कमी पटाच्या लाखभर शाळा बंद करणं, हजारो महाविद्यालयं बंद करणं, खाजगीकरण वाढवणं, व्यावसायिक शिक्षणाच्या नावाखाली मूलभूत शिक्षणाच्या प्रवाहातून वंचितांना पूश आऊट करणं आणि दुसऱ्या बाजूला वर्णवादी सनातनी मूल्यांचा उदोउदो करणं असं हे नवं शिक्षण धोरण आहे. त्यामुळे या धोरणाचा आणि सरकारी अनास्थेमुळे शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या व अवहेलना याबद्दलचा शोक महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी आजच्याच दिवशी करावा. 


आता कुणी सन्मानीय आमदार शिक्षकांच्या मागे लागले आहेत. सरकारी शिक्षण व्यवस्था सुधारण्या ऐवजी शिक्षकांना दोष देण्यामध्ये काहींना आनंद वाटतो. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ ही त्यांना आता बंद करायचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेलाच नख लावायची तयारी दिसते. म्हणून शिक्षकांनी सावध राहायला हवं इतकंच.

- आमदार कपिल पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)