शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करा .. आमदार कपिल पाटील

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक भारतीचा शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांशी पत्रव्यवहार


मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

कोरोना कालावधीत बंद पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण सचिव यांना आज पत्र पाठवण्यात आल्याची माहिती, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.


कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत, असे शासन आदेश देण्यात आले होते. विविध शालेय क्रीडा स्पर्धा होऊ न शकल्याने महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा  नियमितपणे व पूर्णवेळ सुरु झालेल्या आहेत. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत घेण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त न झाल्यामुळे या वर्षीच्या स्पर्धा सुरु झालेल्या नाहीत. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी दि. २८ जून २०२२ रोजी शालेय शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य यांना सन २०२२-२३ मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत पत्र दिले आहे. या पत्रावर निर्णय न झाल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला मंजूरी मिळालेली नाही, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.


दोन वर्षांपासून शालेय खेळाडू विद्यार्थी विविध स्पर्धांपासून वंचित असून राज्यातील खेळाडूंना राज्यस्तरावर व देश पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे २०२२-२३ मधील शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या माध्यमातून शासनास्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सुभाष मोरे यांनी सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)