क्रांतीदिनी 'पर्यावरण' आणि 'घरोघरी तिरंगा' अभियानाचा जागर ..
शालेय विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले गावकऱ्यांचे लक्ष !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
येत्या १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा सर्वव्यापी महाउपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळा दे. येथे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून एक मूल - एक झाड आणि एक तिरंगा असा उपक्रम राबविण्यात आला.
याअंतर्गत शाळेतील एका मुलाने एका झाडाचे वृक्षारोपण आणि संगोपन करावयाचे असून एका कुटुंबाला एक तिरंगा याप्रमाणे आपल्या घरावर तिरंगा फडकावला पाहिजे यासाठी आग्रह धरावा याबाबत मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आवाहनानुसार पर्यावरण दिन, वटपौर्णिमा तसेच विविध औचित्यानुसार शाळा व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. आता 'हर घर तिरंगा' ही चळवळ जोर धरत असून लोकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वव्यापी राबविण्यात येणाऱ्या महाउपक्रमाबाबत लोकचेतना निर्माण व्हावी यासाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून मानवी साखळीद्वारे एक मूल - एक झाड आणि एक तिरंगा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकजण आपापल्या घरावर येत्या १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकविण्याबाबत आग्रह धरणार आहेत.
तसेच एक विद्यार्थी इतर दोन घरांना याबाबत विनंतीही करणार असून लवकरच तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण गावात सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, सहशिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .