देशभक्तीच्या रंगात रंगूया... | Har Ghar Tiranga

शालेयवृत्त सेवा
0

  




ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त 1झाले. स्वातंत्र्यसमरात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या प्राणांच्या आहुतीवर आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस त्या वीरांच्या गाथा आणि बलिदानाचे प्रतीक आहे. यावर्षी आपणाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. हा आपल्या देशवासियांसाठी, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांचे स्मरण करणे, आपले स्वातंत्र्य अखंड, अबाधित राखणे आणि जगाच्या नकाशावर भारताची विकसित देश म्हणून ओळख निर्माण करणे, हे आपणा सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.



केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने देश आणि राज्यभरात अनेक उपक्रमांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. यातीलच एक उपक्रम म्हणजे घरोघरी तिरंगा. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याची स्मृती तेवत राहावी, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण राहावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करणे ही त्यामागची भावना आहे.



राष्ट्रध्वजाविषयी काही माहिती

आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा आपल्या देशाभिमान आणि सन्मानाचे प्रतीक आहे. आपला राष्ट्रध्वज आपली आन, बाण आणि शान आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी त्याचे खूप महत्त्व आहे.


भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला.


ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरती गर्द केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मध्यभागी पांढरा आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा आहे. हा रंग निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो. त्यांच्याप्रती निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. अशोकचक्राला २४ आरे आहेत. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे.



ध्वजसंहिता

राष्ट्रध्वज हा आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. केंद्रीय गृह विभागाच्या दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल", या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल.



प्लास्टीक झेंडे वापरू नयेत

घरोघरी तिरंगा उपक्रम राबवताना काही दक्षता घेणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी व त्यासाठी सातत्याने जाणिव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच, प्लास्टीक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.



राष्ट्रध्वज कुठे मिळेल ?

पोस्ट ऑफिस, स्वस्त धान्य दुकाने, पंचायत समिती, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय

किंमत - रु. 20.50 ते रु. 24


राष्ट्रध्वज लावणेबाबत मार्गदर्शक सूचना


ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे.


जेव्हा खिडकीची कड, सज्जा आगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.


जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट आडवा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा. आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा त्याच्या (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावा म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा.


फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये.


दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजावर आणि यात यापुढे तरतूद केली असेल ते खेरीजकरून त्याच्या बरोबरीने लावू नये; तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत असेल त्या काठावर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेऊ नये अथवा बोधचिन्ह लावू नये.


ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही.


‘ध्वजाचा’ केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.


ध्वज फाटेल अशा पद्धतीने लावू नये अथवा बांधू नये.


ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत.


ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही.


ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही.


ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरूपात वापर करता येणार नाही अथवा ध्वज फडकविण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा एखाद्या जाहिरात चिन्ह लावण्यासाठी वापर करता येणार नाही.


ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. परंतु अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्यच तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा अन्य रीतीने तो संपूर्णतः नष्ट करावा.



झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही

घरोघरी तिरंगा मोहिमेंतर्गत घरोघरी तिरंगा फडकवताना दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. मात्र कार्यालयांना याबाबत ध्वजसंहितेचे पालन करावे लागेल.


स्वातंत्र्यप्राप्तीच्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करून शासनाच्या या उपक्रमात आबालवृद्ध सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व उत्साहाने सहभागी होऊ या. हा आपला राष्ट्रीय सण हर्षोल्लास आणि आनंदाने साजरा करू या, स्वातंत्र्यप्राप्तासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या प्रती नतमस्तक होऊ या. सर्व भेद विसरून हा उपक्रम यशस्वी करू या व देशाप्रतीची आपली भक्ती, प्रेम, आदर, निष्ठा व्यक्त करु या. देशभक्तीच्या रंगात नाहुया....!




(संकलन जिल्हा माहिती कार्यालय, बीड )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)